Thursday, November 26, 2026

SMAT 2026: क्रिकेटच्या मैदानावर संतापजनक प्रकार! कृणाल पांड्यावर चाहत्याने फेकली बूटं; लाजिरवाण्या प्रसंगाचा VIDEO Viral

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकाच्या कृतीने संतापाची लाट पसरली आहे. कारण क्रिकेटपटू कृणाल पांड्यावर एका प्रेक्षकांना बूटं फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेतील एका प्रकाराने क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत बडोदा आणि झारखंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात झारखंडने प्रथम फलंदाजी करत 19.1 षटकात सर्व गडी गमवून 133 धावा केल्या. तसेच विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बडोदा संघाने 16.2 षटकात पूर्ण केलं. कृणाल पांड्या नेतृत्वात बडोदा संघाने हा विजय मिळवला. या सामन्यानंतर एक घटना घडली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सामन्यानंतर कर्णधार कृणाल पांड्या चाहत्यांना ऑटोग्राफ देण्यासाठी बाउंड्री लाइनजवळ गेला. त्या दरम्यान एक प्रेक्षकाने त्याच्याव बूटं फेकली. या घटनेत कृणाल पांड्या थोडक्यात वाचला. खरं तर अशी कृती कोणासोबत झाली असती तर तळपायाची आग मस्तकात गेली असती. मात्र कृणाल पांड्याने संयम राखला आणि सीमेजवळील चाहत्यांना स्वाक्षरी दिली. या कृतीनंतरही त्याने चाहत्यांना नाराज केलं नाही.

पहिल्यांदा बूटं पकडण्याचा प्रयत्न, मग थोडक्यात वाचला

बडोदा संघाने झारखंड संघाला 5 गडी राखून पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर चाहत्यांनी त्याला ऑटोग्राफसाठी विनवणी केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत कृणाल पांड्या ऑटोग्राफ देण्यासाठी पुढे आला. जसं त्याने बाउंड्री लाईन पार केली तसा प्रेक्षकांच्या गर्दीतून एक बूट त्याच्या भिरकावला गेला. हे बूट कृणाल पांड्याने पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी एक बूट त्याच्या दिशेने आला. हा बूट त्याला लागणार असंच वाटलं होतं. मात्र त्याने कसं बसं स्वत:ला यातून वाचवलं. या कृतीमुळे त्याच्या चेहऱ्यावर सुरूवातीला संताप दिसला. कृणाल पांड्याने बूट फेकणाऱ्या प्रेक्षकाकडे बोट दाखवून इशारा दिला. मात्र त्यानंतर लगेचच शांत झाला. त्यानंतर इतर चाहत्यांना ऑटोग्राफ दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोदाची कामगिरी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेत कृणाल पांड्याच्या नेतृत्वा बडोदाचा संघ चांगली कामगिरी करत आहे. बडोदा संघाने आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी 5 सामन्यात विजयी पताका फडकावली. फक्त एकाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चंदीगडविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर बडोदा संघाने सलग पाच सामन्यात विजय मिळवला. पाच सामन्यात विजय मिळून 20 गुणांची कमाई केली आहे. तसेच +2.207 नेट रनरेट असून आपल्या गटात अव्वल स्थानी आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >