Home महाराष्ट्र कोकण मेवा आराड गे बांडके सांज जाव दे!

आराड गे बांडके सांज जाव दे!

2

डिजिटल युगापूर्वी मनोरंजनाची परिमाणेच वेगळी होती. एखाद्या लाकडाच्या ओंडक्याची बाहुली अथवा दगडधोंडयातच  कल्पनांच विश्व उभे केले जायचे. घरात दिवटय़ांवरच अंधार बाजूला व्हायचा, पावसाळयातल्या रात्री लखलखणा-या विजांचा क्षणभर येणार प्रकाश लख्ख करून जायचा. अशावेळी घरात कुरकुरणारा एक झोपाळा असायचा. तोच सखा व्हायचा,दोस्त व्हायचा.. तोच आकाशात घेऊन जायचा आणि डोके भनभनू लागेपर्यंत साथ द्यायचा. गेल्या पंचवीस वर्षात गावकुसाचे संदर्भच बदलले.मनोरंजनाची साधनेही बदलली. घराघरात वीज पोहोचली आणि टीव्हीसुद्धा.. कालांतराने डीश पोहोचली.रेडिओ कधीचा मुका झालाय,आता झोपाळाही दोरीचा राहिलेला नाही. त्याला साखळदंड आले. झोपाळयावर बसणेही आता मनोरंजनाचे राहिलेले नाही. कारण टीव्ही बोलत राहतो, मोबाईल खणखणत राहतो. त्यावरचे गेम स्वत:ला हरवून सोडतात.. कधीतरी झोपाळयावरची गाणी  मोबाईलमधून ऐकताही येतात..पण ती मजा..?  त्याला आता विसरायलाच हवे!

आता झोपाळा बदलला. त्याची लांबी-रुंदी बदलली, पावसाळयातील झोपाळयासाठी शेतकरी काढत असलेले वेताचे दोरही थांबले. घराघरात टीव्ही दाखल झाला. मनोरंजनाची साधने बदलली. लहान-थोरांच्या तोंडावर चित्रपट गीते आणि अल्बमची गाणी नाचू लागली. यात झोपाळयावरची गाणी आजच्या पिढीला माहितीच नाही. शेतीची रचना बदलली.

कुटुंब दुभंगली, घरातली चिलीपिली शहराकडे वळली. यामुळे घराच्या ओसरीवर बांधल्या जाणा-या झोपाळयाला सुट्टी मिळाली. आता झोपाळयावर घातली जाणारी फळी कुठे कोनाडयात फेकली गेली आहे. पूर्वी पावसाळा आला म्हणजे या फळीला केवढा मान असायचा. ही फळी जशी फेकली गेली तशी झोपाळयावरची गाणी विस्मृतीच्या पडद्याआड गेली. आताच्या मुलांना ही गाणी सांगताना आई दबकते. कारण तिलाही या गीतांची तेवढीशी माहिती नसते आणि मुलांना आईची आठवण झाली तर आता संपर्कासाठी मोबाईलही असतो!

गावाकडचे पावसाळयाचे हे दिवस म्हणजे जम्माडी जम्मत असायची. घरातली जाणती मंडळी शेतातल्या कामात व्यस्त असायची आणि चिलीपिली झोपाळयावर झोके घ्यायची. शेतीसाठी शाळांमधून पावसाळी सुट्टी दिली जायची. मग छोटी मुले शेतात येऊन कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून त्यांना घरातच थांबवून ठेवले जायचे. यात छोटया मुलांनी घरातच खेळत राहावे, पावसात नाचू नये म्हणून झोपाळा बांधला जायचा. प्रत्येक घराघरात हा झोपाळा, झुला असायचा. नव्हे तर लहान मुलांचा तो सवंगडीच असायचा.  टीव्ही नव्हतेच. कुणाच्या तरी घरी रेडिओ असायचा, पण तो ठरावीक वेळी चालू राहायचा.

मात्र या झोपाळयावरची मजा काही औरच असायची. एकेका झोपाळयावर परिसरातील मुले जमायची. मग झोके कुणी घ्यायचे? यापासून झोपाळयावरची गाणी कोणी म्हणायची. यावरून स्पर्धा असायची. या स्पध्रेतून कुणाचा झोका सर्वात मोठा, कुणाचा आवाज अधिक सुरेल यावर झुल्याचा ताण ठरलेला असायचा.

