Monday, November 23, 2026

Nashik Crime : मुला-मुलींच्या छळाला कंटाळून सेवानिवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या ? चौघांविरोधात गुन्हा

तक्रारीनुसार, हेमंत हेमाडे यांनी बळकावलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, हा दावा आणि इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी संशयितांकडून त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता.

नाशिक : मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले; मात्र त्यांच्याकडूनच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ होत असल्याचा आरोप... त्यातच मालमत्तेच्या वादातून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या... या सर्व प्रकारांना कंटाळून नाशिकमधील एका सेवानिवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत अधिकाऱ्याच्या मुलगा, मुलगी, सून आणि नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय ?

नाशिकमधील उंटवाडी परिसरातील संभाजी चौकाजवळ असलेल्या उषाकिरण सोसायटीत ही घटना घडली. सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे (वय ५९) यांनी शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी पहाटे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी योगिता हेमाडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, हेमाडे यांचा मुलगा यश हेमंत हेमाडे, सून भाग्यश्री हेमाडे, मुलगी प्रियंका खोपकर आणि यशचे सासरे मल्लिकार्जुन उमडी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी यश हेमाडे आणि मल्लिकार्जुन उमडी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मालमत्तेच्या वादातून छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या

तक्रारीनुसार, हेमंत हेमाडे यांनी बळकावलेली मालमत्ता परत मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, हा दावा आणि इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी संशयितांकडून त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. तसेच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिल्यास तीच शेवटची तारीख ठरेल, अशी धमकी मुलगा आणि नातेवाइकांनी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे हेमाडे मानसिकदृष्ट्या खचले होते. न्यायालयात गेल्यास आपला आणि पत्नीचा जीव धोक्यात येईल, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या विवाहानंतर मालमत्तेवरून वादाला सुरुवात

पोलिसांच्या माहितीनुसार, हेमाडे यांचा कथित छळ ८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होता. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर हेमंत हेमाडे यांनी योगिता यांच्याशी दुसरा विवाह केला होता. त्यानंतर योगिता यांनी कुटुंबाच्या मालमत्तेवरील सर्व हक्क सोडावेत, यासाठी मुलगा, मुलगी आणि सुनेकडून हेमाडे यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय, हेमाडे यांची फसवणूक करून त्यांची मालमत्ता बळकावण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याच मालमत्तेच्या वादातून कुटुंबातील संघर्ष वाढत गेल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबातील मालमत्तेचा वाद, कथित छळ आणि धमक्यांमुळे एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप या घटनेने नातेसंबंध आणि कौटुंबिक वादांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >