Home मजेत मस्त तंदुरुस्त अवयवही म्हातारे होतात!!!

अवयवही म्हातारे होतात!!!

1

बालपण, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था या जीवनाच्या तीन महत्त्वाच्या अवस्था आहेत. साधारणत: वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता मंदावण्यास सुरुवात होते. मात्र प्रत्येक अवयव वृद्ध होण्याचा एक ठरावीक कालावधी असतो. त्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती..

मेंदू आणि फुफ्फुसं हे दोन अवयव आपल्याला आपण वृद्धत्वाकडे झुकत असल्याची जाणीव करून देतात. खरं तर निरनिराळया अवयवांची लढण्याची क्षमता ही वाढत्या वयाबरोबर कमी होत जाते. एका फ्रेंच डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की, माणासाचे शुक्राणू हे वयाच्या ३५व्या वर्षानंतर वृद्ध व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे वयाच्या पस्तीशीनंतर व्यक्तीच्या गर्भधारणेची परिणती ही गर्भपातात होते. यावरून माणसाच्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या तंदुरुस्तीचा एक विशिष्ट कालावधी असतो.

मेंदू (ब्रेन) : विसाव्या वर्षापासूनच मेंदू म्हातारा व्हायला सुरुवात होते. मेंदूमध्ये असणा-या पेशींची (न्युरॉन्स) संख्या आपल्या वाढत्या वयाबरोबर कमी कमी होत जाते. सुरुवातीला आपल्या मेंदूमध्ये १०० दशलक्ष पेशी असतात. चाळीशीनंतर १०,००० पेशी एका दिवसाला कमी व्हायला सुरुवात होते.

डोळे (आईज) : वयाच्या चाळीशीनंतर डोळ्यांची जवळच्या वस्तू पाहण्याची क्षमता कमी होते. माणसाला चष्मा लागतो. त्यामुळेच चष्म्याला चाळीशी म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे.

ऐकणं (हिअरिंग) : ५५ वर्षापर्यंत नीट ऐकता येतं. जवळजवळ ६० वर्ष वय झालेले अर्धेअधिक लोक त्यांची ऐकण्याची क्षमता गमावतात किंवा ती कमी होते.

आवाज (व्हॉईस) : एखादा अपघात किंवा शारीरिक दोष वगळता वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत आपल्याला नीट ऐकता येतं. आपला आवाज वाढत्या वयासोबत कमी आणि घोगरा होत जातो. आवाजाच्या पेटीतील पेशी क्षीण झाल्यामुळे आवाजाचा कर्कशपणा आणि दर्जा कमी होत जातो. एखाद्या स्त्रीचा आवाज हा घोगरा आणि लहान होऊ शकतो. एखाद्या पुरुषाचा आवाज हा बारीक आणि मोठा होतो.

चव आणि वास (टेस्ट आणि स्मेल) : वयाच्या साठीपर्यंत आपल्याला नीट ऐकता येतं. सुरुवातीला आपल्या जिभेवर जवळजवळ १०,००० चव घेणा-या काळ्या (टेस्टबड्स) असतात. नंतर ही संख्या अध्र्यावर येऊ शकते. आपण ६० वर्षाचे झाल्यावर चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होत जाते.

दात (टीथ) : सर्वसाधारणपणे चाळीशीपर्यंत दात चांगले तंदुरुस्त असतात. जसजसं आपलं वय वाढतं, आपल्या तोंडातील लाळेचं प्रमाण (सलायव्हा) कमी होतं. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया (सूक्ष्म जंतू) वाहून नेले जातात. त्यामुळे आपले दात आणि हिरडया किडू लागतात. चाळीशीनंतर आपल्या हिरडय़ा खराब होण्यास सुरुवात होते.

स्तन (ब्रेस्ट ) : स्त्रीच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून तिच्या स्तनातील चरबीचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे स्तनांचा आकार लहान होतो. चाळीशीपासून स्तन ओघळायला सुरुवात होते. नीपलचा भाग आक्रसतो.

हृदय : (हार्ट) : सर्वसाधारपणे वयाच्या चाळीशीपर्यंत काही अपवाद वगळता आपल्या प्रत्येकाचं हृदय चांगलं तंदुरुस्त राहतं. जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं आपल्या हृदयाची रक्त फेकण्याची क्षमता कमी होते. याचं कारण आहे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होत जाते. त्या कडक होतात. त्यांच्या आत चरबी साठून त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा कमी होतो. रक्तवाहिन्यांवर ताण पडतो. ४५ वर्ष वयाचे पुरुष आणि ५५ र्वष वयाच्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराची शक्यता जास्त असते.

