Home रविवारची मुलाखत .. आणि मी सिंघम झालो!

.. आणि मी सिंघम झालो!

2

गेली पन्नास वर्ष आपल्या सफाईदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे जयंत सावरकर. नाटक असो, टीव्ही मालिका असो किंवा अगदी अलिकडला ‘सिंघम’सारखा हा बॉलिवुडचा सिनेमा असो, प्रत्येक माध्यमात त्यांनी आपली छाप उमटवली आहे. आपली कारकीर्द, आपला जीवनप्रवास, आयुष्यातील चढउतार, खाचखळगे, वेगवेगळी वळणं याविषयी सावरकर यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा…

तुम्ही मूळचे कुठले? नाटकाची आवड तुम्हाला बालपणापासून होती का?

मी मूळचा कोकणातला. गुहागर हे माझं गाव. प्राथमिक शिक्षण तिथेच पूर्ण झालं. पुढच्या शिक्षणासाठी मोठय़ा भावाने मला मुंबईत आणलं. शिक्षण पूर्ण करतानाच मी नोकरी करावी, अशी घरातल्यांची इच्छा होती. त्यामुळे सुरुवातीला मी अनेक नोक-याही केल्या. पुढे नाटकात आलो आणि तिथेच रमलो.

नाटकात कधीपासून कामं करू लागलात?

वयाच्या १९ व्या वर्षी मी रंगभूमीवर पाऊल टाकलं. म्हणजे तेव्हा काही लगेच कामं मिळायची अशातला भाग नव्हता. पण ज्या ज्या ठिकाणी नाटकाच्या तालमी चालायच्या त्या ठिकाणी मी न चुकता हजर असायचो. मग कुठे चहाची ऑर्डर दे, कुठे नेपथ्य हलव, अशी छोटी-मोठी कामं करायचो. त्यावेळी विजय तेंडुलकरांच्या ब-याच एकांकिकाचे प्रयोग सुरू होते. कमलाकर सारंग, अरविंद देशपांडे, नंदकुमार रावते वगैरे हौशी मंडळी हातातल्या नोकऱ्या झुगारून दिवसरात्रं तालमी करत. त्यावेळी मी पूर्णवेळ बॅकस्टेज वर्कर म्हणूनच काम करत होतो. माझ्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात मात्र विजया मेहतांकडे झाली. विजयादेखील स्वत:ला आमच्या ग्रूपपैकी एक समजत असल्या तरी त्याच वर्षी त्यांच्या ‘श्रीमंत’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाटय़स्पर्धेत द्वितीय पुरस्कार मिळाला होता. पुढे या आमचा ग्रूप तुटला. मी दोन्ही ग्रूपमध्ये असलो तरी नंतर दामू केंकरेंच्या ग्रूपमध्ये सामील झालो. पुढे केंकरेंनी ‘हॅम्लेट’ हे नाटक रंगभूमीवर आणलं. यात एक छोटीशी भूमिका मी केली होती, पण हे नाटक करताना एक मोठा फायदा असा झाला की, मी बॅकस्टेजलाही काम केलं. त्यामुळे तालमी घेणं, विंगेतून प्रॉम्प्टिंग करणं याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण मला मिळालं. या गोष्टी करायलासुद्धा टेक्निकची गरज असते, याचा साक्षात्कार मला झाला. ‘नाटय़निकेतन’चे मोठे-मोठे नट – जोत्स्ना भोळे, मामा पेंडसे, मंगला रानडे यांच्या सहवासात काम करायला मिळालं. ही इथूनच माझ्या नाटय़वाटचालीला ख-या अर्थाने सुरुवात झाली, असं म्हणायला हरकत नाही.

नोकरी की नाटक ही द्विधा कधी दूर झाली?

