Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान अश्लील वक्तव्य आणि आक्षेपार्ह कृती केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी विद्यापीठाच्या सुरक्षा प्रमुखांनी तक्रार दिल्यानंतर वाघोडिया पोलिसांनी भुवन बामविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमातील कथित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली.
पारुल युनिव्हर्सिटीमध्ये झाला होता कार्यक्रम
25 नोव्हेंबर रोजी वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया तालुक्यातील लिमडा गावात असलेल्या पारुल युनिव्हर्सिटीमध्ये 'द लवारी शो' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या 'कॉमेडी फॅक्टरी' ग्रुपतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भुवन बामसोबत अभिनेत्री संजीदा शेख, मनन देसाई, चिरायू मिस्त्री आणि दीप वैद्य हे कलाकार सहभागी झाले होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. (Bhuvan Bam)
संजीदा शेखसमोर अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप
तक्रारीनुसार, कार्यक्रमादरम्यान भुवन बामने अभिनेत्री संजीदा शेख हिच्याकडे पाहून अश्लील आणि दुहेरी अर्थाची टिप्पणी केली. याशिवाय हातातील पाण्याची बाटली कमरेजवळ धरून लघवी केल्यासारखी कृती केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भुवनवर टीका होत आहे.
विद्यापीठाच्या सुरक्षा प्रमुखांची पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर पारुल युनिव्हर्सिटीचे सुरक्षा प्रमुख महेंद्रप्रताप सिंह यांनी वाघोडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विद्यापीठाने कार्यक्रमाला परवानगी देताना शैक्षणिक संस्थेची प्रतिष्ठा आणि शिस्त राखण्याची अट आयोजकांना घातली होती. मात्र, कार्यक्रमात असे आक्षेपार्ह वर्तन होईल, याची प्रशासनाला पूर्वकल्पना नव्हती, असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
कलम 296 अंतर्गत गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी वाघोडिया पोलिसांनी भुवन बामविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 296 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपांबाबत भुवन बामची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यास प्रकरणातील पुढील घडामोडी स्पष्ट होतील.