Home महामुंबई आभाळाएवढा आवेश, घोषणा मात्र फुटकळ!

आभाळाएवढा आवेश, घोषणा मात्र फुटकळ!

0

अर्थसंकल्प सादर करताना एखाद्या योजनेची घोषणा आभाळाएवढय़ा आवेशात करायची मात्र त्यासाठीची तरतूद फुटकळ पाहून सभागृह आणि पत्रकार गॅलरीत हशा पिकला होता.

मुंबई – अर्थसंकल्प सादर करताना एखाद्या योजनेची घोषणा आभाळाएवढय़ा आवेशात करायची मात्र त्यासाठीची तरतूद फुटकळ पाहून सभागृह आणि पत्रकार गॅलरीत हशा पिकला होता. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राबाहेरील स्मारकाला प्रोत्साहन देण्याची योजना घोषित करत असताना अर्थमंत्र्यांनी असा काही आवेश निर्माण केला की आता हे दोन-चारशे कोटींची नक्कीच घोषणा करतील, मात्र घोषणा केवळ ५ कोटींची त्यामुळे सभागृहातील अनेकांना हासू आवरता आले नाही.

अर्थमंत्र्यांचे एकंदर भाषण हे शब्दांचा खेळ होते. मात्र त्यातून होणा-या घोषणा या किरकोळच निघत होत्या. भाषणांची सुरुवात केली तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांचा नावाचा जयघोष केला. मात्र या महापुरुषांच्या स्मारकासाठी कोणतीही खास तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पाचे पान ‘क्रमांक २४’ वाचत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि त्यांचे रयतेविषयीचे प्रेम याबद्दल फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आदर आहे.

त्यामुळे महाराष्ट्राबाहेरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी त्यांची स्मारके उभी राहत आहेत. राज्याबाहेर अशी प्रेरणादायी स्मारके उभारण्यात येत असतील तर त्यात राज्य सरकारला आर्थिक व भावनिक सहभाग नोंदवताना अभिमान वाटेल’, अशी प्रस्तावना केली. आता राज्याबाहेर उभ्या राहणा-या महाराजांच्या स्मारकासाठी अर्थमंत्री शे-दोनशे कोटींची तरी घोषणा करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी केवळ पाच कोटी देण्यात येतील, अशी घोषणा केली. तेव्हा अनेकांना आपले हसू आवरता आले नाही. सभागृहात आणि सर्व गॅल-यांत हास्यकल्लोळ झाला.

शिवाजी महाराजांप्रमाणेच लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी, जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील गणेशोत्सवांसाठी ५ कोटींची घोषणा केली. गणिततज्ञ भास्कराचार्याच्या स्मारणार्थ जागतिक दर्जाचे ‘भास्कराचार्य गणित नगरी’ तयार करणार, अशी घोषणा केली. तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पत्रकार भवन उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा केली, मात्र या दोन्हींसाठी निधीची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने सांगली जिल्ह्यात भव्य सभागृह बांधण्याची घोषणा करण्यात आली. मात्र त्यासाठी केवळ ५ कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची सरकारने तयारी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात या स्मारकासाठी अर्थसंकल्पात एक पैसाही ठेवलेला नाही. इंदू मिलच्या जागेत उभ्या राहणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन बिहार निवडणुकीच्या आधी करून राजकीय फायदा घेण्याचा
प्रयत्न केला. मात्र त्या स्मारकासाठीही कोणत्याही निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.

.. आणि मुख्यमंत्र्यांचे हात थबकले

विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ओजस्वी भाषणाला सभागृहात उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हास्यवदनाने दाद देत होते. प्रत्येक घोषणेवर बाके वाजवून प्रोत्साहित करत होते. मात्र केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरव त्यांचे शिष्य असणा-या सुधीर मुनगंटीवार यांनी केला तेव्हा मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाके वाजवणारे हात थबकले आणि चेहराही आंबट झाला.

