नाशिक : संभाव्य दुष्काळाचे आव्हान लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी नियोजन करावे. रोजगार, पाणीपुरवठा आणि पशुधनाच्या गरजांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महाजन म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा आणि रोजगाराची कमतरता भासू नये. सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून जबाबदारीने काम करावे. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करावीत. कायदा व सुव्यवस्था, अखंडित वीजपुरवठा आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण याकडेही लक्ष द्यावे. विकासकामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गती देतानाच दुष्काळी नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. गोदावरीत सांडपाणी मिसळू नये, यासाठी सांडपाणी वाहिन्या व प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू असून, चार ते पाच महिन्यांत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कुंभमेळ्यापूर्वी रामकुंड परिसरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शहरात सुमारे ७० हजार झाडे लावण्यात आली असून, त्यांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खत दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पायाभूत सुविधा, इमारतींची दुरुस्ती आणि शैक्षणिक गरजांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच पुढील नऊ महिन्यांतील संभाव्य दुष्काळ लक्षात घेऊन पाणी, चारा आणि रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन करण्याचे आवाहन केले. आमदार सुहास कांदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सिंहस्थ कुंभमेळा व जिल्हा वार्षिक योजनेतील विकासकामांचा आढावा सादर केला. या कामांमुळे स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शून्य अपघात’चे लक्ष्य, आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांना वेग
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरक्षित आणि अपघातमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीला वेग दिला आहे. संभाव्य धोके, ...
१२०३ कोटींचा विकास आराखडा मंजूर
नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असला, तरी मागील वर्षांतील अपूर्ण कामांचे दायित्व अर्थात ‘स्पिल ओव्हर’ यंदाही नियोजनातील मोठा अडथळा ठरत आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला १ हजार ५५१ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला आहे. मात्र, त्यातील मोठा हिस्सा जुन्या कामांची देणी भागविण्यासाठी खर्च होणार आहे. ४४८.७६ कोटी रुपयांचे प्रलंबित दायित्व लक्षात घेता, नव्या विकासकामांसाठी १२०३ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
सर्वसाधारण योजनेवर ४४८.७६ कोटींचा स्पिल ओव्हर
२०२४-२५ मधील ३२९.४४ कोटी रुपयांच्या दायित्वापैकी १७४.४२ कोटी रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर २०२५-२६ मधील २९३.७४ कोटी रुपयांच्या दायित्वाची भर पडल्याने यंदा एकूण प्रलंबित दायित्व ४४८.७६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मंजूर नियतव्ययातील ४६.५ टक्के निधी जुन्या कामांची देणी भागविण्यासाठी खर्च होणार आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेतही निधी रखडला
अनुसूचित जाती उपयोजनेतील ३३.०१ कोटी रुपयांच्या जुन्या दायित्वापैकी केवळ ३.८५ कोटी रुपये अदा करण्यात आले असून, २९.१६ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, नोव्हेंबरअखेर नव्या कामांसाठी एक रुपयाचाही निधी वितरित झालेला नाही.
कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट
गोदावरीत सांडपाणी मिसळू नये, यासाठी सांडपाणी वाहिन्या व प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू आहेत. आगामी चार ते पाच महिन्यांत ही कामे पूर्ण करून कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणीपूर्वी रामकुंड परिसरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुहास कांदे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार पंकज भुजबळ, आमदार गोकुळ गीते, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. कश्मिरा संख्ये (कळवण), जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, प्रकाश काळे आदी उपस्थित होते.