Home एक्सक्लूसीव्ह आपत्कालीन स्थितीत मुंबईकरांचा जीव धोक्यात

आपत्कालीन स्थितीत मुंबईकरांचा जीव धोक्यात

1

मुंबई अग्निशमन दलातील ६० टक्के जवानांना साधे पोहताही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुंबई – मुंबईतील समुद्रकिनारी फिरण्यास येणारा पर्यटक समुद्राच्या लाटेच्या तडाख्यात सापडला असेल अथवा तलावामध्ये पडल्याने जर कुणी बुडत असेल तर अशा परिस्थितीत त्यांना वाचवण्यासाठी सज्ज असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांकडून त्वरित मदत मिळाली तरी बुडणा-याचा जीव वाचेल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारण मुंबई अग्निशमन दलातील ६० टक्के जवानांना साधे पोहताही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे समुद्रात अथवा तलावांमध्ये कोणी बुडाल्यास त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना वर्दी दिली जात असली तरी प्रत्यक्षात पोहता येत नसल्यामुळे नौदलाची मदत घेऊन अग्निशमन दल मोकळे होते.

अग्निशमन दल हे आपत्कालीन विभागामध्ये मोडत असल्यामुळे त्यांनाच पोहता येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या सेवेत सध्या २४ ते २५ हजार जवान आणि अधिकारी असून आगीसह अनेक आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी या विभागाचे जवान कार्यरत असतात. त्यामुळे कुठे आग लागली असेल, कुठे झाड पडले असेल वा कोणी लिफ्टमध्ये अडकला असे वा पक्षी अडकला असेल वा कुणी समुद्रात बुडाला असल्यास अग्निशमन दलाला त्वरित वर्दी दिली जाते.

त्याप्रमाणे ते घटनास्थळी धाव घेऊन या विभागाचे विमोचनाचे कार्य करत असतात. मात्र समुद्रात अथवा तलावांमध्ये कोणी बुडाल्यास त्याची वर्दी अग्निशमन दलाला दिली जात असली तरी प्रत्यक्षात या विभागातील जवानांना पोहताच येत नसल्याचे समोर आले आहे.

मरिन ड्राईव्ह येथे मागील १५ दिवसांपूर्वी आलेल्या मोठा लाटांच्या वेळी तीन भाऊ बुडाले गेले. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले. परंतु ज्या दोघांना वाचवण्यात आले ते पाण्याबाहेर होते म्हणून जवानांना त्यांना वाचवता आले. परंतु जो पाण्यात बुडाला होता, त्याला वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांनी त्वरित नौदलाच्या जवानांना पाचारण केले. मात्र त्या वेळी उपस्थित असलेल्या जवानांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला नव्हता,अशी बाब आता समोर येत आहे.

अग्निशमन दलाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, जवानांची भरती करताना पोहोण्याची अट बंधनकारक नाही. त्यामुळे पोहता येणा-या जवानांची संख्या कमी आहे. परंतु प्रत्येक मे महिन्यात पोहण्याचे विशेष कौशल्य असावे म्हणून प्रशिक्षण दिले जाते.

परंतु अशी बंधनकारक अट नसल्यामुळे नव्याने भरती प्रक्रियेत पोहोण्यास येणा-यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. परंतु एकूण जवानांच्या तुलनेत ६० ते ७० टक्के जवानांना पोहोता येत नसल्याचेही अधिका-यांचे म्हणणे आहे.

मुंबई अग्निशमन दलातील जवानांची भरती करताना पोहोण्याची अट घातल्यास उमेदवार कमी मिळतील. यापेक्षा भरती झाल्यानंतर प्रशिक्षणाचा भाग म्हणून पोहणेही बंधनकारक करण्यात यावे. यासाठी आपण सूचना करणार आहोत. केवळ समुद्रात किंवा तलावात नाही तर मुंबईतही पावसाळ्यात पाणी साचते, अशा वेळेस जवानांना पोहता येणे आवश्यक आहे, असे मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेच्या सरचिटणीस श्रद्धा जाधव यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version