केंद्रीय मार्ग निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारने २०१४-१५ या वर्षात १ हजार ७१८ कोटी रुपये व सन २०१५-१६ मध्ये २ हजार ९४७ कोटी अशी एकूण ४ हजार कोटींची नवीन कामे मंजूर केली आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जोरदार बाके वाजवली. मात्र त्यानंतर मुनगंटीवार म्हणाले की, पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्र राज्यातील कामे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ३ हजार ९२४ किलोमीटर लांबीचे रस्ते नव्याने राष्ट्रीय महार्गात रूपांतरित करण्यात आले आहेत. राज्यातील रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचा मी आभारी आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. खरे तर इथे मुनगंटीवार यांनी गडकरी यांच्या फक्त पदाचा उल्लेख केला होता, नाव घेतले नव्हते तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आपोआपच आंबट झाला.

जनहिताच्या योजनांवर सरकारकडून प्रत्यक्ष खर्च कमीच

मुंबई – सरकारी तिजोरीत खडखडाट असताना योजनांची घोषणाबाजी करणा-या फडणवीस सरकारने जनहितासाठी अर्थसंकल्पात अंदाजित केलेल्या निधीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पैसे योजनांवर खर्च केल्याचे अर्थसंकल्पातील आकडेवारीवरून उघड होत आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात फडणवीस सरकारच्या २०१५-१६च्या अर्थसंकल्पात योजनांतर्गत खर्चाचे अंदाज ७१ हजार ६७३ कोटी इतके होते. जे मागील वर्षी २०१४-१५ मध्ये ६७ हजार ५३३ कोटी इतके होते.

यंदा योजनांतर्गत खर्च ७४ हजार ४०२ कोटी इतके आहे. जी पहिल्या अर्थसंकल्पाच्या २ हजार ७७९ कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, फडणवीस सरकारने अंदाजित केल्याप्रमाणे वर्षभरात या योजनांवर केवळ ४८ हजार ३३० लाख कोटीच रुपये खर्च केले आहेत. फडणवीस सरकारने योजनांवरील खर्चावर ३० टक्के कट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

» कृषी क्षेत्रातील योजनांसाठी २५ हजार कोटींची तरतूद

» पीक विम्यासाठी १ हजार ८८५ कोटी

»‘जलयुक्त शिवार’साठी १ हजार कोटींची तरतूद

» पाणंद रस्ता योजनेची घोषणा

» शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी २ हजार कोटींची तरतूद

» कृषीप्रक्रिया उद्योग उभारण्याला २५ टक्के किंवा ५० लाखांपर्यंत अनुदान

» दोन नव्या पशू महाविद्यालयांसाठी १० कोटींची तरतूद

» कडधान्ये व तेलबियांसाठी ८० कोटींची तरतूद

» शेत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ग्रामीण भागातील युवकांनाच देणार

» मत्स्यसंवर्धनासाठी १५० कोटींची तरतूद

» कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सेंद्रिय शेती अभ्यास केंद्रांची स्थापना करणार

» गायींच्या संवर्धनासाठी गोवर्धन गोरक्षा केंद्र योजनेची घोषणा

» शेतक-यांना जलसिंचनाचा ताबडतोब लाभ देणा-या योजनांसाठी ७ हजार ८५० कोटी

» पुणे येथे यशदा केंद्रात जलसाक्षरतेसाठी एक केंद्र. लातूर, अमरावतीत उपकेंद्रे

» ग्रामीण पेयजल योजनेसाठी १७० कोटींची तरतूद

» सर्व ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल बोर्ड बसवणार

» प्रत्येक जिल्ह्यात हवामान केंद्र उभारणार

» स्मार्ट गाव योजनेला चालना देणार

» ऊर्जा निर्मितीसाठी ५८४ कोटींची तरतूद

» मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद

» उद्योग क्षेत्राला सवलतींसाठी २६२५ कोटींची तरतूद

» कल्याण-भिवंडी-शिळ फाटा उन्नत मार्ग बांधणार

» कृषी विद्यापीठांमधे स्वतंत्र सेंद्रिय शेती अभ्यास केंद्राची स्थापना करणार

» जलसिंचनासाठी ७ हजार ८५० कोटींची तरतूद

» तीन हजार ९२४ किमीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित

» राज्यात दर १०० किमी अंतरावर एक असे ४०० स्वच्छतागृह बांधणार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version