माझ्या झोपाळयाबुडीऽऽतुझ्या झोपाळयाबुडी
चिकट चिकट मातीऽऽचिकट चिकट माती
ती दिली ती दिली ..कुंभाराच्या हाती
कुंभारानं माका गाडगी गोली दिल्यान
गाडगी गोली दिल्यानऽऽ
गाडगी गोली मी बाय
बावीक दिलय, बावीक दिलय
बावीन माका पाणी दिला
पाणी मी बाय तौशीनीक शिपलय
तौशिनीन माका तवसा दिल्यान
तवसा मी गे कातून कातून खाल्लय
तवसा मी गे कातून कातून खाल्लय
साली नी बियो आडयात टाकलय
आडयान माका चारो दिलो
आडयान माका चारो दिलो
चारो मी गे गाय म्हशीक घातलय
गाय म्हशीक घातलयऽऽ
गाय म्हशीन माका दुधलो दिल्यान
दुधलो मी गे शिंक्यावर ठेवलय
शिंक्यावरलो बोक्यान खाल्यान
शिंक्यावरलो बोक्यान खाल्यान
बोक्याक मी दिलय चार धुबके
चार धुबके माझे राजाक पावले
राजान माका हत्ती घोडो दिल्यान
हत्ती घोडो मी बाय भयनीक दिलय
बाय भयनीन माका काजाळ कुकु दिल्यान
काजाळ कुकु मी बाय रूंबडाक फासलय
रूंबडान माका रूंबड दिले
रूंबडान माका रूंबड दिले
रूंबड मी गे व्हाळात टाकलय
व्हाळान माका मासो दिलो
व्हाळान माका मासो दिलो
मासो मी गे खडकावर ठेवलय
खडकावरचो घारीन न्हिल्यान
खडकावरचो घारीन न्हिल्यान
घारी माका मासो दी नाय तर पारव दी
घारी माका मासो दी नाय तर पारव दी
घारीन माको पारव दिल्यान..

हे गाणे झोपाळयावरचे सगळय़ांच्या तोंडात असायचे. झुल्यावर चार चार जण बसायचे. केव्हा केव्हा झुला तुटेल की काय, अशी अवस्था व्हायची. मग कुणीतरी खाली उतरून झोक्याला ताण द्यायचे आणि गाण्याचा ठेकाही धरला जायचा. शेतक-यांची मुले त्यांचे कल्पनाविश्वही तेवढेच असायचे. आतासारखी हिंदी-मराठी गाणी लहान मुलांच्या तोंडी नसायची. चित्रपट गीते हे वेगळेच विश्व होते. यामुळे मग शेत नांगर आणि बैलजोडी यावर गाणी म्हटली जायची. काही मुलांच्या तोंडात भजने असायची. पण झोपाळयावरच्या गाण्यांचा दिमाख वेगळाच.

अळम्या गो अळम्या
काका कु ऽऽ काका कु ऽऽ
खयच्या गो बैलार वाहू जू
खयच्या गो बैलार वाहू जू
वाहिन वाहिन..
टिकल्यावर..(आपल्या जवळच्या बैलांच्या नावाप्रमाणे हे संदर्भ बदलायचे)
टिकलो गे माझो गुणाचो
टिकलो गे माझो गुणाचो
पाठीवर शेलो फुलाचो
पाठीवर शेलो फुलाचो
पाठीवरचो शेलो व्हावान गेलो
टिकलो गे माझो पेवान इलो

अशा गाण्यांतच मग केव्हातरी भुकेची चाहूल लागायची. कोणीतरी यावे आपल्याला खाऊ द्यावे असे वाटायचे. अशा पाहुण्यांच्या प्रतीक्षेत असणारी गाणीही झोपाळयावर म्हटली जायची.
कनगीत कोण? कनगीत कोण?
सरडो म्हातारो ऽऽ
काय करता हा ऽऽ?काय करता हा ऽऽ?
वाट बेनता हा ऽऽवाट बेनता हा ऽऽ
कोण येता हा ऽऽकोण येता हा
मामा आणि मामी येता हा
काय आणता हा ऽऽकाय आणता हा
गुळाची ढय़ॅपऽऽ
गुळाची ढय़ॅप आम्ही खायाची नाय
मामा संगे आम्ही कधी बोलायचे नाय
कनगीत कोण? कनगीत कोण?
सरडो म्हातारो ऽऽ  काय करता हा ऽऽ?
वाट बेनता हा कोण येता हा
काका आणि काकी येतहत?
काय आणतहत?
काय व्हया हा?..

खाऊच्या गप्पा मग खूप लांबायच्या. गुळाची ढेप नको, भात-भाजी नको, चॉकलेटही नको, असे सांगत मग गाण्याची लांबी-रुंदी वाढत जायची. पावसाळयात येऊन जाऊन झोपाळयावर नाही तर भातुकलीचा खेळ हे ठरलेले असायचे. बाहुल्याही लाकडाच्याच, घोडे लाकडाचेच, गाडयाही लाकडाच्याच. मग कधी कधी खाऊचे रिकामे झालेले पुडे हाती मिळाले की काय आनंद..त्याची गाडी केली जायची. पुढे दोरा बांधून ती ओडली जायची. पण सारखे तेच खेळ खेळून कंटाळा यायचा. शाळेला सुट्टी मग नको वाटायची. आता शाळेच्या वेळा बदलल्या. पावसाळी सुट्टीही रद्द झाली.
मग जुन्या आठवणीत रमताना केव्हा केव्हा मेमधल्या लग्नसोहळयाची आठवण व्हायची.

व्हायनात कोको इयालो..दिवसा ढवळया ऽऽ
व्हायनात कोको इयालो, दिवसा ढवळया ऽऽ
सोन्याचा बाशिंग दादा नव-या
सोन्याचा बाशिंग दादा नव-या
दादा मागता छत्री घोडो,
व्हकाल मागता चंदन चुडो
चंदन चुडो साडयावर
लगीन लागला घोडयावर..
या गीताबरोबरच .दुसरे गीत असायचे.
गो.गो कारोटया ..देव आले दारोटया
देवळातल्या पाखरांनो डाळी उभ्यो करा..
देव आले घरा त्यांची पुजा अर्चा करा..

तीस  वर्षापूर्वी प्रत्येक क ोकणातील घरात हेच भावविश्व असायचं. कधी कधी आमच्या वात्रटपणामुळे घरातील मंडळी ओरडायची. मग त्याचा रागही झोपाळ्यावरही काढला जायचा. झोपाळयाचे दोर कापून अध्र्यावर ठेवायचे. मग कुणी झोपाळयावर बसून उंच झोका घेताना तुटून खाली यायचा. यावेळी कुणाची काही मोड तोड झाली तर मग आपण गप्प नाहीतर कसा राग काढला? हे सांगितले जायचे.

आता काँक्रिटच्या जंगलात सर्वच कोठेतरी हरखून गेले आहे. कमी-जास्त प्रमाणात पाऊस तोच आहे. निसर्गही तोच आहे. मात्र आई वडील, भाऊ, बहीण, पिता-पुत्र या नात्याचा अलिप्तपणा जाणवतोय.

गाव संस्कृतीची पडझड वाढू लागली आहे व हे स्वाभाविक असले तरी मुळात भावनिक ओलाव्याने आणि जिव्हाळयाने नातेसंबंधाने बद्ध असलेली आपली कोकणची कुटुंबव्यवस्था सद्या उद्ध्वस्त होत आहे. गेल्या पन्नास वर्षात हे स्थित्यंतर फार वेगाने व प्रकर्षाने घडून येताना दिसून येते. बदललेल्या घरांच्या रचनेत आता झोपाळयाला जागा नाही आणि असलीच तरी त्यावर बसायला कुणाला वेळ नाही.

आठवणींच्या हिंदोळयावर..!

‘आभाळ काळया मेघांनी भरून आलेलं असायचं, घरादारांना, मांगरांना धडको देत वारा सोसाटयाचा सुटलेला असायचा. माडाच्या शेंडयावरून धनेश पक्षी जोडीदारास आर्त स्वरांनी बोलावत असायचा. प्रवासी पक्ष्यांच्या चिरपरिचित बोलांचा परडयात कल्लोळ माजलेला असायचा. या सर्वाना भेदत टिटवी कर्णकर्कश बोंबलत असायची, आसमंत चक्री वा-यामुळे धुळीच्या गुलालाने भरून यायचे.

