भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांनी आज (२४ नोव्हेंबर) २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली. २०२० मध्ये अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सहा वर्षांनी पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र दिसणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती महत्त्वाची मानली जात आहे.
शिरोमणी अकाली दल आणि भाजपने पंजाबमध्ये पाच विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. या दोन पक्षांनी १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये युती केली होती. यापैकी तीन वेळा, १९९७, २००७ आणि २०१२ मध्ये या दोन पक्षांनी एकत्र सरकार स्थापन केले होते. तथापि, सप्टेंबर २०२० मध्ये कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून या दोन पक्षांमधील युती तुटली. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून लोकसभा खासदार हरसिमरत कौर बादल यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. हे कायदे नंतर रद्द करण्यात आले.
Amit Shah : पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट : भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र; अमित शहा-सुखबीर बादल यांच्या पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा
चंदीगड : पंजाबच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी ...
दोन पक्षांच्या युतीमागील मुख्य कारण म्हणजे त्यांची मतपेढी आणि प्रादेशिक प्रभाव. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पंजाबमध्ये अंदाजे २५ लाख मते, म्हणजेच १८.५६ टक्के मिळाली. तर अकाली दलाला अंदाजे १८ लाख मते, म्हणजेच १३.४२ टक्के मिळाली. या दोन्ही पक्षांची मते मिळून एकूण संख्या अंदाजे ४३ लाख होते आणि एकूण मतांचा वाटा अंदाजे ३२ टक्के होतो. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाला अंदाजे २८. ६१ लाख मते मिळाली म्हणजेच मतांचा १८.३८ टक्के वाटा. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना अंदाजे १२ लाख मते मिळाली म्हणजेच मतांचा ८ टक्के वाटा. त्यांची एकत्रित मते अंदाजे ४० ते ४१ लाखांपर्यंत पोहोचतात. दुसरीकडे, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ४२ टक्के मते मिळवून ९२ जागा जिंकल्या. काँग्रेसला २२.९८ टक्के मते मिळाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपचा मतांचा टक्का २६.३० टक्क्यांपर्यंत घसरला, तर काँग्रेसला २६.०२ टक्के मते मिळाली.
शिरोमणी अकाली दल हा भाजपच्या सर्वात जुन्या मित्रपक्षांपैकी एक आहे. १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यावर या दोन पक्षांनी १९९६ मध्ये हातमिळवणी केली आणि १९९७ च्या पंजाब निवडणुकांपूर्वी औपचारिक युती जाहीर करण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी करण्याच्या शक्यतेवरही विचार केला होता, परंतु प्रस्तावित युतीच्या अटींवर मतभेद झाल्यामुळे चर्चा फिस्कटली. गेल्या काही महिन्यांत, विशेषतः पंजाबमध्ये एनडीए पुढचे सरकार स्थापन करेल असे अमित शाह यांनी वारंवार सांगितल्यानंतर पुनर्मिलनाच्या चर्चेने पुन्हा वेग घेतला आणि आज युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.