गुजरातमधील बारडोली येथे जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात फेकून दिल्याच्या हत्याकांडाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणातील मृत नितीन उर्फ नितेश पाटील आणि कविता पाटील हे दोघेही विमा फसवणुकीच्या एका गुन्ह्यात संशयित आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमा घोटाळा आणि पाटील कुटुंबाच्या हत्याकांडाचा काही संबंध आहे का, या दिशेने जळगाव आणि गुजरात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट रस्ता अपघात दाखवून विमा कंपनीकडून ५० लाख रुपये मिळवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी खोटे साक्षीदार उभे करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात तपासी अंमलदारासह चार पोलीस कर्मचारी, एक वैद्यकीय अधिकारी आणि खासगी व्यक्ती अशा एकूण दहा जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये एरंडोल येथील नितेश पाटील आणि कविता संजय पाटील यांची नावेही संशयित आरोपी म्हणून समोर आली आहेत. त्यामुळे या विमा फसवणूक प्रकरणाचा हत्याकांडाशी काही संबंध आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये घेऊन जाणाऱ्या वाहनाचा चालक दयानंद भदाणे उर्फ खंड्या याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पारोळा येथून अटक केली आहे. त्याला पुढील तपासासाठी गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नितेश आणि कविता पाटील यांना गुजरातमध्ये चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दयानंद भदाणे त्यांना सोबत घेऊन गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
Jalgaon Crime : आधी गाडी अडवली, मग संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; जळगावच्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime : रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबाचा प्रवास मृत्यूच्या सापळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव ...
नेमकी घटना काय ?
जळगावहून कामाच्या शोधात गुजरातला निघालेल्या पाटील कुटुंबावर २१ नोव्हेंबर रोजी बारडोली तालुक्यात हल्ला झाल्याचा आरोप आहे. सुरत जिल्ह्यातील बारडोली परिसरात चार जणांनी त्यांचे वाहन अडवले आणि कुटुंबातील सदस्यांना कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत नितीन उर्फ नितेश पाटील आणि कविता पाटील यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. तर १३ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला असून कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत.
या हत्याकांडप्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. दरम्यान, मृत दाम्पत्य विमा घोटाळ्यात संशयित असल्याची माहिती समोर आल्यानंतर या हत्याकांडामागील कारणांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमा फसवणूक प्रकरणातूनच पाटील कुटुंबाची हत्या करण्यात आली का ? या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे ? दाम्पत्याला गुजरातला नेण्यामागे नेमका काय उद्देश होता ? या सर्व प्रश्नांचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे.