Home टॉप स्टोरी एकनाथ खडसेंचा अखेर राजीनामा

एकनाथ खडसेंचा अखेर राजीनामा

1

अनेक वादात सापडलेले महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. 

मुंबई- अनेक वादात सापडलेले महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना तीन वेळा क्लीनचिट दिलेले महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच आपल्या पत्रकार परिषदेला डाव्या हाताला बसवून एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

काल रात्री उशीरा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खडसे यांना फोन करून ‘आपण त्वरित राजीनामा द्या, बाकी चर्चा करण्याची गरज नाही’ असा श्रेष्ठींचा निरोप दिल्यानंतर मुक्ताईनगरहून मुंबईला परतलेल्या खडसे यांनी आज घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पक्षश्रेष्ठींचा दबाव, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाचे मौन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या एसीबीने (अ‍ॅन्टी करपन्श ब्युरो) केलेल्या चौकशीतून गेले आठ दिवस भाजप पक्षश्रेष्ठींनी खडसे यांची बदनामी पूर्णपणे होऊ दिली. पक्षाच्या दबावानंतर खडसे यांनी आज राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना खडसे यांच्या डाव्या बाजूला रावसाहेब दानवे आणि उजव्या बाजूला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता बसले होते. त्यापैकी कुणीही खडसे यांच्या संबंधात कसलेही वक्तव्य केले नाही. पत्रकार परिषदेत खडसे म्हणाले की, विरोधकांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे दिलेले नाही. माझी सातत्याने बदनामी केली. चारित्र्यहनन केले आणि म्हणून महसूल आणि अन्य आठ खात्यांच्या पदाचा राजीनामा मी देत असून माझ्यावरील आरोपांची सखोल चौकशी होऊन निर्दोषत्त्व सिद्ध होईपर्यंत मंत्रीपदावर मी राहणार नाही. राजकीय जीवनातील नैतिकता मानणारा कार्यकर्ता मी असून त्यासाठीच मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केले. खडसे यांच्या घाईघाईच्या निवेदनानंतर पत्रकारांना एकही प्रश्न विचारून न देता खडसेंना ‘क्लीन चीट’ देणा-या रावसाहेब दानवे यांनी परिषद लगेच गुंडाळली.

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात एकनाथ खडसे यांना घेऊन रावसाहेब दानवे शनिवारी दुपारी १ वाजून २० मिनीटांनी आले. त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता होते. मात्र मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या बाजूला बसणे टाळले.

परिषदेत बोलताना खडसे यांनी सांगितले की, मला माध्यमांचा अतिशय कटू अनुभव आलेला आहे. त्यांनी माझी सातत्याने बदनामी केली. भाजपमध्ये आणि जनतापक्षात गेली ४० वर्षे मी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे. आणीबाणीमध्येही मी संघर्ष केला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकीय कार्यकर्ता म्हणून वाढलो आणि काम केले. या ४० वर्षात मी अनेक चढ-उतार पाहिले. ४० वर्षाच्या राजकीय प्रवासात सत्तेतही राहिलो आणि विरोधी पक्षातही काम केले, मात्र ‘मिडीया ट्रायल’चा कटु अनुभव मला कधीही आलेला नव्हता.

माझ्या मालमत्तेसंदर्भातील आरोप असो किंवा भोसरीतील जमिन असो, हे आरोप करणा-यांनी म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत असतील आणि सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानीया असतील यांनी अद्याप कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. दिशाभूल करणारे आरोप केले गेले, असे सांगून खडसे म्हणाले, माझ्यावरील सर्व आर्थिक आणि सामाजिक आरोपांची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत:हून राजीनामा देत आहे.

मंत्रीपदाच्या माझ्या काळात मी ११९ निर्णय घेतले, असे सांगून खडसे यांनी असाही दावा केला की, गेल्या ५० वर्षात महसूल क्षेत्रात जे बदल झाले नाहीत ते बदल आपण कॅबिनेटच्या सहका-याने केले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि जनतेला दिलासा मिळालेला आहे.

खडसे यांनी सनसनाटी आरोप केला की, गेले काही दिवस २४ तास माझ्या घरावर प्रसारमाध्यमांचा जणू पहाराच होता. मी दाऊदसारखा गुंड आहे, असाही प्रचार करण्यात आला. मी तसा गुंड आहे काय? असा सवाल खडसे यांनीच यावेळी केला.

गेल्या १५-२० दिवसात माझ्या विरोधात बदनामीची मोठी मोहिम उघडण्यात आली. अशावेळी भारतीय जनता पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला, असे खडसे यांनी सांगितले. मात्र एकही प्रश्न विचारून देण्यात आला नाही. त्यामुळे पत्रकारांना शुद्धलेखन घातल्यासारखी पत्रकार परिषद गुंडाळण्याचा संताप पत्रकारांनी व्यक्त केला.

निवृत्त न्यायाधीश चौकशी करणार : मुख्यमंत्री

दैनिक ‘प्रहार’ने १ जून २०१६च्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताप्रमाणे खडसे यांच्या राजिनाम्यानंतर निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येणार असून चार महिन्यात त्याचा अहवाल येईल, खडसे यांना निर्दोष ठरवले जाईल आणि नागपूर अधिवेशनापूर्वी खडसे यांचा पुन्हा शपथविधी होईल.

[EPSB]

चौकशी न करताच फडणविसांनी घेतला खडसेंचा बळी

त्यांचा राजीनामा हा भाजपामधील अंतर्गत सुडराजकारणाचा बळी आहे, अशी तीव्र प्रतिक्रीया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.


खडसेंची विकेट गेली?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महसूलमंत्री खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन ठेवला असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर खडसे यांचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी कधीही जाहीर होऊ शकते.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version