फुप्फुसं (लंग्ज) : आपल्या वयाच्या विसाव्या वर्षापासूनच फुप्फुसांची क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. चाळीशीनंतर काही लोकांना श्वास कमी पडतो. याला कारणीभूत काही अंशी छातीचे स्नायू आणि छातीचा पिंजरा (रीब केज). हे दोन्ही आखडल्यामुळे श्वसनाची क्षमता कमी होते.

केस (हेअर) : पुरुषांमध्ये वयाच्या तिशीनंतर केस गळायला सुरुवात होते. केस हा त्वचेच्या खाली असलेल्या लहान पाऊचमध्ये तयार होतो. एका पाऊचमध्ये एक केस साधारणपणे ३ वर्ष वाढू शकतो. त्यानंतर तो गळून पडतो. नंतर नवीन केस तयार होतो. काही जणांचे केस ३५ र्वष वयातच पांढरे झालेले दिसतात. तारुण्यात केस काळे असतात. हा परिणाम आहे मेलॅनोसाईटचा.

यकृत (लिव्हर) : हा एकच अवयव आपल्या शरीरातील असा आहे की, तो खरं सांगतो की आपलं आता वय झालेलं आहे. कुठलंच व्यसन नसणा-या माणसाचं यकृत हे वयाच्या सत्तरीपर्यंत चांगलं राहतं.

आतडे (गट) : एका निरोगी आतडयात मित्रजंतूंचं (बॅक्टेरिया) आणि शत्रूजंतू यांचं प्रमाण संतुलित असतं. आपलं वय ५५ र्वष झाल्यानंतर मित्रजंतूंचं प्रमाण कमी कमी होत जातं. विशेषत: मोठया आतडयात, असं लंडनमधील एका इम्युनॉलॉजीच्या प्राध्यापकाचं म्हणणं आहे. म्हणूनच जरासं वय वाढत जातं तशी आपली पचनशक्ती कमी होत जाते. आतडयांचे रोग व्हायला सुरुवात होते. सर्वात जास्त उद्भवणारी व्याधी म्हणजे मलावरोध.

मूत्रपिंड (किडनी ) : वयाच्या पन्नाशीबरोबर मूत्रपिंड तसंच इतर अनेक रक्तातून घाण बाहेर काढणारे घटक (नेफ्रॉन्स) हे कमी व्हायला लागतात.

मूत्राशयावर असणारी ग्रंथी (प्रोस्टेट ग्लँड) : वाढत्या वयाबरोबर ही ग्रंथीसुद्धा आकाराने मोठी होत जाते. ज्यामुळे आपल्याला सारखं सारखं लघवी करायला जावं लागतं. ही ग्रंथी मोठी झाल्यावरही सर्वानाच त्रास होतो, असं नाही. ५० वर्षाच्या वयानंतर पुरुषांना हा त्रास उद्भवतो. तो चाळीशीच्या आधी कधीच होत नाही. टेस्टेस्टरोनचं प्रमाण वाढल्यामुळे या ग्रंथींच्या पेशींच्या संख्येत वाढ होते. ती आकाराने मोठी होते. सर्वसाधारणपणे या ग्रंथीचा आकार हा आक्रोडसारखा असतो. वाढल्यावर तो एका संत्र्यासारखा होतो.

मूत्राशय (ब्लॅडर) : ६५ वर्षाचे झाल्यानंतर मूत्राशयावरील ताबा कमी व्हायला सुरुवात होते. स्त्रियांमध्ये मूत्राशयाचे विकार जास्त होतात. पाळी बंद झाल्यानंतर इस्ट्रोजन या संप्रेरकाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे मूत्रनलिका (युरेथ्रा) पातळ आणि कमजोर होतात. मूत्राशयाला आधार राहत नाही. एका तरुणाच्या मूत्राशयाची कपॅसिटी (मूत्र साठवण्याची शक्ती) ही वृद्ध व्यक्तीच्या मूत्राशयाच्या क्षमतेपेक्षा दुप्पट असते. ३० वर्ष वयाच्या मूत्राशयाची क्षमता दोन कप असल्यास ७० वर्ष वयाच्या मूत्राशयाची क्षमता १ कप एवढी असते.

