'पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका!' पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा नागरिकांना संदेश

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नये, असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबई पुस्तक महोत्सवात केले. वरिष्ठ पत्रकार अभिषेक शर्मा यांच्याशी संवाद साधताना त्यांनी जलव्यवस्थापन, हवामान बदल, महिलांची भूमिका आणि युवकांच्या उद्योजकतेवरही भाष्य केले.

मुंबई : पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी दैनंदिन जीवनातील सवयी बदलणे गरजेचे असून, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नये, असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई पुस्तक महोत्सवात वरिष्ठ पत्रकार अभिषेक शर्मा यांच्याशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, हवामान बदल, महिला सहभाग आणि युवकांच्या भविष्याबाबत आपली भूमिका मांडली.


पाणी हा जीवनाचा आधार असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून, त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.






जलव्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी लोकसहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. शासनाच्या योजनांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल, तरच त्या योजनांना यश मिळते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. पाणी बचत, भूजलाचे महत्त्व, ठिबक सिंचन आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धतींबाबत ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडूनही अनेक गोष्टी शिकायला मिळतात, असे त्यांनी सांगितले.


पर्यावरण विभागाच्या कामकाजात विज्ञानाचे ज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे सांगताना त्यांनी वनस्पतिशास्त्रासह रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयांची माहिती प्रशासकीय कामकाज समजून घेण्यासाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले. यापूर्वी ग्रामविकास, जलसंधारण आणि महिला व बालविकास विभागाची जबाबदारी सांभाळताना विज्ञानाच्या अभ्यासाचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.


पर्यावरण संवर्धनातील महिलांच्या भूमिकेबाबत बोलताना महिलांमध्ये निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा आणि निर्णयाप्रती कटिबद्धता हे गुण असल्याचे त्यांनी म्हटले. निसर्गाला आपण निसर्गमाता म्हणतो. आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही, तर पुढील पिढ्यांच्या हक्काचा ऑक्सिजन आपण हिरावून घेत आहोत, याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.


युवकांनी जागतिकीकरणाच्या काळात नव्या संधींचा स्वीकार करताना संस्कृती आणि परंपरा जपण्यावरही भर द्यावा. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि उद्योजकतेची भावना युवकांमध्ये रुजणे आवश्यक आहे. ग्रामीण युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.


यावेळी पंकजा मुंडे यांनी मुंबई पुस्तक महोत्सवातील विविध दालनांना भेट देऊन पुस्तकांची पाहणी केली. त्यांच्यासोबत महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमित साटम आणि मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुस्तकांच्या दुनियेत रमले मंत्री चंद्रकांत पाटील! वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्नशील; मंत्र्यांचे सुतोवाच

मुंबई: पुस्तक वाचनामुळे माणसाचे विचारविश्व समृद्ध होते, तसेच इतरांच्या अनुभवातून आणि विचारांतून शिकण्याची

महिला आरक्षणाच्या परिसीमन विधेयकाला शिवसेनेचा ठाम पाठिंबा, एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचा ठराव मंजूर

महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून आणण्यात येणाऱ्या परिसीमन विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा

राज्यातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार ! फडणवीस सरकारचा लोककल्याणकारी निर्णय

मुंबई : राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणधारकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १

Ahilyanagar : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्रदान-अवयवदानाचा संदेश

अहिल्यानगर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या

Ahilyanagar Crime : नगरमध्ये 550 किलो गोमांस जप्त

अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध गोमांस विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा

CM Devendra Fadnavis : गावागावांत जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वॉटर कपचा शुभारंभ

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे