Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘शून्य अपघात’चे लक्ष्य, आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांना वेग

१५ डिसेंबरपूर्वी विभागनिहाय आराखडे पूर्ण करण्याचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश; गर्दी व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षितता आणि आपत्कालीन यंत्रणेचा आढावा

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरक्षित आणि अपघातमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीला वेग दिला आहे. संभाव्य धोके, गर्दी व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, औद्योगिक सुरक्षितता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेत विविध शासकीय विभागांनी आपापले कृती आराखडे सादर केले. सर्व विभागांनी १५ डिसेंबर २०२६ पूर्वी आराखडे पूर्ण करावेत, असे निर्देश कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले असून, ‘शून्य अपघात’ हेच या नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी विविध यंत्रणांनी दृकश्राव्य माध्यमातून विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांचे सादरीकरण केले. संभाव्य आपत्ती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीतील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली.


या बैठकीस नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, कुंभमेळा तहसीलदार मकरंद दिवाकर यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, नाशिक महानगरपालिकेतील संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विभागप्रमुख आणि सल्लागार उपस्थित होते.


कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने गर्दीचे नियोजन, जोखीम ओळखणे, अग्निसुरक्षा, अखंडित पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांची सुरक्षितता यावर भर देण्यात आला. तसेच उपलब्ध मनुष्यबळ, वाहने व यंत्रसामग्रीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली. अंतर्गत व बाह्य वाहनतळ, पार्किंग क्षमता आणि भाविकांची सुरक्षित वाहतूक यांचे नियोजनही चर्चेत घेण्यात आले.






औद्योगिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कारखान्यांमधील सुरक्षा व्यवस्था, धोकादायक रसायने व वायूंचे उत्पादन, साठवणूक, हाताळणी आणि वाहतूक याबाबत माहिती सादर करण्यात आली. रसायने किंवा वायूंची गळती, आग आणि स्फोट यांसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या सज्जतेवर भर देण्यात आला.


आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्या, संपर्क व्यवस्था, परस्पर समन्वय, आवश्यक प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक सराव याबाबतही चर्चा झाली. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता संबंधित विभागांनी नोंदविल्यास, उपलब्ध मनुष्यबळाच्या अनुषंगाने प्राधिकरण स्तरावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सर्व विभागांना कळविण्यात आले.


दरम्यान, मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी १५ डिसेंबर २०२६ पूर्वी सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन करण्यासाठी सर्व विभागांनी सक्षम कृती आराखडे तयार करून परस्पर समन्वयातून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.






सिंहस्थ आपत्ती व्यवस्थापनाची प्रमुख उद्दिष्टे


‘शून्य अपघात’ : सुरक्षित आणि अपघातमुक्त सिंहस्थ कुंभमेळा.


१५ डिसेंबर २०२६ : सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे पूर्ण करण्याची मुदत.


गर्दी व्यवस्थापन : भाविकांची सुरक्षित ये-जा आणि वाहनतळांचे नियोजन.


सुरक्षा व्यवस्था : अग्निसुरक्षा, औद्योगिक सुरक्षितता आणि धोकादायक रसायनांपासून बचाव.


आपत्कालीन सज्जता : मनुष्यबळ, वाहने, यंत्रसामग्री आणि संपर्क यंत्रणा.


स्वयंसेवक व्यवस्था : विभागांच्या मागणीनुसार प्राधिकरण स्तरावर उपलब्ध मनुष्यबळातून कार्यवाही.


विभागीय समन्वय : प्रशिक्षण, प्रात्यक्षिक सराव आणि प्रभावी अंमलबजावणी.

Comments
Add Comment

मधमाश्यांच्या मोहळाचा जीवघेणा हल्ला ! 75 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

धुळे : मधमाश्यांच्या मोहळाने केलेल्या अचानक हल्ल्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

नाचणी म्हणजे सुपरफूड, पण 'या' 3 प्रकारच्या लोकांनी खाण्यापूर्वी सावध व्हा! हिवाळ्यात वाढू शकतो त्रास

मुंबई : हिवाळा सुरू होताच आहारात पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. नाचणी अर्थात

Nashik : नाशिकच्या दुगांव ग्रामपंचायतीला 1 कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात मारली बाजी

Nashik : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्याने विभागस्तरावर उल्लेखनीय यश संपादन

Bank Holiday December 2026 : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस राहणार बंद ? RBI ची सुट्ट्यांची यादी जाहीर

Bank Holiday December 2026 : जर तुम्ही डिसेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी

Sunetra Pawar : अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा ! सुनेत्रा पवार पहाटेच बारामतीत, विकासकामांचा घेतला आढावा

बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर)

हिवाळ्यात अचानक उदासी, चिडचिड का वाढते? 'विंटर ब्लूज' दूर करण्याचे सोपे उपाय!

हिवाळा सुरू झाला की काही लोकांना अचानक उदासी, चिडचिड, थकवा आणि मनःस्थितीत बदल जाणवू लागतात. काहीवेळा कामात रस कमी