विजा चमकायला सुरू होऊन त्यांच्या कडकडाटाला सुरुवात झालेली असायची. आकाशात काळया ढगांची घालमेल सुरू असायची. त्यांच्या धावपळीतून गडगडाट सुरू होतो तो पाऊस सुरू व्हायचा. घराच्या नळयावर ताशे वाजवत, अंगणातील झाडांना धोपटत, थोपटत, बाळाच्या दुडुदुडु पावलांनी यायचा. मात्र, तो मुलखातला पाऊस असायचा. क्षणार्धात त्याचे रूप पालटायचे.

आता त्याने जोर धरलेला असायचा. त्याचा बाहेर दणदणाट सुरू असायचा. वारे घोंघावत असायचे. त्यामुळे परडयातील झाडांच्या फांद्या एकमेकांना घासणे, त्या मोडणे या सर्वाच्या आवाजाचा एक अद्भुत परिणाम सर्व वातावरणावर पडलेला असायचा. वातावरणात थंडावा आलेला असायचा. ओल्या थंड वा-याने मन व शरीर दोन्हीही शहारून यायची. आकाशात ढगांचा कानाचे दडे बसविणारा गडगडाट सुरूच असायचा.

भीती असायची..आणि घरातले काळोखातले कोन अधिक भीतीदायक वाटायचे..आज २५ वर्षापूर्वीच्या आठवणी डोळयापुढे  सर्रकन उतरतात. प्रत्येक क्षणी आई जवळ हवी असे वाटू लागायचे. करणारा दरवाजा किलकिला करून मी आईची वाट बघायचो, कारण आई शेतावर गेलेली असायची. पप्पा कामावर गेलेले असायचे आणि  शेतात पोहोचलेल्या कामगारांना पाहण्यासाठी त्यांच्यासोबत काम करत शेतीला गती देण्यासाठी पदर खोचून आईच पुढे असायची. घरात कॉलेजमधून आलेली ताई असायची; पण आईची आठवण आली की, दरवाजा उघडायचा प्रयत्न व्हायचा..थोडयाशा उघडलेल्या दरवाजातून तोंड बाहेर काढले की गार वारा तोंडावर आदळायचा.

आमची ताई म्हणजे मोठी  बहीण मला झटकन् उचलून खांद्यावर घ्यायची थोपटायला सुरू करायची. आईच्या आठवणीने जीव कासावीस झालेला असायचा. मी उठायच्या अगोदरच आई शेतात गेलेली असायची. तिच्या ओढीने कसाबसा रोखून धरलेला डोळयातील पाऊस पापण्यांचा बांध ओलांडून सैरावैरा वाहू लागायचा. माझ्या आसवांनी तिचे खांदे ओले झालेले असायचे. तिच्या गोड गुणगुणण्याने डोळयात पेंग दाटून यायची. बाहेर पावसाचं धो-धो कोसळणं सुरूच असायचं. त्या पेंगत आईची आठवण सुरू असायची. जागे राहण्याचा प्रयत्न असायचा. त्यातच ताईला विचारायचो.

‘ताई आये कधी येतली ’?
ताई सांगायची –
‘आये सांज झाली काय येतली.
माझा पुढचा प्रश्न असायचा
‘सांज कधी होतली?
ताई सांगायची -‘बांडकी आराडली काय सांज होतली,
मग माझा हट्ट सुरू व्हायचा
‘मग बांडकेक आरडाक सांग ना ताई’
मग ताई हसुन सांगायची
‘बरा सांगतयऽऽ हा बांडके क आरडाक ’

माझ्या मोठया बहिणी झोपाळयावर मला व माझ्या भावांना मध्ये घेऊन झोका घ्यायच्या. माजघरात झोपाळा असायचा. गावात तेव्हा लाईट नुकतीच येऊ लागली होती. पेट्रोमॅक्स,कंदीलाचा मिणमिणता प्रकाश, झोपाळयाचा कर कर आवाज वातावरणात उदासीनता असायची.

झोपाळयाच्या झोकाने अंधा-या माजघरात लहान-मोठया हलणा-या सावल्यांची भुते मनात घर करून राहायची. गोष्टीतल्या  भूत, खेत, राक्षस मनाभोवती फेर धरून नाचायची. मग फक्त आईची आठवण पुन्हा उफाळून यायची. ताईकडे घाबरून पुन्हा हट्टाचं पालुपद चालू करायचो. ‘तायग्या बांडकेक आरडाक सांग ना ऽ ऽ गो. ताईचं ‘तायग्या’ झालेलं असायचं. मग मात्र त्या तिघी एकाच सुरात झोपाळयाच्या तालावर बेडकेस सांगायच्या..

‘आराड गे बांडके सांज जावंदे ऽ सांज जावदे
आये आमची ऽऽआये आमची
घरा येवंदे, घरा येवंदेऽ
येकच नारळ फोडूं दे फोडूं दे
आमका खोबरा देवं दे, देवं दे
आराड गे बांडके सांज जावंदेऽऽ सांज जावंदे
आये आमची  घरा येवंदे  
उमरात कनग्यो भांजूं दे भांजूं दे
आमका सोलून देवं दे, देवं दे
आराड गे बांडके सांज जावं दे ऽऽ सांज जावं दे
आये आमची, आये आमची घरा येवंदे’

तोपर्यंत खरोखरच सांज झालेली असायची. रातकिडय़ांच्या सुरावटीबरोबर बेडकांनी ताल धरलेला असायचा. त्याची टिरटिर सुरू झालेली असायची. आता नक्कीच आई घरी येणार. कारण ताईचं बेडक्यांनी ऐकलेलं असायचं या उत्सुकतेत असतानाच लांबून पांदणीतून येणारी आई दिसायची.

पप्पांची हाक ऐकू येण्यापूर्वी बैल गोठयात परतलेले असायचे. पावसाने भिजलेले गारठलेले,थकले भागलेली .. माझी आये. त्या थंड झोंबणा-या पावसाच्या झडीतून लगबगीने दमून भागून गारठून पडवीत पाऊल टाकायची. दरवाजात येईतो मी ताईच्या खांद्यावरून

तिच्याकडे झेप घ्यायचो. मला कवटाळत ओल्या खा-या गालाचे मुके घेत ती कंबरेवर घेऊन मागल्या दरवाजाजवळच्या न्हानीतील चुलीच्या उबेला घेऊन जायची. कधी कधी धुवाधार पावसात या न्हानीच्या चुलीत काजी भाजल्या जायच्या. फणसाच्या हाटळया भाजल्या जायच्या. त्या खात खात मग आईच्या कुशीत बिलगायचा प्रयत्न व्हायचा. आईच्या मांडीच्या झुल्यावर मी झुलत असायचो. तिचे अंगाईचे सूर, चुलीची उब, देवाजवळच्या धुपारतीचा सुगंध, अविरत धो-धो कोसळणा-या पावसांच्या सरींचा आवाज, बेडकांची टिपेला पोचलेली टिर टिर, साथीला रातकिडय़ांची किरकिर, पाठीवर आईचा फिरणारा प्रेमळ हात यात मी गाढ झोपून गेलेला असायचो.
आई  अंगाई म्हणायची

‘‘ ये गे गाई तू पाना खाई ऽऽ
पाना खाई तू दामनीची ऽऽ
दामन भरली गे फुलांनी ऽऽ
बाळ भरले गे बोलानी ऽऽ
बोल न्हिले गे कावळयानी ऽऽ
बाळ न्हिले गे मावळयानी ऽऽ

2 COMMENTS

  1. खुप सुंदर झालाय हा लेख ! कोणी लिहीलाय कळु शकेल का? खुप वर्षांपूर्वी डॉ. सरोजिनी बाबर यांची भेट झाली होती सोलापूरच्या स्ररस्वती सदन प्रशालेत. हा लेख वाचताना पदोपदी त्यांवी आठवण येत होती. धन्यवाद _/\_

  2. निव्वळ अप्रतिम! मी जरी कोकणातली नसले तरी झोपाळा आणि पावसाळ्याचं हे चिरपरिचित वर्णन थेट भूतकाळात घेऊन गेलं. गाणी वगळता बाकीचं बरचसं अनुभवलं आहे, त्यामुळे फार भावलं. ज्यांना ह्या सगळ्याची ओळख नाही, त्यांनाही ओळखीचे वाटेल इतके ताकदीचे चित्रदर्शी लेखन आहे.

    लेखकाचे नाव जरूर कळवा. इतका सुंदर लेख वाचण्यासाठी सुचवल्याबद्दल विशालचे विशेष आभार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version