Home देश एका पावसाने मोदींचा दावा गेला वाहून

एका पावसाने मोदींचा दावा गेला वाहून

1

गुजरातमध्ये येत्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच तेथील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सुरत शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई – विकासाचे गोडवे गाणा-या गुजरातमध्ये येत्या ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच तेथील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सुरत शहर आणि परिसरात आधीच पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासकामांचा उदो उदो सुरू असताना प्रत्यक्ष गुजरातमधील जनता मात्र मुसळधार पाऊस बरसण्यापूर्वीच उकई धरणातून लाखो क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळे ‘पाण्यात’ गेली आहे.

दक्षिण गुजरातला अहमदाबाद प्रादेशिक हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून दोन दिवसांत पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळेल, अशी दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुजरातमधील उकई धरणातून सुमारे ५ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे सुरतमधील बहुतांश भाग आत्ताच पाण्याखाली गेला आहे.

सुरतमधील अडाजन भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून अतिवृष्टीमुळे सुरत शहरच पाण्याखाली जायची भीती आहे. या भागातील फ्लाय ओव्हर्सवर लोकांनी आपल्या गाडय़ा आणून ठेवल्यामुळे रहदारीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक प्रशासन अतिवृष्टीपूर्वीच धरणातील पाण्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यास अपयशी ठरल्याचे चित्र आहे. गुजरातेत अपरिहार्य सायक्लोनिक सक्र्युलेशन सक्रिय झाले आहे. हा पट्टा अरबी समुद्रातील बाष्पाच्या संपर्कात आल्याने सक्रिय झाला आहे.

परिणामी हा पट्टा सक्रिय असलेल्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात. हा पट्टा दक्षिण गुजरात राज्यात मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला असून त्यामुळे गुजरातेत पूरजन्य परिस्थिती ओढवण्याची भिती अहमदाबाद हवामान खात्याचे संचालक जयंता सरकार यांनी सांगितले.

त्यामुळे दक्षिण गुजरातला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातपाठोपाठ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गुजरातसह महाराष्ट्रात डहाणू, ठाणे आणि दिव-दमण, नगरहवेली या ठिकाणीही ४८ तासांत मुसळधार पावसाच्या सरी बरसतील असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रदेखील खवळलेला राहणार आहे.

गुजरातनजीकच्या समुद्रकिनारपट्टीवर ताशी पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई किनारपट्टीजवळील वा-यांचा वेग हा ४० ते ४५ वेगाहून अधिक ५५ किलोमीटर वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version