हाडं (बोन्स) : लिव्हरपूल येथील आइनट्री युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील एक प्राध्यापक रॉबर्ट मूट म्हणतात की, आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केवळ जुनं हाड ऑस्टिओक्लास्ट पेशींमुळे जेव्हा तुटतं तेव्हा त्या ठिकाणी नवीन हाड तयार करणा-या पेशी ज्याला ऑस्टिओब्लास्ट म्हणतात त्या येतात. या संपूर्ण प्रक्रियेला हाडांची उलाढाल (बोन टर्नओव्हर) असं म्हणता येईल. आपल्या संपूर्ण हाडांच्या सांगाडयाला तयार होण्यास फक्त दोन वर्ष लागतात. वृद्ध किंवा वयस्कर माणसांमध्ये याला १० वर्ष लागू शकतात. आपल्या पंचविशीपर्यंत हाडांची घनता वाढत असते. परंतु ३५ र्वष वय झाल्यानंतर ती हळूहळू कमी होत जाते.

स्नायू (मसल्स) : स्नायू हे सतत नवीन तयार होतात. तुटत असतात. ही प्रक्रिया मध्यमवयापर्यंत नियंत्रणात असते. पण आपण ३० वर्षाचे झाल्यानंतर स्नायू तुटण्याच्या प्रक्रियेपेक्षा नवीन स्नायू तयार होण्याची क्षमता कमी होते. एकदा का आपलं वय ४० वर्ष वयाचं झालं की, प्रत्येक वर्षाला दोन टक्के स्नायू आपण गमावत राहतो.

त्वचा (स्कीन ) : आपल्या वयाच्या पंचविशीनंतर त्वचा वृद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते.

प्रजननक्षमता (फर्टिलिटी ) : पस्तीशीनंतर स्त्रियांमधील प्रजननक्षमता कमी होत जाते. कारण अंडाशयातील अंडयांची संख्या कमी होते. तसंच गर्भाशयाचं आवरण पातळ होत जातं. एका शुक्राकरिता लागणारी वातावरणनिर्मिती ते करू शकत नाही.


कान, नाक आणि घसा या अवयवांची कार्यपद्धती मंदावण्याचं प्रमुख कारण आहे या अवयवांपर्यंत वाढत्या वयामुळे रक्तपुरवठा कमी होतो. स्त्रियांमध्ये कान, नाक आणि घशाच्या आजारांच्या समस्या या संप्रेरकांमध्ये बदल झाल्यामुळे निर्माण होतात.
– डॉ. प्रबोध कर्णिक (कान, नाक, घसातज्ज्ञ)


कमी प्रकाशात, चालत्या वाहनात वाचणं, टीव्ही बघणं, सतत कम्प्युटर समोर बसून कामं करणं..ही चाळीशीनंतर नजर कमी होण्याची कारणं आहेत. चाळीशीनंतर काचबिंदू (ग्लाऊकोमा) होऊ शकतो. यासाठी दर दोन दोन वर्षाच्या अंतराने डोळे तपासावेत.
– डॉ. सुनीता कर्णिक (ऑप्थॅल्मीक सर्जन)


हाडांचं आरोग्य वयाच्या पंचविशीपर्यंत सुधारतं. पंचविशीनंतर हाडं ठिसूळ होतात. त्यांची घनता कमी होत जाते. हाडांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार घेतला पाहिजे. चाललं पाहिजे. खेळलं पाहिजे. स्नायूंची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी प्रथिनयुक्त आहाराचा समावेश आहारात असला पाहिजे.
– डॉ. अविनाश दाते (ऑथरेपेडिक सर्जन)


यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. दारू, सिगारेट ओढणं यांसारख्या सवयी सोडल्या पाहिजेत. अति रिफाइंड तसंच पॉलिश पदार्थ, मसालेदार पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. रोज चालण्याचा व्यायाम करावा.
डॉ. चेतन कंथारिया (यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ)


केस गळण्याची कारणं निराळी आहेत. कधी केस संप्रेरकांच्या (हार्मोन्स) कार्यात बिघाड झाल्यामुळे गळू शकतात. कधी औषधांच्या तीव्र डोसमुळे तर कधी जीवनसत्त्वयुक्त आहारांची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास केस गळतात. शरीरात कोलॅजिनचं प्रमाण कमी झाल्याचा परिणाम त्वचेवर होतो. याच्यासाठी कोलॅजन, अ‍ॅँटिऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थाचा समावेश आहारात असला पाहिजे.
-डॉ. स्नेहल श्रीराम (डर्मेटोलॉजिस्ट)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version