Home महामुंबई आयात उमेदवारांमुळे भाजप अडचणीत

आयात उमेदवारांमुळे भाजप अडचणीत

1

भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना तब्बल ५५पेक्षा जास्त उमेदवार हे इतर पक्षांकडून आयात करावे लागले होते.

मुंबई – भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना तब्बल ५५पेक्षा जास्त उमेदवार हे इतर पक्षांकडून आयात करावे लागले होते. या आयात उमेदवारांमुळेच भाजप अडचणीत आहे, अशी स्पष्ट कबुलीच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

यातील बहुतांशी उमेदवार हे आघाडी सरकारमध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्धची नाराजी भाजपमध्ये कमी झाली नाही, त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी कदापि राष्ट्रवादी काँग्रेसशी तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात भाजपचीच सत्ता येईल याबाबत भाजप नेते आशावादी असले, तरी त्यांना अजूनही ठाम विश्वास नाही. त्यातच आयात केलेले उमेदवार हेच भाजपसाठी अडचणीचे ठरत आहेत. यातील बहुतांश उमेदवार हे विद्यमान आमदार किंवा आघाडी सरकारशी संबधित राहिले आहेत. त्यांचा प्रचार करताना जनतेमध्ये त्यांच्या विषयीची नाराजी दिसून येत होती.

भाजपमध्ये ते आले असले तरी जनतेमध्ये त्यांच्या विषयी नाराजीचीच भावना असल्याचे जाणवले, असे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे अशा उमेदवारांना फटका बसून शकतो, असेही ते म्हणाले. मात्र लगेचच सावरत सर्व उमेदवारांना नाही तर काही उमेदवारांना त्याचा फटका बसेल असे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिली. त्यातच सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसला कदापि बरोबर घेणार नसल्याचे ते म्हणाले. मात्र शिवसेनेने प्रचारादरम्यान भाजपबाबत अतिशय खालच्या स्तरावरची भाषा वापरली. त्यावर शिवसेनेने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्यातून जर त्यांना त्यांची चूक त्यांना उमगली तर ते पुढचा निर्णय घेण्यास मोकळे आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने काय वक्तव्ये केली आहेत, त्याबाबत त्यांनी माफी मागावी की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे सांगत खडसे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version