CM Devendra Fadnavis : गावागावांत जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वॉटर कपचा शुभारंभ

आपल्या सर्वांचा एकच पक्ष तो म्हणजे ‘दुष्काळ विरोधी पक्ष’ असून यासाठी एकजुटीने काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मांडले.

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाला लोकचळवळीचे बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज केले. या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळाविरुद्धची लढाई लोकचळवळ म्हणून उभी करावी. आपल्या सर्वांचा एकच पक्ष तो म्हणजे ‘दुष्काळ विरोधी पक्ष’ असून यासाठी एकजुटीने काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मांडले. यावेळी अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप ’ स्पर्धेचा शुभारंभ वर्षा निवासस्थानी करण्यात आला.


यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अभिनेते आमिर खान,  मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 'कन्व्हर्जन्स, कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन’ या तीन बाबींवर विशेष भर द्यावा. योजनांचे एकत्रीकरण, त्याबाबतची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे आणि सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजित जलसंधारणाची सर्व कामे पूर्ण करावीत. प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून प्रशासनाने ग्रामस्थांच्या आधी तयारीत राहून कामांना गती द्यावी.


गावांमध्ये वॉटरशेड आणि सूक्ष्म जलसिंचनाचे शास्त्रीय नियोजन करून सर्व आवश्यक उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ उपक्रमामुळे जलस्रोतांची क्षमता वाढण्यास आणि शेतीची सुपीकता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याच धर्तीवर यंदाच्या उपक्रमातही सर्व उपलब्ध योजनांचा समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.






शास्त्रीय पद्धतीने जलस्रोतांचे पुनरुज्जीवन


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली असून अनेक गावांमधील जलस्रोत आटले आहेत. ही परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची संधीही आहे. जलस्रोतांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून जलसंधारणाच्या माध्यमातून ते पुन्हा जलपरिपूर्ण करणे, भूजल पातळी योग्य राखणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे.



विभाग व संस्थानी समन्वयाने काम करावे


वॉटर कप स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या सर्व विभागांनी ‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टिकोनातून एकत्रित काम करावे. जलसंधारणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास व पंचायतराज, उमेद अभियान, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता,  व्हीबीजीरामजी, रोजगार हमी योजना, वन विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून उपलब्ध निधी, मनुष्यबळ आणि संसाधनांचा प्रभावी वापर करावा. जलसंधारण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांनीही या लोकचळवळीत सहभागी करून घ्यावे. यामध्ये कोणताही राजकीय भेद न ठेवता सर्वांनी सामूहिक संकल्प करून प्रत्यक्ष कृतीतून कामाला सुरुवात करावी. जलयुक्त शिवार अभियान ३.० आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची सांगड वॉटर कपशी घालून उपलब्ध निधी, मनुष्यबळ आणि संसाधनांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या उपक्रमासाठी राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.



जलयुक्त शिवार आणि वॉटर कपच्या अनुभवाचा उपयोग करावा


महाराष्ट्राने यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान आणि वॉटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. या कामांची दखल देशपातळीवर घेण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या जलसंधारणाच्या कामांचा उल्लेख करून अन्य राज्यांनीही या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राजस्थान, तेलंगणा यांसह विविध राज्यांतील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन या कामांची माहिती घेतली.
पूर्वीच्या कामांमधून आपल्याला अनेक अनुभव मिळाले आहेत. कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचीही आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे या अनुभवांचा उपयोग करून यावेळी अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध काम करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.



नगरपंचायत आणि नगरपरिषदांचाही समावेश करणार


वॉटर कप अभियानात नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करून त्यांच्या समावेशाबाबत स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.






पाणी फाउंडेशनसह सर्व यंत्रणांना शुभेच्छा


या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पाणी फाउंडेशनची टीम, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, तालुकास्तरीय यंत्रणा, सरपंच आणि ग्रामपंचायतींचे अधिकारी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. सर्वांनी या लोकचळवळीत सक्रिय सहभाग घेऊन गावांना जलसमृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



लोकसहभागातून गावागावांत जलसंधारण - मंत्री संजय राठोड


राज्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन गावागावांत जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने वॉटर कप  स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सुमारे २० हजार गावांचा सहभाग अपेक्षित असून, त्यासाठी सुमारे ८० हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


राज्यात यापूर्वी सन २०१६ ते २०१९ या कालावधीत ७६ तालुक्यांमध्ये ‘वॉटर कप स्पर्धा’ राबविण्यात आली होती. या स्पर्धेला गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर पाणी फाउंडेशनने ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू केली. यंदा अल्-निनो आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा ‘वॉटर कप स्पर्धा’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, तर जलद गतीने निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.


या स्पर्धेसाठी प्रत्येक गावातील किमान चार नागरिक किंवा स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार सुमारे ८० हजार नागरिक प्रशिक्षित होतील. पाणी फाउंडेशनमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘मास्टर ट्रेनर्स’च्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. लोकसहभागातून अधिकाधिक जलसंधारणाची कामे व्हावीत, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील ४० प्रशिक्षण केंद्रांवर १५ जानेवारी २०२७ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल आणि मे २०२७ या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून गावपातळीवर जलसंधारणाच्या कामांना चालना मिळणार असून, लोकसहभागातून जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याचे मंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले.



सामूहिक प्रयत्नांतूनच परिवर्तनकारी परिणाम - आमिर खान


‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या सुरुवातीच्या काळात राज्य शासनासोबत पाणी फाउंडेशननेही समांतरपणे काम केले. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या तीन वर्षांत ७५ तालुक्यांपर्यंत ही चळवळ पोहोचली. प्रशासन, सामाजिक संस्था, पाणी फाउंडेशन, विविध भागीदार आणि स्वयंसेवक यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांतून प्रभावी आणि परिवर्तनकारी परिणाम साध्य झाले, असे अभिनेता आमिर खान यांनी सांगितले.


सध्याची दुष्काळी परिस्थिती सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. पाण्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो. शेतकरी असो किंवा समाजातील अन्य घटक, प्रत्येकाच्या जीवनाचा पाण्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. या आव्हानात्मक परिस्थितीकडे ऐतिहासिक काम करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. राज्य आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि सामूहिक भावनेने काम करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाच्या माध्यमातून व्यापक लोकचळवळ उभी राहू शकते, असा विश्वास व्यक्त करून आमिर खान म्हणाले की, सर्वांनी पूर्ण ताकदीने, समर्पित भावनेने आणि एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ही चळवळ अधिक व्यापक व प्रभावी होईल. सामूहिक सहभागातून महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्याचे ऐतिहासिक उद्दिष्ट निश्चितच साध्य करता येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा ! सुनेत्रा पवार पहाटेच बारामतीत, विकासकामांचा घेतला आढावा

बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर)

कन्फर्म रेल्वे तिकीट वाया जाणार नाही! ऐनवेळी दुसर्‍याच्या नावावर असा करा बदल; जाणून घ्या...

मुंबई: रेल्वे प्रवासाचे नियोजन केल्यानंतर अचानक काही अडचण आल्यावर अनेकदा कन्फर्म तिकीट झालेलं तिकिट आपल्याला

Prahaar Marathi News Live, 28 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 11 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

MPSC Group C Exam 2026 : MPSC गट-क परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; आता 29 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group C Exam 2026) साठी अर्ज करण्याची

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास