तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी कल्पकतेला पर्याय नसतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित होत असतानाच, भारतासमोर जागतिक गेमिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे. गरज आहे ती केवळ तंत्रज्ञानाची नव्हे, तर आपल्या सांस्कृतिक सामर्थ्याची जाणीव असलेल्या दूरदृष्टीची.
एकेकाळी चित्रपट आणि संगीत ही मनोरंजनाची प्रमुख साधने मानली जात होती; मात्र आता व्हिडिओ गेमिंगने या दोन्ही क्षेत्रांना मागे टाकत स्वतंत्र आणि प्रचंड मोठी जागतिक बाजारपेठ निर्माण केली आहे. ‘ग्रँड थेफ्ट ऑटो’ अर्थात 'जीटीए' या व्हिडिओ गेमच्या नव्या आवृत्तीने जगभरात निर्माण केलेली उत्सुकता आणि त्यासाठी झालेली अब्जावधी डॉलरची गुंतवणूक हे या बदलाचे ठळक उदाहरण आहे. एका व्हिडिओ गेमच्या निर्मितीसाठी हजारो गेमिंगतज्ज्ञ अनेक वर्षे मेहनत घेतात, प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली जाते आणि त्यातून केवळ मनोरंजनाचे साधन नव्हे, तर एक स्वतंत्र आभासी विश्व उभे केले जाते. हे विश्व जगभरातील लाखो लोकांना आकर्षित करते. त्यामुळे गेमिंगकडे केवळ तरुणांचा विरंगुळा म्हणून पाहण्याचे दिवस आता संपले आहेत. तंत्रज्ञान, कला, कल्पकता, व्यवसाय आणि रोजगार यांचा संगम असलेले हे भविष्यातील महत्त्वाचे उद्योगक्षेत्र आहे. या बदलत्या वास्तवात भारताने आपली भूमिका काय ठेवायची, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक गेमिंग बाजारपेठेचा विस्तार पाहिला, तर त्यातील संधींची व्याप्ती लक्षात येते. जगभरातील व्हिडिओ गेमिंगचा महसूल सुमारे दोनशे अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला आहे. चित्रपट आणि संगीत या दोन मोठ्या मनोरंजन उद्योगांच्या एकत्रित कमाईपेक्षाही हा आकडा मोठा आहे. भारतासाठी ही बाजारपेठ विशेष महत्त्वाची आहे. सुमारे ५५ कोटी खेळाडू असलेला भारत हा जगातील सर्वांत मोठ्या मोबाईल गेमिंग बाजारपेठांपैकी एक आहे. २०२५ मध्ये भारतीय गेमिंग क्षेत्राचा महसूल एक अब्ज डॉलरच्या पुढे गेला. देशातील वाढती इंटरनेट उपलब्धता, स्वस्त डेटा, स्मार्टफोनचा विस्तार आणि डिजिटल माध्यमांशी जोडली गेलेली तरुण पिढी यामुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे; मात्र या संख्यात्मक सामर्थ्याचे रूपांतर जागतिक स्तरावर नावाजल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांमध्ये झाले आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
भारतीय गेमिंग क्षेत्रासमोरची सर्वांत मोठी विसंगती याच ठिकाणी दिसते. भारतात कोट्यवधी लोक व्हिडिओ गेम खेळतात. परदेशी कंपन्यांच्या खेळांसाठी पैसे खर्च करतात. जागतिक दर्जाचे गेम तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये भारतीय अभियंते आणि विकासक महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘जीटीए ६’च्या निर्मितीत बंगळुरूमधील सुमारे १,६०० भारतीय विकासकांनी योगदान दिल्याचे नमूद केले जाते. भारतीय तरुणांकडे कौशल्य आहे, तांत्रिक क्षमता आहे आणि जागतिक दर्जाच्या प्रकल्पांवर काम करण्याची पात्रताही आहे. तरीही भारतीय संस्कृती, इतिहास, लोककथा आणि सामाजिक वास्तव यांचे प्रतिबिंब असलेला जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरलेला एखादा मोठा गेम आपल्याला निर्माण करता आलेला नाही. दुसऱ्यांच्या कल्पनांना आकार देण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे; मात्र स्वतःच्या कल्पनांमधून जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवण्याच्या बाबतीत आपण मागे आहोत. ही केवळ उद्योगक्षेत्रातील उणीव नाही, तर देशाच्या सर्जनशील आणि उद्योजकीय क्षमतेपुढील आव्हान आहे. भारताची ओळख दीर्घकाळ जागतिक कंपन्यांना कुशल मनुष्यबळ आणि तांत्रिक सेवा पुरवणारा देश अशी राहिली आहे. माहिती तंत्रज्ञानापासून विविध डिजिटल सेवांपर्यंत भारतीयांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे; परंतु सेवा पुरवण्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची उत्पादने, स्वतःचे तंत्रज्ञान आणि स्वतःची बौद्धिक संपदा निर्माण करण्याची गरज आहे. गेमिंग क्षेत्रातही हाच दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. जागतिक कंपन्यांसाठी काम करणे गैर नाही; उलट त्यातून अनुभव आणि कौशल्य मिळते; परंतु त्याच अनुभवाचा उपयोग करून भारतीय कंपन्यांनी स्वतःचे खेळ विकसित केले पाहिजेत. त्यासाठी केवळ मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा ठेवून चालणार नाही. बाजारपेठेचा अभ्यास, उत्तम कथानक, संशोधन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि दीर्घकालीन व्यावसायिक नियोजन यांची सांगड घालावी लागेल.