या क्षेत्रात काम करायचं, हे काही आधीपासून ठरवलं नव्हतं. त्यातच शॉर्टहॅण्ड टायपिंगमध्ये मी मुंबईत पहिला आल्याने नोक-यांचाही तुटवडा नव्हता. नोक-या मिळायच्या, पण नाटकासाठी रजा नाही मिळाली तरी मी सरळ राजीनामा द्यायचो. त्या काळी सगळीच नटमंडळी नोक-या झुगारून नाटकात रमायची. माझ्या घरातून नाटकाला विरोध व्हायचा. पण मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही. उलट नाटकावर जगून दाखव, असं जणू सगळे आपल्याला चॅलेंजच करतायत, असं वाटायचं. नोकरी-बिकरी करण्याचा पिंड नसल्यामुळे वारंवार नाटकाकडे वळायचो. पण तरीही त्यावेळी नऊ वर्षे मी एका मोठय़ा उद्योगपतीचा प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम बघितलं. पाँडिचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर सयाजी सिलम यांचा पत्रव्यवहारदेखील काही काळ पाहिला. साधारण १९६७ मध्ये नोकरीला कायमचा रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ मी रंगभूमीवर उतरलो.

नाटकात कामं करताना सुरुवातीला कोणत्या मंडळींचा सहवास लाभला?

मी बहुतेक सगळ्या मोठय़ा रंगकर्मीसोबत काम केलंय. राजा गोसावी, मास्टर दीनानाथ, दाजी भाटवडेकर, सतीश दुभाषी यांसारख्या मोठय़ा मंडळींना जवळून पाहण्याचा योग आला. खरं तर मी हे माझं भाग्य समजतो. नोकरी सोडल्यावर मी विश्राम बेडेकरांच्या ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकात भूमिका करत होतो. सतीश दुभाषीचं हे पहिलं नाटक. श्री जोगळेकर आणि राजा गोसावी यांचा प्रभाव तर माझ्या आयुष्यावर कायम राहिला.

नाटकात कामं कशी मिळत गेली ?

एकतर त्याकाळी जुन्या नाटकांचा सुकाळ होता. त्यात मामा पेंडसे ही नाटकात मुरलेली व्यक्ती म्हणजे माझे सासरे. त्यामुळे ओळखीने कुठेकुठे काम करण्याची संधी मिळायची. मी १९५७पासून साहित्य संघात कार्यरत होतो. बहुधा सगळेच जण नोकरी सांभाळून नाटक करत असल्याने तालमी संध्याकाळीच होत. नोकरीत असल्याने एक प्रकारची शिस्त अंगी होती. त्यामुळे तालमीचीही वेळ आपोआप पाळली जाई. या शिस्तप्रियतेमुळेही कामं चालून येऊ लागली. त्यात पाठांतर हा माझा पहिल्यापासून प्लसपॉइण्ट. त्यामुळे अनेकदा एखाद्या नटामुळे अडलेली कामं माझ्याकडे येऊ लागली. यातूनच मग पुढची घोडदौड सुरू झाली.

मी अनेक वर्ष ‘एकच प्याला’मधील ‘तळीराम’ची भूमिका रंगवूनही व्यसनाच्या बाबतीत ‘कोरडाच’ राहिलो. याचं श्रेय जितकं स्वत:ला, नाटकाला आहे, तितकंच कधीही धडपणे न करू शकलेल्या नोकरीलाही आहे. नोकरीमुळे आयुष्यात शिस्त आली. त्यामुळे नाटक झाल्यावर इकडे-तिकडे झुलत न राहता वेळेवर आणि ‘शुद्धीवर घरी परत येण्याची सवय लागली.

तुमच्या दांडग्या पाठांतराचे काही किस्से सांगा.

