Home महाराष्ट्र आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा सोमवारी, ३ मार्च रोजी सुरू होत आहे.
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा सोमवारी, ३ मार्च रोजी सुरू होत आहे.

राज्यातील २१ हजार ९ शाळांमधील एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यापैकी ९ लाख ५९ हजार ४५० मुले तर ७ लाख ७३ हजार ४४८ मुलींचा समावेश आहे. राज्यात ही परीक्षा शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांकडून घेण्यात येणार असून ती एकूण ४ हजार २२२ परीक्षा केंद्रावर होईल.

यात मुंबई विभागातून एकूण ३ लाख ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यातील ३ लाख ६० हजार ८३५ हे नियमित विद्यार्थी असून एकूण विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६ हजार ८५८ मुले, तर एक लाख ७५ हजार ५७९ मुलींचा समावेश आहे. तर विविध शाळांमधून खासगीरीत्या परीक्षेला ३९ हजार ६३ विद्यार्थी बसणार आहेत. मुंबई विभागीय मंडळात ही परीक्षा ६२९ मुख्य परीक्षा केंद्रांवर आणि १६२ उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.

तर कोकण विभागातून ६०५ शाळांतील ४१ हजार ५५५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा १०३ परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. यात २१ हजार ७७८ मुले तर १९ हजार ७७७ मुलींचा समावेश आहे.

दहावीची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे. ऑटिस्टिक (स्वमग्न) विद्यार्थ्यांना यंदा कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांनाही कर्णबधिर मुलांप्रमाणे एक भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.

परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात सातप्रमाणे एकूण २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. त्यासोबत विशेष भरारी पथके आणि जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकेही नेमण्यात आली आहेत. तर राज्यातील परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. इंग्रजी, गणित या विषयाच्या पेपरच्या दिवशी बैठे पथक कार्यान्वित करण्यासाठी विभागीय मंडळाच्या माध्यमिक शिक्षणाधिका-यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका

शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे बारावी परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांना यंदा पहिल्यांदाच परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर आकलन आणि वाचण्यासाठी मिळणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

परीक्षा केवळ ६०० गुणांची

यंदा दहावीची परीक्षा ही पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात येत असल्याने नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. तसेच पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार यंदाची ही परीक्षा ६०० गुणांची आहे. यामुळे गणित, सामान्य विज्ञान हे विषय दीडशे गुणांऐवजी १०० गुणांचे करण्यात आले आहेत.

भाषा विषयांसाठी सवलत

या परीक्षेत तीन भाषा विषयांच्या एकत्रित उत्तीर्णतेसाठी एकूण गुणांची बेरीज ही १०५ असणे आवश्यक आहे. मात्र एखाद्या भाषा विषयात कमीत कमी २५ गुण असले तरी त्यासाठी सवलत देऊन विद्यार्थ्यांला उत्तीर्ण म्हणून पात्र ठरविले जाईल. तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) या विषयाचे गुण हे श्रेणीच्या स्वरूपात दर्शविण्यात येणार आहेत.

गैरमार्गाशी लढा अभियान

शिक्षण मंडळाकडून मागील काही वर्षापासून या दहावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी मंडळाकडून राबविण्यात येत असलेले गैरमार्गाशी लढा हे अभियान यंदाही राबविण्यात येत आहे. यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर नऊ विभागीय मंडळांकडून यापूर्वीच विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून मार्गदर्शनही करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version