Home कोलाज उशीर झालेलं घरचं केळवण

उशीर झालेलं घरचं केळवण

2

डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांना आज चंद्रपूरनगरीत ‘चंद्रपूर भूषण’ पुरस्काराने सन्मानीत केले जात आहे.

लोकनायक बापूजी अणे यांच्यासोबत स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले ख्यातनाम वकील अ‍ॅड. बाबासाहेब देशमुख यांच्या नावाचा दिला जाणारा ‘चंद्रपूर भूषण’ पुरस्कार आमटे दाम्पत्याला सादर होणार आहे.

या दाम्पत्याने जवळपास ४५ वर्षे हेमलकसा जंगलात आदिवासींची वैद्यकीय सेवा केली. त्याची दखल जगाने घेतली. ‘पद्मश्री’ने राष्ट्रपतींनी गौरविले, मॅगेसेसे पुरस्कार मिळाला, मदर तेरेसा पुरस्कार मिळाला, लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला. सगळे नामवंत पुरस्कार मिळाल्यानंतर आता चंद्रपूरवासीयांनी त्यांना ‘चंद्रपूर भूषण’ पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराला तसा उशीरच झाला. परंतु, ‘घरचं केळवण’ उशिराच होत असतं. त्यानुसार चंद्रपूरवासीयांनी या दाम्पत्याला आज सन्मानीत करण्याचे ठरविले आहे.

आज हेमलकसा ब-याच सोयींनी युक्त आहे. पण, ज्या दिवशी प्रकाश आमटे यांनी आपल्या एम. एस. या पदवीनंतर त्या जंगलात जाऊनच आदिवासींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी डॉ. मंदा स्वत:हून आल्या, तो काळ केवळ ‘जंगल में मंगल’ असा नव्हता. अतिशय कठीण आणि विपरित परिस्थितीत या दाम्पत्याने खूप मोठे कष्ट आणि जिद्दीने या भागातल्या आदिवासींवर उपचार केले. बोराएवढे डास त्या भागात अजूनही आहेत. डास चावला की दोन तासांच्या आत मोठा फोड येतो. त्यात पस पकडतो. ज्या काळात काही साधने नव्हती, तेव्हा प्रकाश आणि मंदाताईंनी या गरीब आदिवासींचे फोड हाताने फोडून, कापसाने त्यातला पस साफ करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. त्यामुळे हेमलकशाच्या आदिवासींना हे दाम्पत्य म्हणजे देवदूत वाटले. या गरीब आदिवासींजवळ डॉक्टला देण्यासाठी ‘फी’ नव्हती. ‘फी’ म्हणजे काय हे त्यांना कळतही नव्हते. मग हे आदिवासी कधी जंगली सुरण आण, रताळी आण, कधी सशाचे पिल्लू आण आणि वाघाचे पिल्लूसुद्धा आणीत आणि ते डॉक्टरला फी म्हणून देत.  प्रकाशच्या हेमलकसा प्रकल्पात आज जे दोन वाघ मोठे झाले आहेत, ते डॉक्टरच्या फीच्या रूपाने प्रकाश आणि मंदाताईंना रुग्णांनी दिलेली भेट आहे. या दोघांनी त्यांना वाढवले आणि मित्र केले. नुसता वाघ मित्र नाही, तर जहरी आग्यामण्यारही हेमलकशाच्या प्रकाशच्या प्रकल्पात मित्र झालेला आहे. पण याच मित्राने प्रकाश आमटे यांना एकदा डंख केला आणि फार मोठय़ा मुश्किलीने या जहरी आग्यामण्यारच्या विषातून प्रकाशचे प्राण वाचलेले आहेत.

आज हेमलकशाला जाताना ब-याच सुविधा आहेत. पण, पहिली २५ वर्षे वीस मैल चालत जावे लागे. दाट जंगल, सात माणसांनी हात हातात घेतले तर झाडाला विळखा घालता येईल, इतकी प्रचंड झाडे. सूर्यप्रकाश आत येणे अशक्य. आनंदवनातून बाबा आमटे महिन्याचे किराणा सामान माणसांच्या डोक्यावर ओझे चढवून पाठवत असत. पण तरी सामान यायला उशीर झाला तर, प्रकाश आणि मंदाताईंना दोनदोन-चारचार दिवस कंदमुळे उकडून त्यावर दिवस काढावा लागे. अशा विपरित परिस्थितीत केवळ बाबा आमटे यांचा सुपुत्र?आणि सूनच या अग्निदिव्यात तावून- सुलावून निघू शकतात. प्रकाश आणि मंदाताईंना दै.‘प्रहार’कडून शुभेच्छा!

2 COMMENTS

Leave a Reply to Bray Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version