पाठांतरामुळे एखाद्या नाटकात नटाने अडवणूक केली की, ती भूमिका माझ्याकडे येत असे. मी ती लगेच स्वीकारत असे. अनेकदा असंही मनात यायचं की, अडलेल्या भूमिकेसाठी माझ्याकडे यावं लागावं, यासाठी एखाद्या नाटकात मला कायमस्वरूपी काम दिलं जात नाही की काय? एकदा असेच दाजी भाटवडेकर दुपारच्या वेळेस घरी आले आणि शिवाजी मंदिरला घेऊन गेले. ‘दुरितांचे तिमीर जावो’ या नाटकातल्या नटाने अचानक दोन दिवस आधी टांग मारली होती. ही भूमिका तू कर, असं दाजींनी सांगितलं. काही वेळातच मी ते संपूर्ण नाटक वाचून काढलं आणि प्रयोगाला उभा राहिलो. सतीश दुभाषींच्या ‘शॉर्टकट’ या नाटकाच्या वेळीदेखील असाच किस्सा घडला. त्याही नाटकाचं मी तासाभरात पाठांतर करून ती भूमिका केली. ही सगळी रंगदेवतेची कृपा म्हणावी लागेल. पुढे-पुढे तर अनेकदा असं व्हायला लागलं की, नाटक पाहायला जायचो आणि नटाचं काम पदरात पडायचं. थोडक्यात माझी तत्पर सेवा रंगभूमीच्या बरीच कामी आली आणि मलाही फायदा झाला. दाजी भाटवडेकरांनी तर साहित्य संघात सर्वासमक्ष याबद्दल माझं कौतुक केलं होतं.

तुम्ही ब-याच संगीत नाटकातही भूमिका केल्यात. त्याबद्दल काय सांगाल?

गेल्या ४० वर्षात मराठी रंगभूमीवर जेवढी संगीत नाटकं आली त्यातल्या जवळजवळ सर्व नाटकांमध्ये मी भूमिका केल्या आहेत. केशवराव दाते, पेंढारकर यांच्या नाटक कंपन्यांमध्ये मी अनेक वर्ष काम केलं. त्यावेळी तालमी करून नाटकं बसवली जात असली तरी आजच्यासारखा ‘ऑडिशन’ हा प्रकार फारसा नव्हता. तालमी बघून शिकायला मिळे आणि जसजशी ज्येष्ठमंडळी नाटकातून निवृत्त होत तशी आमच्यासारख्या हौशी मंडळींची वर्णी लागत असे. संगीत-नाटकात मी गद्य कामंच केली. पण एक पद्य भमिका मात्र माझ्या आणि प्रेक्षकांच्याही लक्षात कायमची लक्षात राहिली. ‘भावबंधन’ या संगीत नाटकाचे प्रयोग अहमदाबादला होते. शंकर घाणेकर, उदयराज गोडबोले असे ज्येष्ठ नट या नाटकात काम करत होते. माझी मोजून ११ वाक्यांची भूमिका होती. त्यामुळे हॅण्डबिलातही कुठेतरी कोपऱ्यावर नाव छापलं होतं. पुढे दुस-या दिवशीच्या बडोद्याच्या प्रयोगाच्या वेळी शंकर घाणेकर मुंबईला जाणार असल्याने ‘कामण्णा’ची भूमिका कोण करणार, असा प्रश्न उभा राहिला. पाठांतर आणि नक्कल यात तरबेज असल्याने घाणेकरांनी कोल्हटकरांना माझं नाव सुचवलं. त्या प्रयोगाच्या वेळी मात्र हॅण्डबिलात ‘.. आणि जयंत सावरकर’ असं छापण्यात आलं, तेव्हा खरं सांगतो मी बेशुद्ध व्हायचा बाकी होतो. या कामण्णाच्या भूमिकेला एक गाणंही होतं. मी गायलेल्या त्या गाण्याला त्याच नव्हे तर पुढच्या सगळ्या प्रयोगांना टाळ्या मिळाल्या होत्या.

या प्रवासात जास्त आव्हानात्मक आणि स्मरणात राहिलेली भूमिका कोणती?

