Home रिलॅक्स अभिनयातला ‘ललित’

अभिनयातला ‘ललित’

1

‘गंध फुलांचा गेला सांगून’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ या दोन मालिकांमधून मराठी मालिकांमध्ये जोरकसपण चमकणारं आणि तरुणींच्या गळ्यातलं ताईत बनलेलं एक नाव म्हणजे ललित प्रभाकर.
साधारण मालिका म्हटल्या की, त्यांचं कथानक हे ‘किचन पॉलिटिक्स’ किंवा सासू-सुनेचं भांडण या चाकोरीमध्येच फिरत असते. या रोजरोजच्या रटाळ कथेपेक्षा वेगळाच विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय तो झी मराठीच्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने. लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोचं दुस-याच मुलावर प्रेम आहे, हे कळूनसुद्धा तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तिला सांभाळून घेणारा, थोडक्यात काय तर समजूतदार नव-याची भूमिका करणारा आदित्य म्हणजे ललित प्रभाकर. अल्पावधीतच तरुणींच्या ‘चॉकलेट हिरों’च्या यादीत समाविष्ट झाला.

मालिकांमध्ये त्याची एंट्री झाली ती सात-आठ महिन्यांपूर्वी, ‘ई टीव्ही’वरच्या ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतून. या मालिकेमध्ये ललित खलनायकाच्या होता. ललितबद्दल सांगायचं तर पडद्यावर साकारत असलेल्या ‘आदित्य’ या पात्रात आणि त्याच्यात तीळमात्रही फरक नाही, त्याची बोलण्याची, स्वत:चे विचार मांडण्याची पद्धतही इतकी आदित्यसारखी की, मालिकेतला एखादा शॉट चालू आहे आणि तो कॅमे-यासमोर टेक देतोय, असंच वाटतं. मालिकेत तो जेवढा समजूतदार, अदबीने बोलणारा दाखवला तसाच तो ख-या आयुष्यातही आहे.

अभिनयाची आवड त्याला शाळेत असल्यापासून लागली, अशी माहिती देत तो सांगतो ‘तिसरी-चौथीत असताना मी आणि माझे मित्र फावल्या वेळेत शाळेत टाइमपास म्हणून अभिनय नाही, पण तसंच काहीतरी करत असू. त्यामुळे आमचा वेळ चांगला जायचा. शाळेत असताना मी कथाकथन स्पर्धेत भाग घ्यायचो, त्यातून आत्मविश्वास वाढत गेला आणि पुढे या गोष्टीची आवड होत गेली.’

कॉलेजच्या नाट्यस्पर्धातून त्याला संधी मिळाली. सवाईमध्ये त्याची एकांकिका पहिली आली. त्यामुळे त्याला कॉलेजमध्ये असताना टीव्हीवरच्या मालिकेत छोटेखानी भूमिका करायला मिळाली, पण केवळ रंगभूमीवरच काम करत राहायचं, ऑडिशनबद्दल काही कळलं तर जाऊन ऑडिशन द्यायची, झाली निवड तर ठीक नाहीतर पुन्हा जुन्या कामांमध्ये लक्ष द्यायचं असा त्याचा फंडा. ललित अभिनयाबरोबर प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन, सेट डिझायनिंग, लाइट्स देणं यांसारखी कामंही करतो.

‘कॉलेजमधल्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी केवळ अभिनयच शिकलो असो, नाही तर बॅकस्टेजलाही काम केलं. मी स्वत:ला खूप नशीबवान मानतो, कारण काही जण फक्त अभिनयच शिकतात, पण मला तांत्रिक बाबीसुद्धा हाताळायला मिळाल्या, याचा फायदा मला आता होतोय. राज्य नाट्यस्पर्धेत मी आमच्या नाटकांसाठी लायटिंगचं काम केलं होतं. त्यासाठी आणि सेट डिझायनिंगसाठीही मला पारितोषिक मिळालं’.

ललित हा रंगभूमीत भावनिकदृष्टया गुंतलेला कलाकार आहे, आपल्या नव्या विचारांनी तो नाटकांमध्ये बदल घडवू पाहतोय. त्यात धडपड करतोय, हे त्याचं काम पाहून लक्षात येतं, नाटकाबद्दलची त्याची असलेली ओढ त्याच्या ‘पोकळी’ या कवितेतून जाणवते,

इथे मनाच्या नेपथ्याला खिडक्या आहेत, पण विंगाच नाहीत,
पडद्याखालून उंदीर घुसू शकतील एवढीच फट
बहि-या पडद्याला प्रकाशाचा आवाजच येऊ नये,
मग तो पडणार तरी कसा?
वेळेला लघवी लागलीये, पण तीसुद्धा अडकलीये पिठात
आणि नजर मरत चालली आहे, प्रेक्षकांच्या कुजबुजीत
पोकळी.. मोकळी नेहमीच..


मालिकेचं शूटिंग करता करता त्याचे प्रायोगिक नाटकांचे प्रयोगही चालूच असतात, नाटकांत किंवा मालिकांमध्ये नुसता अभिनय करायचा एवढंच त्याचं ध्येय नाही, अभिनय सोडून त्याला स्वत:चं असे विचार आहेत, वाचनाची गोडी आहे हे त्याच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवत होतं. ‘आपले विचार किंवा पूर्वग्रह मोडून काढून, जे लिखाण किंवा जी गोष्ट आपल्याला विचार करायला लावते, ते सर्व मला वाचायला. उदय प्रकाश, श्याम मनोहर यांची पुस्तकं मी आवडीने वाचतो.’

ललितच्या फेसबुक अकाउंटवर गेलं की, त्यात काय त्याचेच फोटो बघायला मिळतील, असंच प्रेक्षकांना वाटेल. पण सोशल मीडियाचा वापर केवळ स्वत:चे फोटो टाकण्यासाठी करण्यापेक्षा आपल्या कविता प्रयोगांची यादी त्यावर टाकतो. त्याने केलेल्या कविताही अगदी वेगळ्याच, ‘याने हे असं का लिहिलंय,’ असा प्रश्न उमटवणा-या. पण त्यात वेगळेपण जाणवतं ते त्याचं कव्हर पिक्चर पाहून. त्याचं कव्हर पिक्चर चार्ली चॅप्लिनचं आहे. यात वेगळं आणि आश्चर्य वाटण्यासारखं असं काहीच नाही, पण आपल्या विनोदी अभिनयातून जीवनातील दु:ख बाजूला सारून जगभरातल्या प्रेक्षकांना खळखळून हसवणारा चार्ली चॅप्लिन त्याच्यासाठी अभिनयाच्या क्षेत्रात गुरूच्या स्थानी आहे.

अल्पावधीत ललितला प्रसिद्धी मिळाली, प्रेक्षकांना त्याची आदित्यची भूमिका आवडली, ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. असं असताना कामामुळे चाहत्यांसमोर फार कमी वेळा स्वत:ला सादर करण्याची संधी मिळाली, ही खंत मात्र त्याने बोलून दाखवली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version