Home किलबिल आळशी मांजर

आळशी मांजर

1

एका गावात एक मांजर राहत होती. तसे ती अंगाने चांगलीच धष्टपुष्ट होती; परंतु उंदीर पकडायचा तिला कंटाळा येत असे. त्याबाबतीत ती आळशी होती. आळशीपणा अंगात असल्यामुळे डोळे मिटून काहीही हालचाल न करता शरीराचे मुटकुळे करून मांजर झोपून राही. भूक लागल्यावर मात्र, कुठल्यातरी घरात शिरून चोरून दूध प्यायचे किंवा इतर खाद्यपदार्थ खायचे आणि परत येऊन शांतपणे पडून राहायचे. मांजरीचा रोजचा दिनक्रम असाच चालला होता.

एके दिवशी नेहमीप्रमाणे भूक लागल्यानंतर आयते मिळणा-या अन्नाच्या शोधात ती निघाली. त्यावेळी एका घरातून नुकत्याच शिजवलेल्या माशांचा खमंग वास मांजरीच्या नाकात शिरला. दबक्या पावलाने घरातल्यांची नजर चुकवत मांजरीने त्या घराच्या स्वयंपाकघरात प्रवेश केला. माशाच्या खमंग वासाने तिची भूक चाळवली होती. त्यामुळे मांजरीला राहवले नाही. तिने स्वयंपाकघरातील ओटय़ावर उडी घेतली आणि तिथे असलेल्या पातेल्यात तोंड घातले. परंतु, ते पातेले नुकतेच गॅसवरून उतरून ठेवलेले असल्यामुळे गरम होते. त्यातील माशाचे कालवणही गरम होते. मांजरीने त्यात तोंड घातल्याबरोबर ते भाजले.

त्या चटक्यामुळे मांजर धडपडले आणि त्यातच ते पातेले उलटले. माशाचे गरमागरम कालवण तिच्या पायावर पडले आणि तिचे पायही भाजले. स्वयंपाकघरातील ही गडबड घरातील मालकिणीच्या लक्षात आल्यावर ती आत आली. तिने तिथेच असलेल्या गरम पलित्याने मांजरीला झोडपायला सुरुवात केली. भाजलेले मांजर या अनपेक्षित हल्ल्याने गोंधळून गेले. बाहेर पळून जाण्यासाठी तिने खिडकीकडे धाव घेतली. परंतु, लठ्ठ असल्यामुळे खिडकीच्या गजात अडकून पडली. त्यामुळे तिला आणखीच मार पडला. शेवटी जोर लावून ती कशीबशी त्या खिडकीतून बाहेर पडली आणि सुटकेचा नि:श्वास टाकला. बाहेर पडल्यानंतर मात्र तिने कानाला खडा लावला आणि यापुढे चोरी न करण्याचे ठरवले. आळशीपणा सोडून व मेहनत करून उंदीर पकडायचा निश्चय तिने केला.

तात्पर्य : आलस्ये कार्यभाग नासतो. आळशामुळे काम होत नाही. मेहनतीला पर्याय नाही.

– सौ. दीप्ती गुंडये, वरळी

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version