Home Uncategorized उत्पन्नाला सोनचाफ्याचा बहर

उत्पन्नाला सोनचाफ्याचा बहर

2

गुलाब, जरबेरा, शेवंती, जाई-जुई, मोगरा, लिली, झेंडू यांसारख्या हंगामी फुलशेतीबरोबर दीर्घकाळ उत्पन्न देणा-या सोनचाफ्याचा सुगंध फुलबाजाराला आकर्षित करत आहे. कमी श्रम, कमी मनुष्यबळाची गरज, मात्र एकरी ५ ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नाची हमी मिळत आहे.

शहापुरातील शेतकरी बदलतोय. नगदी उत्पन्न देणारी भाजीपाला, फुलशेती शेतक-यांची पहिली पसंती ठरत आहे. गुलाब, जरबेरा, शेवंती, जाई-जुई, मोगरा, लिली, झेंडू यांसारख्या हंगामी फुलशेतीबरोबर दीर्घकाळ उत्पन्न देणा-या सोनचाफ्याचा सुगंध फुलबाजाराला आकर्षित करत आहे. कमी श्रम, कमी मनुष्यबळाची गरज, मात्र एकरी ५ ते ७ लाख रुपयांच्या उत्पन्नाची हमी मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यास या फुलांचा सुगंध वाढण्याबरोबरच ती जास्त काळ टवटवीत राहतात. यामुळे सेंद्रिय शेतीचा सल्ला शेतीतज्ज्ञांकडून दिला जातो. फुलशेतीला शहापूर तालुका कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात असून कृषी सहाय्यक शेतावर जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करत आहेत. साजिवली, खुटाडी, सरलांबे, अर्जुनली, सापगाव, तुते, खरिवली, आवरे, कांबारे, चेरपोली, अंदाड, हिव, आस्नोली, चेरवली, आदिवली, शिरगाव, लेनाड, शेंद्रूण आदी गावांमध्ये रंगीबेरंगी फुलांची शाल पांघरलेली शेती लक्षवेधी ठरू लागली आहे.

सोनचाफ्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका आहे. सोनचाफ्याच्या विविध ४० जाती आढळतात. भारत, पाकिस्तान, चीन, मलेशिया, फिलिपाइन्सआणि इंडोनेशिया या देशांत प्रामुख्याने झुडपांच्या स्वरूपात ही झाडे आढळतात. सोनचाफ्याचे पिवळे टपोरे सुगंधित फूल असते. या सुगंधी फुलाचा विविध धार्मिक कार्य, लग्नसमारंभ वा विविध कार्यक्रमांत आवर्जून वापर केला जातो. यामुळे या फुलाला बाजारात सातत्याने मोठी मागणी असते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. शहापुरातील मानस रुरल इन्स्टिटय़ूशनने मूळ झाडांवर कलमे करून कमी उंचीच्या झाडांची जात विकसित केली आहे. कमी जागा व्यापत असल्याने ही रोपे लागवडीच्या दृष्टीने शेतक-यांना अधिक सोयीची ठरतात. सोनचाफ्याची मागणी पाहता शेतक-यांना या फुलशेतीसाठी मानसकडून प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही केले जात आहे.

शेतक-यांनी भातशेतीसोबत सोनचाफ्याच्या फुलांची लागवड केल्यास त्यांना अल्पावधीत चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल. कमी पाण्यामध्येही ही फुलशेती करणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती व मार्गदर्शन करण्यास आमची संस्था तयार आहे. केवळ शेतक-यांनी आपली मानसिकता बदलायला हवी. – डॉ. साहेबराव क्षीरसागर, प्राचार्य, मानस रुरल इन्स्टिटय़ूट, साजिवली

शहापुरातील भातसा धरणाच्या पायथ्याशी साडेपाच एकरावर मानस रुरल इन्स्टिटय़ूटने सोनचाफ्याची लागवड केली आहे. प्रति एकरी ४०० प्रमाणे साडेपाच एकरमध्ये सुमारे २२०० रोपांची लागवड केली आहे. सोनचाफ्याच्या गडद पिवळा, गडद केशरी, राखाडी पांढरा आदी जाती प्रचलित आहेत. मात्र लाल व सफेद या रंगाच्या सोनचाफ्याच्या फुलांचा बहर हा केवळ दोन ते अडीच महिन्यांपुरताच राहतो. यामुळे दीर्घकाळ उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या गडद पिवळय़ा सोनचाफ्याला अधिक पसंती दिली जाते. वर्षभर फुले देणारी ही जात असल्याने शेतक-यांनाही वर्षभर नगदी उत्पन्न मिळू शकते, असे मानस रुरल इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ. साहेबराव क्षीरसागर यांनी सांगितले.