मुळात जुन्या नाटकांत काम करणं, मग ती भूमिका मोठी असो. अथवा छोटी हेच धाडसाचं असायचं. कारण त्यांचं दिग्दर्शन, बांधणी, सादरीकरण यासाठी प्रचंड मेहनत आणि कष्ट घेतलेले असायचे. पण माझ्या कारकीर्दीतील सर्वात आव्हानात्मक भूमिका विचारशील तर जयवंत दळवींच्या ‘सूर्यास्त’मधील गायकवाड. सचिवालयाच्या मोठय़ा पदावर असणाऱ्या, परंतु तोंडात अशुद्ध भाषा आणि अर्वाच्य शिव्या असणारं हे पात्र रंगवणं मला जमत नव्हतं. बऱ्याच तालमीनंतरही काम जमत नसल्याने कमलाकर सारंगने ‘उद्यापासून येऊ नको’, अशा शब्दांत मला सुनावलं. विशेष म्हणजे, कमलाकर, लालन सारंग आणि मी जवळपास २० र्वष एकमेकांना ओळखत होतो. शेवटी लालनने मध्ये पडून ‘त्याला आठवडाभर अवधी दे आणि मग निर्णय घे,’ असं कमलाकरला सांगितलं. झालेल्या अपमानामुळे मीही ‘काहीही झालं तरी हे काम जमवायचंच,’ असं ठरवलं. त्यावेळी नेपथ्यकार रघुवीर तळशीलकर यांच्याबरोबर मी ‘अपना बाजार’च्या इंटिरिअरचं काम करत होतो. योगायोगाने तिथे एक अशुद्ध भाषा बोलणारा मनुष्य होता. काही दिवस त्याच्याशी संवाद साधून मी ती भाषा आत्मसात केली आणि तालमीला ते पात्र रंगवलं. कमलाकर खूश झाला. पुढे ‘सूर्यास्त’मधल्या या भूमिकेसाठी मला लक्षवेधी अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर एका प्रयोगादरम्यान ‘हे पात्र जयंतला देऊ नये,’ असं पत्र आपण कमलाकरला लिहिल्याचं निळू फुलेने माझ्याकडे कबूल केलं होतं. तोच निळू फुले पुढे माझ्याशिवाय ‘सूर्यास्त’चे प्रयोग करायला तयार होत नसे. एकूणच माझ्या या गायकवाडवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आणि याच पात्राने मला ओळखही दिली.

नाटकातून चित्रपटांकडे कसे वळलात?

चित्रपट किंवा मालिकांकडे मी तसा उशिराच वळलो. ‘नाटक हा जिवंत अभिनय आहे,’ असं आम्हाला शिकविणारे आमचे गुरू दामू केंकरेच जेव्हा चित्रपटाचं दिग्दर्शन करू लागले, तेव्हा मात्र आपणही यात उतरायला हवं, असं वाटू लागलं. तेव्हा माझा तळीराम, गायकवाड हा खूप लोकप्रिय झाला होता. सिनेमातले जे लोक नाटक पाहायला येत ते खूप कौतुक करत. काम मिळवून देण्याची आशा दाखवत, पण प्रत्यक्षात मात्र नाटकवाले पडद्यावर ‘फिट्ट’ बसत नाहीत, अशी कारणं देऊन वाटेला लावत. जोपर्यंत लोकांच्या तोंडी नाव होत नाही, तोपर्यंत ही उपेक्षा सहन करावीच लागणार, हे मलाही उमगत होतं. या काळात विनय आपटे आणि बाळ कुडतरकरांनी खूप मदत केली. विनय नेहमी मला कामं मिळवून देई. बाळ कुडतरकरांनी मला डबिंग शिकवलं. त्यावेळी ४० दिवसांनंतरच पुढचा डबिंगचा प्रोजेक्ट करायचा, असा दूरदर्शनचा नियम होता. तरीही या ना त्या मार्गाने कुडतरकर मला रेडिओवर काम मिळवून देत. एका मोठय़ा निर्मात्या नटीने असंच चित्रपटात काम देण्याचं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात नाटकवाल्याला काम देण्याबाबत आपण कसं हतबल आहोत, हे तिने तिच्या ऑफिसला गेल्यावर सांगितलं. पुढे पुढे नाटकाप्रमाणे चित्रपटातही माझं बस्तान बसलं. मराठीत मी पन्नास-साठ सिनेमे केलेत.

