Thursday, November 26, 2026

Delhi Crime News : प्रवास सेवा देण्याच्या बहाण्याने 25 लाखांची फसवणूक; दोघांना अटक

पोलिसांनी आरोपींकडून 15 लाख रुपये जप्त केले असून, ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात आली आहे.

दिल्ली : प्रवास सेवा पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीच्या प्रतिनिधीची 25 लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथून बुड्डन रामजनम यादव उर्फ श्रीकेश आणि गौतम यादव यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून 15 लाख रुपये जप्त केले असून, ही रक्कम तक्रारदाराला परत करण्यात आली आहे.

अडीच लाखांऐवजी 25 लाख रुपये केले ट्रान्सफर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट आणि अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करतात. कंपनीसाठी प्रवास सेवा शोधत असताना त्यांनी काही व्यक्तींशी व्यवहार निश्चित केला होता. यासाठी त्यांना अडीच लाख रुपये आगाऊ देण्यास सांगण्यात आले. त्यांना श्रीकिशन ट्रॅव्हल्सच्या बँक खात्याचा तपशीलही देण्यात आला.

मात्र, चुकून अडीच लाख रुपयांऐवजी त्यांनी 25 लाख रुपये संबंधित खात्यात पाठवले. पैसे मिळाल्यानंतर समोरच्या व्यक्तींनी संपर्क बंद केला. यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.

बँक व्यवहारांच्या तपासातून आरोपींचा शोध

या प्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी शाहदरा येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक व्यवहार, बँक खाती, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि मोबाईल क्रमांकांची तपासणी केली.

तपासात 15 लाख आणि 5 लाख रुपयांचे दोन व्यवहार शिवा ट्रेडर्सच्या खात्यात झाल्याचे समोर आले. याशिवाय 2 लाख रुपये अन्य एका खात्यात पाठवण्यात आले होते. उर्वरित 3 लाख रुपयांचा वापर लखनौमधील सराफाकडून पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनद्वारे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

20 टक्के कमिशनसाठी सोन्याच्या साखळ्या दिल्याचा आरोप

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यादवने दुसऱ्या बँक खात्यातून चेकद्वारे 20 लाख रुपये काढून आपल्या साथीदारांना दिले. तसेच 3 लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या साखळ्या खरेदी करून 20 टक्के कमिशनच्या बदल्यात साथीदारांकडे दिल्याचा आरोप आहे.

गौतम यादवने स्वतःच्या नावावर असलेले सिम कार्ड बँक खात्याशी जोडून या फसवणुकीत मदत केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

मोबाईल, सिम कार्ड आणि एटीएम कार्ड जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 3 मोबाईल फोन, 8 सिम कार्ड, 7 एटीएम कार्ड, 2 चेकबुक आणि एक सोन्याची साखळी जप्त केली आहे. तसेच 15 लाख रुपये जप्त करून तक्रारदाराला परत करण्यात आले आहेत. या सायबर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >