Home टॉप स्टोरी मारहाण प्रकरणी आमदार अडचणीत

मारहाण प्रकरणी आमदार अडचणीत

1

विधान भवनात पोलिस अधिका-याला बेदम मारहाण करणा-या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी पोलिस महासंचालकांनी केली आहे.

मुंबई- विधानभवनाच्या आवारात पोलिस अधिका-याला पाच आमदारांनी केलेल्या मारहाणीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर उद्याच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिला.

राज्याच्या इतिहासात असा प्रकार कधीही झालेला नसून, याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घडलेल्या प्रकाराबद्दल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही महाराष्ट्रातील जनतेची आणि पोलिसांची निसंदिग्ध माफी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोषींवर कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली आहे. या घडामोडींमुळे अधिका-यानेच अर्वाच्च भाषा वापरली, धक्काबुक्की केली असा दावा करणारे ते पाच आमदार अडचणीत आले आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी वसईचे आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी सागरी सेतूवर अडवून त्यांच्याशी अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप करून ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत सूर्यवंशी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. उपसभापती वसंत डावखरे यांनी सूर्यवंशी यांना विधानभवनात बोलावून घेतले होते. मात्र विधानभवनाच्याआवारातच काही संतप्त आमदारांनी सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, मनसेचे राम कदम, भाजपचे जयकुमार रावळ, शिवसेनेचे राजन साळवी आणि अपक्ष प्रदीप जयस्वाल या आमदारांचा त्यात समावेश होता.

मारहाणीत जखमी झालेले सूर्यवंशी रुग्णालयात दाखल झाल्यावर ही बातमी झपाटयाने पसरली. तोपर्यंत सूर्यवंशी यांनी आमदारांशी केलेल्या गैरवर्तनावरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे कामकाजही चार वेळा तहकूब झाले होते. या सगळ्या घडामोडींची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. विधिमंडळाचे आजचे कामकाज बंद झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

‘‘कुणाकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, तर त्याबाबत न्याय मागण्यासाठी वेगळे मार्ग आहेत. मात्र कुणी व्यक्ती जर कायदा हातात घेत असेल, तर त्याला सरकार अजिबात पाठिशी घालणार नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि सरकार दोघांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची दोन्ही पातळय़ांवर चौकशी केली जाईल. या चौकशीत जे दोषी आढळतील, ते कुणीही असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आपण योग्य वेळी योग्य तो निर्णय देऊ, असेही त्यांनी सांगितले. ‘‘विधान भवनात घडलेल्या घटनेने मी व्यथित झालो आहे. अशी घटना भविष्यात या सभागृहात होऊ नये याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी. पोलिस अधिकारी सूर्यवंशी आमदाराशी कसे वागले याची चित्रफीत मी पाहिली आहे. त्यानंतर त्यांना झालेल्या मारहाणीची चित्रफीतही पाहिली आहे. याबाबत आणखी माहिती घेण्याचीही गरज आहे. ती घेतल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

आमदार म्हणतात, अधिका-याचेच गैरवर्तन

मारहाण प्रकरणाचा ठपका ज्या आमदारांवर आहे, त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘सागरी सेतूवरून सोमवारी जात असताना सचिन सूर्यवंशी यांनी आपली गाडी अडवली. तुमच्या गाडीने वेगमर्यादा ओलांडली, असे त्यांनी सांगताच मी त्याबाबत दंड भरला. मात्र त्यांनी माझ्याशी अर्वाच्च भाषा वापरली. मी आमदार असल्याचे सांगितल्यानंतर तुम्ही आमदार असाल, तुमच्या घरचे, असे तो म्हणाला.

उपसभापती वसंत डावखरे यांनी बोलावून घेतले असता, तिथेही तुम्हाला काय करायचे आहे, ते करून घ्या, असे तो म्हणाला. एखादा अधिकारी विधान भवनाच्या आवारात येऊन गैरवर्तन करीत असेल, आमदारांना खिजवत असेल, तर ते सहन करायचे का,’’ अशा शब्दांत क्षितीज ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली.

आमदारांवर गुन्हा दाखल

विधानभवनाच्या आवारात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम यांच्यासह १४ ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात मंगळवारी रात्री मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी कर्मचा-याला मारहाण करणे, दंगल आदी कलमांअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version