पूर्वी नाटकात जास्त पैसे मिळत नसत, त्याची घरातून कधी तक्रार झाली?

खरं आहे. मी नाटकात काम करायचो, पण अनेकदा पैशांची चणचण भासायची. पण अशा वेळीही पुन्हा नाटकच मदतीला धावून यायचं. एकदा मुलांची ‘फी’ भरण्याइतके पैसेही माझ्याजवळ नव्हते. तेव्हा ‘नाटय़दर्पण’ ही संस्था २५ वर्षे नाटकांचा महोत्सव करत होती. त्याचे संचालक सुधीर दामले यांनी माझ्याकडून काही टायपिंगचं काम करवून घेतलं आणि माझ्या नकळत माझ्या खिशात दीडशे रुपये ठेवले. घरी आल्यावर हे माझ्या लक्षात आलं. त्या पैशातून मी मुलांची फी भरली. अडचणीचे प्रसंग आयुष्यात अनेक आले. पण त्यातून मार्ग दाखवणारे मदतीचे हातही अनेक पुढे झाले. माझ्या लग्नाला ५२ र्वष झालीत. या प्रवासात माझ्या बायकोने मला खंबीर साथ दिली. मध्यंतरीच्या काळात घर चालवण्यासाठी तिने घरी खानावळही चालू केली होती. परिस्थिती कशीही असली तरी तिने कधी कुरकुर केली नाही. उलट प्रोत्साहनच दिलं. तिच्या सहकार्यामुळेच तर तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकलो. माझी तिन्ही मुलं कलाक्षेत्रात आहेत. दोन्ही मुली उत्तम अभिनय आणि डबिंग करतात, तर मुलगा कौस्तुभ चित्रपटांसाठी पटकथालेखन करतो. ‘उत्तरायण’ या चित्रपटासाठी त्याला पारितोषिकही मिळालं आहे. योगायोगाने सुनही आमच्याच क्षेत्रात आहे. तीही रेडिओवर डबिंग आणि गाण्याचे शो करते. माझी पुढची पिढी या क्षेत्रात स्वत:हून पाऊल टाकतेय, हे पाहून फार समाधान होतं. आयुष्यात असे चढउतार आले तरी नाटकाच्याच जिवावर मी कोटय़धीश झालोय, असं म्हणायला हरकत नाही. कारण नाटकाच्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशानेच मी गिरगावची जागा घेतली, जिची किंमत आज कोटीच्या घरात आहे. रंगदेवतेचे आणि प्रेक्षकांचे हे ऋण फेडणं खरंच अशक्य आहे.

हिंदीतही चित्रपटांतूनही तुम्ही भरपूर काम केलंय. तो अनुभव कसा होता?