सध्या फुलशेतीला सोन्याचे दिवस आले आहेत. सोनचाफ्याला हक्काची बाजारपेठ आहे. सरकारी स्तरावर यासाठी विविध प्रकारचे अर्थसहाय्यही दिले जात आहे. शेतक-यांच्या मार्गदर्शनासाठी आमचे कृषी सहाय्यक सदैव तत्पर असतात, त्यांची मदत घ्यावी. शेतक-यांनी सोनचाफ्याची लागवड आणि काढणीचे तंत्र आत्मसात केल्यास त्यांच्या आर्थिक भरारीला निश्चितच पंख फुटतील. – अजय पाटील, तालुका कृषी अधिकारी, शहापूर

लागवड, फुलांची तोडणी करताना घ्यावयाची काळजी

सोनचाफ्याची लागवड करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. या फुलांच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणारी जमीन निवडावी. तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. इतर झाडांची सावली असल्यास सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ही झाडे उंच वाढतात. यामुळे फुले तोडणीच्या वेळेस अवघड होऊन बसते. म्हणूनच मोकळी जागा असणे आवश्यक असते. बारमाही पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी कोणत्याही हंगामात या रोपांची लागवड करता येते. कलम लावताना ६० सें. मी. बाय ६० सें. मी. तर उंची ६० ते ७५ सें. मी. चा खड्डा खणून तो कंपोस्ट खत, गांडूळ व शेणखताने अर्धा भरावा. तसेच तीन-तीन मीटर अंतरावर ही रोपे एका रांगेत लावावी. झाडांना वेळोवेळी शेणखत, गांडूळखत व स्टेरामील ही खते दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. जमिनीच्या पोतानुसार पाण्याचा पुरवठा करावा लागतो. शक्य तो ठिबकसिंचनाने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा के ल्यास दिवसाला सरासरी १५ ते २० फु ले येतात. वर्षातून किमान १५० ते १८० दिवस हा बहर सुरू राहतो. सोनचाफ्याची फुले ही अतिशय नाजूक असतात. यामुळे ती हलक्या हाताने काढावीत. अति ऊन आणि चुकीच्या हाताळणीने हे फूल कोमेजते. यामुळे काढणी व विक्री हे तंत्र शेतक-यांनी आत्मसात करायला हवे, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले. मेहनत व मशागतीचा खर्च वजा करता किमान १ लाख रुपये नफा मिळतो. मनुष्यबळ व शेणखत कंपोस्ट खत शेतक-यांनीच तयार केल्यास हा फायदा दुप्पट होतो, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. ‘मानस’ने फुलवलेल्या सोनचाफ्याला मोठी मागणी आहे. ठाणे, मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये ही फुले विक्रीला जात आहेत. तसेच मागणीनुसार विविध कार्यालयांतही पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे. ‘मानस’चा हा प्रयोग इतर शेतक-यांना मार्गदर्शक असून सोनचाफ्याची शेती त्यांचे आयुष्य सोनेरी करण्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

औषधी उपयोग

सोनचाफ्याच्या फुलांचा वापर सजावटीपासून वैद्यकीय उपयोगासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर ही फुले चुरगळल्यास या फुलांचा उपयोग विविध प्रकारची सुगंधी अत्तरे व सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी होतो. तसेच सोनचाफ्याच्या सालीचा उपयोग टॉनिक बनवण्यासाठीही होत असून मानसोपचारातही या फुलांचा वापर केला जात आहे. सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखापतीवरही सोनचाफा हे रामबाण ठरते. डोळे दुखणे, डोळय़ांच्या विविध आजारांवर यात औषधी गुणधर्म आढळतात. यामुळे औषध आणि अत्तर निर्मात्या कंपन्यांकडून या फुलाला मोठी मागणी आहे. शेतक-यांनी या बाजारपेठेवर आपले लक्ष केंद्रित केल्यासही त्यांना मोठा उत्पन्नाचा स्रेत सापडू शकेल.

‘सुगंधी’ गैरसमज

सोनचाफ्याचे फूल हे नैसर्गिक सुगंधासाठी म्हणून ओळखले जाते. मात्र या सुगंधी गुणधर्मामुळे या फुलाविषयी अनेक गैरसमज पसरलेले आढळतात. सोनचाफ्याच्या सुगंधामुळे या झाडाच्या आसपास सापांचा वावर वाढतो, असा गैरसमज आहे. यामुळे अनेक जण सोनचाफ्याची लागवड घराजवळ करण्यास टाळतात. मात्र तसे काहीच नसून ही फुलशेती घरानजीकही होऊ शकते.

2 COMMENTS

  1. अति उत्तम।आम्हालाही पुण्यात किंव्वा जवळ मार्गदर्शनसाठी पर्याय सुचववा

    • साहेब माझा नंबर ९९८७५०५८६० आहे मला सोनचाफा सुंगधी आॅईल म्हणजे अत्तर हवे आहे नैसर्गिक रित्या बनलेले मोठ्या प्रमाणात ऎऊ शकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version