Home कोलाज एकांकिकांची रंगशाळा

एकांकिकांची रंगशाळा

1

नाटयकलावंत, लेखक, दिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, रंगभूषाकार हे वेगवेगळ्या माध्यमांतून घडत असतात. त्यांच्या या जडणघडणीत एखाद्या नाटयशिबिराचा वाटा असतो. एखाद्या संस्थेच्या नाटकांची तालीम पाहता-पाहता कलावंत घडत जातो. कधी बालपणापासून असणा-या अभिनयाच्या आवडीतून तो आकार घेत असतो. याच प्रक्रियेतील एक कलावंत घडवणारी, रंगभान देणारी चळवळ म्हणजे एकांकिका स्पर्धा…
मराठी रंगभूमीवर येणारे कलावंत वेगवेगळ्या माध्यमांतून घडत असतात. मुंबई-पुण्यासारख्या मोठया शहरात काही संस्था विद्यार्थ्यांसाठी अभिनय कार्यशाळा घेतात. उन्हाळ्याची किंवा दिवाळीच्या सुटीचा मुहूर्त साधून या शिबिरांत छोटे दोस्त अभिनयाचे धडे घेतात. त्यातूनच बालनाटय़ं बसवली जातात. ज्यांना नाटयक्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे, असं वाटतं ते पुढे सुरुवातीला कुठल्यातरी ग्रुपमध्ये एकांकिकेत काम करतात. त्यांचा उत्साह वाढतो. अभिनय करता-करताच एकांकिकेचं तंत्र शिकतात. नंतर दिग्दर्शन करतात. कुणी एकांकिका लिहितात. हा हुरूप वाढत जातो. याच एकांकिकेच्या तालमीतून त्यांचं रंगज्ञान फुलतं आणि पुढे मोठं नाटक लिहण्याचं बळ त्यांच्यात संचारतं.

ग्रामीण भागातील कलावंतांना हे नाटय प्रशिक्षण कार्यशाळेचं माध्यम उपलब्ध नसतं. त्यामुळे गाव खेडयातले, छोटया तालुक्यातले कलावंत एकांकिका बसवता-बसवताच नाटक शिकतात, पुढे एकांकिका लिहितात, मोठं नाटक बसवतात आणि एकांकिकांच्या रंगशाळेतून तयार झालेले कलावंत नंतर नावारूपालाही येतात. त्यांना टप्प्याटप्प्याने थिएटर शिकावं लागतं. त्या टप्प्यांमधूनच ते त्यांचा रंगप्रवास पुढे-पुढे सरकत असतो.


शाळा
शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी वेगवेगळ्या स्पर्धा होतात.. कुणी एकपात्री प्रयोग सादर करतात. कुणी दिवाकरांची नाटयछटा. चार-पाच मित्रमैत्रिणी एकत्र येऊन छोटीशी नाटिका बसवतात. बक्षीस कमावतात. अभिनयाची ओढ वाढते. शाळेत मिळालेलं बक्षीस हुरूप देतं. अभिनय करण्याचं बळ संचारतं. इयत्ता वाढते, तसतशी कलावंताची हौस वाढते. दरवर्षी नाटिका सादर करण्याच्या तंत्राचा मंत्र गवसतो. १५ मिनिटांच्या नाटिकेऐवजी एकांकिका सादर करण्याचं आव्हान पेललं जातं. शालेय जीवनात कमावलेलं नाटयाभिनयाचं संचित महाविद्यालयीन जीवनात नाटयवेड जागवतं. नाटकाची आवड असणा-या मित्र-मैत्रिणींचा शोध घेतं.


महाविद्यालय
नाटक करण्याची आवड असणारे चार मित्र भेटतात.. कुठेतरी एकांकिका स्पर्धा असल्याची बातमी वाचतात. त्या स्पर्धेत सहभागी होऊ, असं ठरवतात. एकांकिका निवडतात. ती स्पर्धेत सादर करण्याचं निश्चत करतात. स्पर्धेचा प्रवेश अर्ज मागवतात. पॉकेटमनी एकांकिकेच्या निर्मितीला लावतात. ज्याला नाटकाबद्दल जरा अधिक कळतं त्यातला एक दिग्दर्शक होतो. मित्रांपैकी कुणीतरी प्रकाशयोजनेची जबाबदारी घेतो. पार्श्वसंगीताची तयारी होते. नेपथ्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. प्रकाशयोजना कशी करायची हे ठाऊक नसतं. स्पॉट, जनरल लाइट म्हणजे काय, हे कळतही नसतं. तरीही हुरूप असतो. उत्साह असतो. तालीम वेग घेते. पाठांतर होतं. पण तालीम रंगत असतानाच एकांकिकेसाठी निवडलेल्या मुलीला घरातून परवानगी नाकारली जाते. नव्या मुलीचा शोध घेतला जातो. मैत्रिणींच्या ओळखीनं नवी कलावंत सापडते. पुन्हा पाठांतर, पुन्हा तालीम. स्पर्धेचा दिवस जवळ येतो. स्पर्धेचं स्थळ गाठलं जातं. एकांकिका सादर करण्याची वेळ येते. ऐनवेळी संवाद विसरतात. प्रकाशयोजना करणा-याची तारांबळ उडते. प्रकाशयोजनाकाराचा डिमरवरचा हात थरथरतो. भलताच स्पॉट भलत्याच ठिकाणी उजेड देऊन जातो. असंख्य चुका होतात. तरीही एकांकिका सादर होते. त्यानंतर परीक्षक भेटतात. इतर एकांकिका बघायला सांगतात. त्यातून शिका, असा मोलाचा सल्ला देतात. पहिल्यांदाच सहभागी झाल्याबद्दल अभिनंदनही करतात. शुभेच्छा देतात. चुका लक्षात आणून देतात. पुढच्या वेळी शिकूनसवरून नव्या दमाने नवी एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न होतो. कुणाला तरी अभिनयाचं प्रोत्साहनपर प्रमाणपत्र मिळतं. हुरूप वाढतो आणि कलावंत घडत जातो.


एकांकिकांचा सुवर्णकाळ
साधारणत- दशकभरापूर्वी राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठया प्रमाणात एकांकिका स्पर्धा होण्याचा सुवर्णकाळ होता. औरंगाबादमध्ये महापौर करंडक, नांदेडची ‘साई’ करंडक, विदर्भातील नागपुरात डावरे-कोठीवान एकांकिका स्पर्धा, ‘चौकट’ महोत्सव, रात्रकालीन एकांकिका स्पर्धा, चंद्रपुरात ‘नवोदिता’, उमरेडमध्ये ‘स्मितांकित’, वध्र्यात ‘निहार’, गडचिरोली, वरोरा, पुलगाव येथेही मोठया प्रमाणात एकांकिका स्पर्धा होत होत्या. कोपरगाव, पेण, कणकवली, रायगड जिलतील नागोठणे, हिंगोली येथे वेगवेगळ्या संस्था एकांकिका स्पर्धेचं आयोजन करत होत्या. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसोबतच ‘अल्फा करंडक’ महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा व्हायची. या स्पर्धानी एक माहोल तयार केला होता. मुंबई-पुण्यात तर अनेक एकांकिका स्पर्धानी प्रतिष्ठा कमावली आहे. त्या सुवर्णकाळाच्या तुलनेत आज गाव-खेडयात होणा-या स्पर्धा बंद पडल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक एकांकिका लिहिल्या गेल्या. लेखक पुढे आलेत. लिहिते झालेत. अनेकांनी त्यात आपलं नाव कमावलं. अलीकडच्या काळात शहरात या एकांकिका स्पर्धा सुरू असल्या तरी त्यात ग्रामीण भागातून येणा-या कलावंतांचा सहभाग अलीकडे कमी झाला आहे. या इतिहासजमा झालेल्या उपक्रमाला संजीवनी देऊन, तो पुनर्जीवित करण्याचं मोठं आव्हान रंगचळवळीत काम करणा-या रंगकर्मीसमोर आहे.


आत्मविश्वासाचं बळ
एकांकिका सादर करून हमखास बक्षीस मिळवणा-या एकांकिकाही याच कालावधीत सादर झाल्यात. ‘पार्टनर्स’ ही एकांकिका त्यावेळेस गाजली. होस्टेलवर राहणा-या तीन मुलींच्या आयुष्यावर बेतलेली ही एकांकिका वेगवेगळ्या स्पर्धेत हमखास बक्षीस कमावत होती. ‘घोटभर पाणी’, ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘एका प्रेमभंगाचा अभंग’, ‘गहाण’, ‘देता आधार की करू अंधार’, ‘सूर्यास्ता जरा थांब!’ अशा एक-दोन नव्हे असंख्य एकांकिका प्रचंड गाजल्या. ‘देता आधार..’मधूनच मकरंद अनासपुरे हा नट मराठी रंगभूमीला मिळाला. आज रंगभूमीवर आणि चित्रपटात काम करणारे असे असंख्य कलावंत एकांकिकेतून मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटसृष्टीत स्थिरावले आहेत. कुणी आकाशवाणी, दूरदर्शन, अलीकडल्या काळात एफएमसाठी मोठया पदावर काम करत आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सुरुवातीच्या काळात एकांकिकांच्या सादरीकरणातून, अभिनयातून मिळालेल्या आत्मविश्वासाचं बळ मोलाचं संचित ठरलं आहे.
या एकांकिका स्पर्धाच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंतांची ओळख एकमेकांना होत होती. त्यांच्यातील मैत्री वाढत होती. नवनवे कलावंत यातून रंगभूमीवर येत होते. त्यानंतर हेच कलावंत राज्य नाटय स्पर्धा, कामगार नाटय स्पर्धेत मोठं नाटक बसवत होते. ही एकांकिकांची रंगचळवळ कमी झाल्याने नवे कलावंत हे वेगवेगळ्या नाटयशिबिरांतून, कार्यशाळांतूनच मिळायला लागले. ग्रामीण भागातील कलावंतांचा येण्याचा मार्ग एकांकिका स्पर्धा होत नसल्याने जवळजवळ बंद झाला, हे शल्य मराठी रंगभूमीला बोचणारं आहे.


..आणि हौस फिटली!
या स्पर्धेचं आयोजन करणा-या बहुतांश संस्था या हौशी होत्या. आयोजनासाठी लागणारा पैसा जमवणं ही तारेवरची कसरत असायची. तो निधी जमवताना नाकीनऊ यायला लागलं. बहुतांश याच कारणानं आयोजकांनी हात टेकले आणि हळूहळू या स्पर्धा घेण्याची हौस फिटली. या स्पर्धा घेण्यासाठी उत्साह आता उरला नाही. शाळेतील स्नेहसंमेलनात अभिनय स्पर्धा होत नाहीत. कॉलेजमध्येही ते वातावरण उरलं नाही. वाहिन्यांवरील मालिकांच्या आकर्षणामुळे नाटकाविषयी एकूणच नैराश्याचं वातावरण असताना एकांकिका स्पर्धाचं पुनरुज्जीवन करून, ग्रामीण कलावंतांसोबतची रंगमैत्री अधिक घट्ट करण्याचं आव्हान आम्ही रंगकर्मीनी स्वीकारलं पाहिजे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version