Home संपादकीय तात्पर्य अपवादात्मक दातृत्व

अपवादात्मक दातृत्व

0

सध्या जगात सर्वत्र भ्रष्टाचार सुरू आहे, स्वार्थ वाढलेला आहे, असे सतत आपल्या कानावर आदळत असते. जगात काही चांगले आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती असते.

सध्या जगात सर्वत्र भ्रष्टाचार सुरू आहे, स्वार्थ वाढलेला आहे, असे सतत आपल्या कानावर आदळत असते. जगात काही चांगले आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती असते. परंतु काही वेळा माणुसकीचे असे दर्शन घडते की, चांगुलपणावरचा विश्वास वाढतो. अशी एक घटना नवी दिल्लीत घडली. २६/११/२००८ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला. त्यातला प्रमुख आरोपी म्हणजे अजमल कसाब. या कसाबचा सर्वोच्च न्यायालयातील खटला राजू रामचंद्रन आणि गौरव अग्रवाल या वकिलांनी लढवला. त्यांनीच हे माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अजमल कसाब याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालयाने ती कायम केली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कसाब पाकिस्तानात राहणारा आहे. म्हणून त्याला सर्वोच्च न्यायालयाने सरकारी खर्चाने वकील दिला. ज्येष्ठ विधिज्ञ राजू रामचंद्रन आणि त्यांचे कनिष्ठ सहकारी गौरव अग्रवाल यांनी हे काम पाहिले. या दोघांनी आपल्यापरीने खटला लढवला आणि कसाबची फाशी सर्वोच्च न्यायालयातसुद्धा कायम झाली. तो केस हरला असला तरी त्याला सरकारने वकील दिलेला होता. त्यामुळे त्या वकिलांची फी देणे हे सरकारचे कर्तव्य होते. ही फी किती असावी हे न्यायालय ठरवते. राजू रामचंद्रन यांना न्यायालयाने ११ लाख रुपये व त्यांचा कनिष्ठ सहकारी गौरव अग्रवाल याला ३.५० लाख रुपये फी मंजूर केली. या दोघांनीही ही फी घेण्यास नकार दिला. ‘आपण व्यवसाय म्हणून हा खटला लढवलेला नव्हता, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आपद्धर्म म्हणून आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणून आपण हे काम केले, १६६ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अशा नराधमाची वकिली करणे तसे अनतिकच होय. म्हणून आपण ही फी स्वीकारणार नाही,’ असे या दोघांनी जाहीर केले आणि आपल्याला मिळालेली ही रक्कम २६/११तील हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या मुंबईच्या १८ पोलिसांच्या वारसांना तसेच अन्य अशाच सुरक्षा सनिकांच्या वारसांना देऊन टाकावेत, अशी इच्छा सर्वोच्च न्यायालयाकडे व्यक्त केली. न्यायालयाने सुद्धा या दोन वकिलांचा गौरव करून ही रक्कम शहिदांच्या वारसांना द्यावी, असा आदेश सरकारला दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अफताब आलम आणि सी. के. प्रसाद या दोघांसमोर हा खटला चालला. त्यामुळे या दोघा वकिलांनी आपल्याला मिळालेली फी या दोघांकडेच सुपूर्द केली. जगामध्ये अजूनही माणुसकी आहे, असे न्यायमूर्तीनी म्हटले; मात्र त्याचबरोबर या दोघा वकिलांनी वकिली व्यवसायातील उच्च मूल्यांचे जतन करत औदार्यही दाखवले. एका बाजूला मनात देशभक्तीची भावना आणि दुस-या बाजूला कर्तव्याची भावना होती. या दोन्हीमध्ये न अडकता या दोघांनीही वकिलीही केली अन् त्यातून मिळालेली मोठी रक्कम शहिदांच्या नातेवाइकांना देऊन एक चांगला आदर्शही घालून दिला. देशासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असणारे असे लोक समाजाच्या विविध स्तरात निर्माण झाले पाहिजेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version