Home टॉप स्टोरी पुरस्कारवापसी सुरूच

पुरस्कारवापसी सुरूच

1

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात बॉलिवूडच्या दिग्गजांनीही दंड थोपटले आहेत.


मुंबई- देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात बॉलिवूडच्या दिग्गजांनीही दंड थोपटले आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज कुंदन शहा, सईद मिर्झा, विरेंद्र सैनी यांच्यासह विविध २४ जणांनी गुरुवारी पुरस्कार परतीची घोषणा केली. दरम्यान, लेखिका अरुंधती रॉय यांनीही दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.

बॉलिवूडमधील कलावंत, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुरस्कार परतीची घोषणा केली.  ‘जाने भी दे यारो’ चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन शहा, एफटीआयआयचे माजी चेअरमन सईद मिर्झा, एफटीआयआयचे माजी अधिष्ठाता वीरेंद्र सैनी, तरुण भारतीय, मधुश्री दत्ता, अनवल जमाल, अजय रैना, विवेक सचिदानंद, संजय काक, तपन बोस, मंजू लोबो, रफी इलिएस, अमिताभ चक्रवर्ती, पी. एम. सतीश, सुधाकर रेड्डी अशा २४ नामवंत दिग्दर्शक, संकलक, कॅमेरामनचा समावेश आहे.

नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील सर्व महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मोठया प्रमाणात हस्तक्षेप केला जात आहे. यामुळे अनेक संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट आणि चेन्नई आयआयटीत हे घडले आहे.

देशभरात विचारवंत, लेखकांवर हल्ले केले जात आहेत, त्यामुळे सत्य बोलायची भीती वाटू लागली आहे. लोकशाही मार्गाने संप केलेल्या विद्यार्थ्यांचे संप मोडण्यासाठी पोलिसी बळाचा वापर होत आहे. हा सर्व प्रकार असहिष्णुतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही पुरस्कार परत करून निषेध करत आहोत, असे या कलावंतांनी सांगितले.

आम्हाला पुरस्कार वापसी निषेधाचे हत्यार वाटते असे स्पष्ट करत देशातील पुढचा काळ कोण बरोबर, कोण चूक हे ठरवेल, असे भाकीत कुंदन शहा यांनी व्यक्त केले. भारतीय घटनेच्या विरोधात मोदी राजवटीत अनेक गोष्टी होत आहेत, असा आरोप दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी केला.

दिवसाढवळया साहित्यिक, विचारवंतांची हत्या आणि विचारस्वातंत्र्यावर आणली जाणारी गदा हे भयंकर आहे. यासाठी आपल्याला मिळालेले तीन राष्ट्रीय पुरस्कार परत करत असल्याचे मधुश्री दत्ता यांनी सांगितले.   

1 COMMENT

  1. मिळालेले पैसे परत करणार आहेत का ? त्या पुरस्काराची किंमत कधीच संपली. पैसे परत द्या.. ४ लोकांची घरे चालतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version