हिंदीत मी जवळजवळ २५ सिनेमे केले. ‘बडे दिलवाला’, ‘युगपुरुष’, ‘परमात्मा’पासून ते आताच्या ‘सिंघम’पर्यंत हा अनुभव माझ्यासाठी खूपच चांगला होता. हिंदीत मराठी कलाकारांना खूप आदराने वागवलं जातं. नुकतीच ‘सिंघम’ सिनेमातील माझी आजोबांची छोटीशी भूमिका खूप लोकप्रिय झाली. त्याबद्दल सांगायचं तर, मला जेव्हा या भूमिकेसाठी बोलावलं तेव्हा माझा सगळा बायोडेटा त्यांच्याकडे होता. त्यांनी माझ्या तारखा विचारल्या. तेव्हा मी तसा रिकामाच होतो. तरीही आयुष्यात पहिल्यांदा ‘तुम्ही सांगाल त्या तारखा देतो’ असं न म्हणता ‘तुम्ही तारखा सांगा, बघू अ‍ॅडजस्ट होतंय का’ असं मुद्दाम म्हणालो. ‘पर डे’चा आकडादेखील भीतभीतच नेहमीपेक्षा थोडा वाढवून सांगितला. माझं काम फायनल झालं तेव्हा या धाडसाबाबत मी स्वत:लाच ‘सिंघम’ म्हणवून घेतलं.

बालरंगभूमीच्या योगदानाविषयी काय सांगाल?

सुधा करमरकर यांनी जेव्हा ‘लिटिल थिएटर’ची स्थापना केली, तेव्हापासून पुढे आठ र्वष मी त्यांच्यासोबत होतो. २ ऑगस्ट १९६० रोजी ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ या पहिल्या नाटकापासून जवळजवळ प्रत्येक नाटकात मी भूमिका केली. लहान मुलांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच मस्त आणि अविस्मरणीय असतो. सुधा करमरकरांकडून मी उत्तम मराठी कसं बोलावं, ते शिकलो. त्याचा खूप उपयोग मला पुढे नाटकांचे प्रयोग करताना झाला.

तुम्हाला प्रेक्षकांचं लाभलेलं प्रेम आणि भूमिकांवरच्या प्रतिक्रिया याविषयी सांगा.

गेली ५७ वर्षाची नाटकात वावरणं मायबाप प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळेच शक्य झालंय. मला आयुष्यात माझ्या योग्यतेप्रमाणे कामं मिळाली आणि त्याबद्दल वेळोवेळी उचित बक्षीसही मिळालं. रसिकांचा प्रतिसाद हेच ते बक्षीस. नाटकामुळे माणसं जमवण्याचं व्यसन लागलं. एक आठवण सांगतो, दादरला बर्वे म्हणून एक कुटुंब आहे. त्यांनी माझी सगळी नाटकं पाहिली आहेत. वयस्कर जोडपं आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. अशोक मुळे म्हणून माझे एक स्नेही आहेत. बर्वेच्या मुलाने त्यांच्याकडून माझा नंबर मिळवला. आम्हाला घरच्या घरी तुमचा गौरव करायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली. मला नकार देता येईना. बायकोला घेऊन त्यांच्याकडे पोहोचलो. त्यांनी बायकोची ओटी भरली, तर मला शाल, श्रीफळ आणि ५००० रुपयांचं पाकीट दिलं. मी पैसे घ्यायला नकार दिला, तर त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय हृदयस्पर्शी होतं. आज इतकी वर्षे आम्ही ज्या माणसांकडून मनोरंजनाचा निखळ आनंद मिळवलाय त्याचं आम्ही काहीतरी देणं लागतो, या भावनेतून आम्ही हा गौरव करतोय. यासारखे अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत. माझा प्रयोग जिथे कुठे असतो, त्या सगळ्याच ठिकाणी ही रसिक मंडळी या ना त्या रूपाने आपलं प्रेम व्यक्त करतात. अशा वेळी कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप मोठं काहीतरी मिळाल्याचा आनंद मला गवसतो. मी जेवढी सेवा रंगभूमीची केलीय त्यापेक्षा प्रेक्षकांच्या पोचपावतीच्या रूपात दुप्पट दान, तिने माझ्या पदरात टाकलंय.

नाटकांनी तुम्हाला परदेशातही लोकप्रियता मिळवून दिली ना?

‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘मोरूची मावशी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ अशा अनेक नाटकांसाठी दुबई, अमेरिका, कॅनडा, इस्रयल अशा परदेशवाऱ्या घडल्यात. हा अनुभवही खूप वेगळा होता. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधल्या ‘अंतू बव्र्या’ने परदेशात लोकांना अक्षरश: वेड लावलंय, अशा प्रतिक्रिया माझ्याकडे आल्यात. आपली संस्कृती, कला, सातासमुद्रापार पोहोचलीय, हे पाहून आणि अनुभवून खूप समाधान वाटतं.

तुमच्या या समाधानी आयुष्याचं रहस्य काय?

नाटक! आयुष्यात नाटकामुळे मला भरपूर काही मिळालं. सहसा नाटकातले नट हे पडदा पडल्यावर ‘तळीराम’ होतात, असा समज प्रचलित होता आणि आहे. पण मी अनेक र्वष ‘एकच प्याला’मधील ‘तळीराम’ची भूमिका रंगवूनही व्यसनाच्या बाबतीत ‘कोरडाच’ राहिलो. याचं श्रेय जितकं स्वत:ला, नाटकाला आहे, तितकंच कधीही धडपणे न करू शकलेल्या नोकरीलाही आहे. नोकरीमुळे आयुष्यात शिस्त आली. त्यामुळे नाटक झाल्यावर इकडे-तिकडे झुलत न राहता वेळेवर आणि ‘शुद्धीवर घरी परत येण्याची सवय लागली. नाटकाच्या तालमीला किंवा प्रयोगाला सोबत भाजी-पोळीचा डबा कायम सोबत नेण्याची सवय लागण्याचं श्रेयदेखील नोकरीला. व्यसन न करण्यामागे ही सगळी कारणं असली तरी मूळ कारण मात्र ‘स्वार्थ’च. मुळात सिगारेट किंवा तंबाखू दोन्हींमुळे मला खोकला व्हायचा. आणि नाटकाच्या दृष्टीने ते परवडणारं नसल्याने यापासूनही मी लांबच राहिलो. तसंही नटाला आजारी पडायला सवड नसतेच. सतत चांगल्या ग्रूपमध्ये वावरण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने चांगल्या माणसांच्या सहवासात राहिलो. चांगलं काम करण्याची मनीषा मनात बाळगली आणि त्या दृष्टीने वागत राहिलो. नाटकातील दीर्घ तपस्या आणि कुटुंबीयांचा पाठिंबा हेच माझ्या समाधानी आयुष्याचं गुपित.

कधी दिग्दर्शन करावं, असं नाही वाटलं?

नाही. मला आजपर्यंत माझ्या योग्यतेप्रमाणे कामं मिळाली आहेत. मिळालेलं काम करण्याचा आत्मविश्वास होता. पण कामं मिळवण्याचा हावरेपणा कधीच नव्हता. मला दिग्दर्शनाचं मोठं अप्रूप वाटायचं. मोठमोठय़ा दिग्दर्शकांसोबत काम करताना आपल्याला हे जमेल का? इतकी बुद्धी खरंच आपल्यात आहे का? असे प्रश्न पडायचे. उत्तर काहीही असो पण मी ते धाडस केलं नाही, हे मात्र खरं. मी अभिनयावरच समाधानी आहे.

जयंत सावरकरांची काही निवडक नाटकं

सौजन्याची ऐशी तैशी
अपूर्णांक
व्यक्ती आणि वल्ली
टिळक- आगरकर
दुरितांचे तिमीर जाओ
सूर्यास्त
रथचक्र
सुंदर मी होणार
तुज आहे तुजपाशी
एकच प्याला
भावबंधन
लहानपण देगा देवा
प्रेमा तुझा रंग कसा

निवडक सिनेमे

युगपुरुष
वहिनीची माया
परमात्मा
सिंघम
कर्मयोद्धा
अंधायुध
पारंबी
येड्यांची जत्रा

निवडक मालिका

चाळ नावाची वाचाळ वस्ती
चिरंजीव
साहेब
वहिनीसाहेब

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version