Thursday, November 26, 2026

वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाहन धुण्यास मनाई

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सर्व महापालिका क्षेत्रांत वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली असून, असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासारख्या कामांसाठी होऊ नये, यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांमार्फत लवकरच शासन आदेश जारी करण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका क्षेत्रांमध्ये संबंधित यंत्रणांना कारवाई करता येणार आहे. हा निर्बंध सार्वजनिक ठिकाणांपुरता मर्यादित नसून, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यास मनाई असेल. सोसायट्यांमध्ये असा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >