Home महाराष्ट्र आत्महत्या थांबवता येणार नाहीत

आत्महत्या थांबवता येणार नाहीत

1
eknath khadse

कर्ज माफ करा किंवा वीज बिल माफ करा, शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत.

नागपूर – कर्ज माफ करा किंवा वीज बिल माफ करा, शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. आधीच्या सरकारने या उपाययोजना करून पाहिल्या आहेत. त्यानंतर आत्महत्या थांबल्या का, असा अजब सवाल उपस्थित करून सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतक-यांच्या जखमेवरच मीठ चोळण्याचे काम महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. विधान परिषदेत २६०नुसार झालेल्या दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. प्रत्यक्षात शेतक-यांच्या पदरात काहीच पडले नाही. जुन्याच योजना आणि टंचाईग्रस्तांसाठी असलेली सूट देऊन शेतक-यांची बोळवण करण्यात आली.

दुष्काळग्रस्त शेतक-यांना सरकारकडून भरीव मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काहीएक झाले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय योजले गेले. पण आत्महत्या काही थांबल्या नाहीत, असे खडसे म्हणाले. आत्महत्या का होत आहेत याचे कारण सरकार शोधेल, असेही ते म्हणाले. मात्र आत्महत्या रोखणे हे एकटय़ा सरकारचे काम नसल्याचा अजब तर्क त्यांनी लावला. यासाठी ‘एनजीओ’ आणि सर्वसामान्यांनीही पुढे यायला हवे, असे सांगत त्यांनी आपली जबाबदारी झटकली.

पॅकेज देऊन आत्महत्या थांबणार नाही. तो तात्पुरता उपाय आहे. पॅकेज दिल्यास आत्महत्या थांबतील, असे कोणी ठामपणे सांगेल का? असा प्रतिप्रश्नच त्यांनी सभागृहात केला. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत करण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली होती. मात्र त्याचा साधा उल्लेखही खडसे यांनी या चर्चेवरील उत्तरात केला नाही. शिवाय, कोरडवाहू शेतकऱ्यांना २५ हेक्टरी व  बागायतीसाठी ५० हजार हेक्टरी देण्याच्या मागणीलाही हरताळ फासण्यात आला. धान उत्पादक शेतकऱ्यांचा उल्लेख करणेही सरकारने टाळले.

सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

शेतक-यांना विशेष पॅकेज जाहीर नसल्याचा निषेध नोंदवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वच सदस्यांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांना बोलू दिले जात नसल्याबद्दल सुनील तटकरे यांनी सरकारचा निषेध केला. विधान परिषदेत विरोधकांचे बहुमत आहे हे विसरू नका, असेही ते म्हणाले. विरोधकांचा सन्मान केला जात नसेल, त्यांना बोलू दिले जात नसेल तर कामकाजात सहभागी होणार नाही, असे सांगत सर्व सदस्य वेलमध्ये शांतपणे बसले. त्यातही कामकाज सुरू राहिले. मात्र यात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप करत कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्याची विनंती केली. त्यानंतर गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याचेही त्यांनी सांगितले. तालिका सभापतींनी १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यावर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात

सरकारला काळजी सावकारांची

दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्रत्यक्षात काही न देता सावकारांची काळजी सरकारने घेतली आहे. राज्यात जवळपास ४ हजार अधिकृत सावकार आहेत. त्यांनी शेतक-यांना कर्ज दिले आहे. या कर्जाचे व्याजासह ३७३ कोटी सरकार सावकारांना देईल, असे खडसे यांनी जाहीर केले.

‘भाजपाचे सरकार नाकर्ते’

शेतक-यांच्या आत्महत्या होणारच, असे सांगणारे हे सरकार आपण नाकर्ते असल्याचे सांगत आहे, असा आरोप माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेत केला. शेतक-यांना सरकारने कोणतेही पॅकेज दिले नाही. इतकेच काय तर कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतक-यांचा उल्लेखही केलेला नाही. दूध उत्पादक शेतक-यांना दिलासा दिला नाही. कोरडवाहू आणि ओलिताखालील शेतक-यांकडेही या सरकारने दुर्लक्ष केले.

सरकारने जनतेचा अवमान केला

शेतक-यांसाठी वेगळे पॅकेज अभिप्रेत असताना भाजपा सरकारने जुन्याच ९० टक्के योजना लागू केल्या आहेत. नवीन काही दिले नाही. ही राज्यातील जनतेची फसवणूक असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. त्यामुळे या सरकारचा निषेध करत असल्याचे ते म्हणाले. पैसे नाहीत असे, सरकार खोटे बोलत आहे. हा सरकारचा पळपुटेपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

1 COMMENT

  1. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राजकारणी लोकांच्या सवयीचा भाग झालेला दिसतो. म्हणुनच अशा निर्बुद्ध वल्गना राजकारणी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version