Home टॉप स्टोरी अमरनाथ हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात

अमरनाथ हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात

1

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीनगर –  जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा ही संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. उत्तर प्रदेशात कावड यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे, तर गृह मंत्रालयाचे एक पथक श्रीनगरला रवाना झाले आहे.

अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर- ए-तोयबाचा हात आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली.अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले. बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले घडवले. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक हे महाराष्ट्रातील पालघरचे आहेत. जखमींमध्ये महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली होती. दहशतवादी हल्ल्यात पालघरच्या डहाणूमधील रहिवासी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा मृत्यू झाला आहे. भाविकांची ही बस गुजरातच्या वलसाडमधील ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारत अशा भ्याड हल्यांपुढे आणि द्वेषमुलक कृत्यांपुढे कधीच झुकणार नाही, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत झालेले हल्ले
दरम्यान अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांनी यापूर्वीही अनेकदा लक्ष्य केलेले आहे. २००० साली पहलगाम बेस कॅम्पवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ३० भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ६० पेक्षा अधिक भाविक जखमी झाले होते.दहशतवाद्यांनी २००१ साली कॅम्पवर हँडग्रेनेड फेकले, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले होते. याच्या पुढील वर्षी म्हणजे जुलै २००२ साली दहशतवाद्यांनी भाविकांवर हँडग्रेनेड फेकले, ज्यामध्ये दोन भाविकांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण जखमी झाले होते.दहशतवाद्यांनी ६ ऑगस्ट २००२ रोजी भाविकांच्या कॅम्पवर हल्ला केला. ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले होते. २००६ साली पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला लक्ष्य केले. यामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला होता, तर यावेळी ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

काश्मीर लष्कराकडे सोपवा, युद्ध पुकारा -तोगडिया
जम्मू-काश्मीरमधील मेहबुबा मुफ्तींचे सरकार बरखास्त करून केंद्राने तिथे लष्कराला ‘फ्री हँड’ द्यावा आणि इस्लामी जिहादी दहशतवादाविरोधात थेट युद्ध पुकारावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.काश्मीरमधील मुस्लिम आपल्या जवानांवर हल्ले करताहेत. त्यामुळे देशातील जनतेने काश्मिरी वस्तूंवर बहिष्कार घालून त्यांची आर्थिक कोंडी करावी,असे आवाहनही त्यांनी केले. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. अशावेळी विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला भलताच जहाल उपाय सुचवला आहे. आपल्या जवानांवर दगड फेकणा-या मुस्लिमांबद्दल मेहबुबा मुफ्तींना कळवळा वाटतो. त्या तरुणाला बक्षीस दिले जाते. असले सरकार काय कामाचे? केंद्राने हे सरकार बरखास्त करून जम्मू-काश्मिरात लष्करी राजवट लागू करावी. लष्कराला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, पण तिथले मुस्लीम आपल्या लष्करावरच दगड फेकताहेत, त्यांना देशातील जनताच बहिष्कारास्त्र उगारून अद्दल घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील मृतांच्या वारसाला १० लाखांची मदत
अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील उषा सोनार आणि निर्मला ठाकूर या दोन महिलांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा निषेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून मृत्युमुखी पडलेल्या सोनार आणि ठाकूर यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. काश्मीरहून त्यांचे पार्थिव डहाणू येथे आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहितीही त्यांनी व्टिटरद्वारे दिली. तसेच या हल्ल्यात महाराष्ट्रातून यात्रेला गेलेले काही यात्रेकरूही जखमी झाले असून त्यांना जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने भारत सरकार व काश्मीर सरकारशी सातत्याने संपर्क साधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हल्ल्यानंतरही भाविक यात्रेसाठी रवाना
अमरनाथ यात्रेतील भाविकांवर सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला होऊनही मंगळवारी पहाटे भाविकांचा जत्था अमरनाथ गुफेकडे रवाना झाला. हल्ल्यानंतरही यात्रेकरूंचा उत्साह कमी झाला नसल्याचे दिसत होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास जम्मू बेस कॅम्पहून ३२७९ भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. यावेळी भाविकांनी बम बम बोले, हर हर महादेवच्या गजर करत आपला उत्साह कमी होऊ दिला नाही. हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

1 COMMENT

  1. १ way- make unique कमांडो (black)सिस्टिम इन ओव्हर ऑल कंट्री तो कंट्रोल rape, अटॅक अँड crime at एव्हरी पोसिशन.
    २ WAY.कॉन्व्हरर्ट CRPF, SRPF, BSF, पॅरा कमांडो इन TO “ब्लॅक कमांडो” विथ ADVANCED WEAPONS अँड प्रोटेक्टिव्ह EQUIPMENTS.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version