Saturday, November 28, 2026

मधमाश्यांच्या मोहळाचा जीवघेणा हल्ला ! 75 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

धुळे : मधमाश्यांच्या मोहळाने केलेल्या अचानक हल्ल्यात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील जापी गावाजवळ घडली आहे. या हल्ल्यात मधमाश्यांनी वृद्धाला शरीरावर अनेक ठिकाणी डंख मारल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, जोगिलाल मोतीलाल गुजर (वय ७५, रा. सायणे, ता. जि. धुळे) हे शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घरातून बिलाडी रस्त्याने जापी गावाच्या दिशेने जात होते. यावेळी जापी गावाजवळील अमरधाम परिसरात अचानक त्यांना मधमाश्यांच्या मोठ्या मोहळाचा सामना करावा लागला.

काही समजण्याच्या आतच मधमाश्यांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला. मधमाश्यांनी शरीराच्या अनेक भागांवर डंख मारल्याने गुजर यांना तीव्र त्रास होऊ लागला. या हल्ल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मधमाश्यांचा झुंड तेथून निघून गेला होता. यानंतर ग्रामस्थांनी जखमी अवस्थेतील जोगिलाल गुजर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मधमाश्यांच्या डंखांमुळे झालेल्या गंभीर त्रासातून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकस्मात मृत्यू क्रमांक १७०/२०२६ असा असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर सायणे आणि जापी परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी परिसरात मधमाश्यांचे मोहळ दिसल्यास त्याच्या जवळ जाणे टाळावे, सुरक्षित अंतर राखावे आणि तातडीने संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >