राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यांतर्गत शासनाच्या व्यवस्थापनाखाली जाणार नाहीत. स्वतःची जमीन कसणाऱ्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणताही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. १९४८ च्या कुळ कायद्यातील कलम ६५ चा संदर्भ देताना आपल्या बोलण्याची गल्लत झाली किंवा काही लोकांनी गैरसमज निर्माण केला, असं त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य शेतकऱ्याची एक इंचही जमीन सरकार जमा होणार नाही. बावनकुळे म्हणाले, कुळ कायद्यात तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येण्याची तरतूद आहे. मात्र याचा अर्थ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार घेणार असा नाही. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातील जो मूळ शेतकरी स्वतःची जमीन कसतो, त्याला याचा कोणताही त्रास होणार नाही. महसूल विभाग शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी नाही, तर त्यांच्या जमिनींचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
मोठ्या जमीनधारकांना आवाहन
काही मोठ्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून ५०, १००, २०० एकर जमिनी खरेदी करून लँड बँक तयार केली आहे. त्या जमिनींवर फार्महाऊस उभारले आहेत, पण प्रत्यक्ष शेती केली जात नाही. मोठ्या प्रमाणावर शेतीची जमीन पडीक ठेवणं राज्याला परवडणारं नाही, असं बावनकुळे म्हणाले. ज्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत त्या जमिनी शेती उत्पादनाखाली आणाव्यात. फार्महाऊस बांधलं असेल तर हरकत नाही, पण जमीन पडीक ठेवू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानपरिषदेतील कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या 'विधानपरिषद कामकाज : माझा ...
या जमिनींवर चारा लागवड, बांबू लागवड किंवा अन्य पिकांची लागवड करता येईल. त्यामुळे कृषी उत्पादन वाढेल आणि राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल. या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी आपण फोनवर चर्चा केली असून त्यांना आपली भूमिका पटली आहे, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जमिनीबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असं आवाहन त्यांनी केलं.