भारतीय संस्कृती आणि इतिहास हा गेमिंगसाठी मोठा स्रोत ठरू शकतो. रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विविध राजवटी, प्रादेशिक लोककथा, आदिवासी संस्कृती, ऐतिहासिक स्थळे आणि भारतातील सामाजिक वैविध्य यांतून असंख्य कथानके निर्माण होऊ शकतात. जगभरातील खेळाडूंना आकर्षित करणारे आभासी विश्व या कथांच्या आधारे उभे करता येऊ शकते; मात्र भारतीय विषय घेतला म्हणजे खेळ आपोआप जागतिक दर्जाचा होईल, असे नाही. केवळ पौराणिक पात्रे किंवा ऐतिहासिक घटना दाखवणे पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी कथानकातील वेगळेपणा, पात्रांची बांधणी, खेळातील आव्हाने, दृश्यात्मक गुणवत्ता, तांत्रिक सफाई आणि खेळाडूला मिळणारा अनुभव या प्रत्येक बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. भारतीय संस्कृतीची ओळख जपत असताना जागतिक दर्जाचे सादरीकरण करण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. स्थानिक विषयांना जागतिक अपील देणे हीच भारतीय निर्मात्यांची खरी कसोटी असेल. या संपूर्ण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनाने अनेक उद्योगांच्या कामकाजाचे स्वरूप बदलू लागले आहे. माहितीचे विश्लेषण, संगणकीय आज्ञावली लिहिणे, दृश्यनिर्मिती, संवादलेखन आणि अनेक तांत्रिक प्रक्रिया यांचा वेग वाढवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या छोट्या निर्मात्यांही मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी जागतिक दर्जाचा गेम तयार करण्यासाठी प्रचंड आर्थिक ताकद, हजारो कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि अनेक वर्षांचा कालावधी आवश्यक होता. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांमुळे काही प्रक्रिया अधिक वेगाने आणि कमी खर्चात पूर्ण करणे शक्य होत आहे. त्यामुळे नवउद्योजक आणि छोट्या निर्मात्यांसाठी स्पर्धेची नवी दारे उघडत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे मानवी सर्जनशीलतेचे महत्त्व कमी होईल, असे मानणे चुकीचे ठरेल. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी एखादी कल्पना जन्माला घालणे, तिच्यातून वेगळा अनुभव निर्माण करणे आणि त्या अनुभवाशी लोकांचे भावनिक नाते जोडणे, यासाठी मानवी संवेदनशीलता आवश्यक असते. एखाद्या खेळातील शहराची रचना, पात्रांचे स्वभाव, कथानकाचा प्रवाह, संघर्ष, आव्हाने आणि त्यातून मिळणारा आनंद या गोष्टी केवळ तांत्रिक कौशल्यावर अवलंबून नसतात. त्यामागे मानवी अनुभव, कल्पकता, अभिरुची आणि निर्णयक्षमता असते. कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते, पर्याय सुचवू शकते आणि कामाचा वेग वाढवू शकते; परंतु कोणती कल्पना निवडायची, कोणता अनुभव निर्माण करायचा आणि त्याला कलात्मक उंची कशी द्यायची, हे ठरवण्याचे काम माणसालाच करावे लागेल. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे रोजगार हिरावून घेणारे तंत्रज्ञान म्हणूनच पाहण्याऐवजी मानवी क्षमतांना बळ देणारे साधन म्हणून पाहण्याची गरज आहे.
सरकारची भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरते. गेमिंगला केवळ मनोरंजनाचे क्षेत्र न मानता एक व्यापक उद्योग म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर द्यायला हवा. संगणक अभियांत्रिकीबरोबरच चित्रकला, संगीत, कथालेखन, अॅनिमेशन, दृश्यरचना आणि ध्वनिनिर्मिती अशा विविध क्षेत्रांतील कौशल्यांना एकत्र आणणारे अभ्यासक्रम विकसित करणे गरजेचे आहे. गेमिंग क्षेत्रातील नवउद्योजकांना आर्थिक मदत, संशोधनासाठी सुविधा आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी धोरणात्मक पाठबळ आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या खेळांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. कारण एखादा लोकप्रिय गेम निर्माण करणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यावरील मालकी हक्क आणि त्यातून दीर्घकाळ उत्पन्न मिळवण्याची क्षमता जपणेही आवश्यक आहे. भारतातील तरुणांमध्ये कल्पकतेची कमतरता नाही. डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आहे. जागतिक बाजारपेठेची दारे खुली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्मितीच्या प्रक्रियेत नवे पर्याय उपलब्ध होत आहेत. अशा वेळी भारताने केवळ मोठ्या गेमिंग बाजारपेठेचा ग्राहक म्हणून समाधान मानू नये. गेमिंग क्षेत्रात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा निर्माता देश बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. ‘जीटीए’सारख्या खेळांचे यश आपल्याला या बाजारपेठेची अफाट ताकद दाखवते, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार कमी साधनांतूनही मोठी निर्मिती करण्याची संधी देतो. या दोन्ही बदलांचा उपयोग भारताने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी केला पाहिजे.