Home मध्यंतर भन्नाट एक अनोखी नर्मदा परिक्रमा !

एक अनोखी नर्मदा परिक्रमा !

7

डोंबिवलीत राहणा-या हितेश सातवणे या इंजिनीअर युवकाने नर्मदा परिक्रमा ‘मडोन – ५२’ या सायकलने पूर्ण केली. त्याच्या सायकल जर्नीचा हा वृत्तांत.

छंद! मनुष्य प्राण्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक. या छंदापायी ‘छांदिष्ट’ काय काय खेळ खेळील, याचा काहीच नेम नाही बुवा! ‘हितेश शंकर सातवणे’ असाच एक अवलिया छांदिष्ट. जेमतेम पंचविशीतला. पेशाने आय. टी. इंजिनीअर. राहायला डोंबिवलीला. तर नोकरीला पुण्यातील ‘आय. बी. एम.’ कंपनीत. पुणे-डोंबिवली अशी तारेवरची कसरत करता-करताच त्याने सायकलिंगचा अनोखा छंद जोपासलाय आणि मोठया हिमतीने पूर्णत्वास नेलाय.

गेल्या मौसमात आठवडयाभरात सुमारे हजारेक किमी सायकलची रपेट पूर्ण होताच, यंदा किमान तीन हजार किमीच्या सायकल सफरीचा टप्पा गाठण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय हितेशनं तेव्हाच घेतला. त्यावर कडी म्हणून ही सफर गेल्या सफरीप्रमाणे एकटयानेच करण्याची जिद्दही बाळगली; कारण अशा अवघड सफरीत साथ देण्यासाठी तसाच जिद्दी जोडीदार लाभणं जरा दूरच!

लक्ष्य कुठलं ठरवायचं? याच्या शोधात असतानाच आमच्याच संस्थेच्या (म्हणजे गिरिविराज हायकर्स) अमोल पाटीलशी गप्पांच्या ओघात नर्मदा परिक्रमेचा विषय निघाला. नर्मदेची अनोखी सफर करण्याची कल्पना हितेशला भलतीच भावली. इंटरनेट आणि मित्रांच्या मदतीने त्याने संबंधित माहिती जमवण्यास सुरुवातदेखील केली. डोंबिवलीहून निघण्यापासून परतण्यापर्यंतचा मार्ग आखला गेला. त्यामधले टप्पे, विश्रांतीच्या जागा आधीच ठरवल्या गेल्या. प्रवासातलं आवश्यक सामान, कमीत कमी, लाभदायक आणि सुयोग्य असेल, असंच निवडलं. हलके आणि आरामदायी कपडे, वजनात कमी पण सकस अन्नपदार्थाची यादी तयार झाली.

बरेसचे प्रयत्न करूनही चांगल्या प्रतीच्या सायकलची सोय मात्र काही केल्या होईना. अखेरीस हेमंत जाधव आणि अभिषेक मदतीस धावून आले. त्यांनी स्वत:कडील ‘मडोन – ५२’ कंपनीची उच्च प्रतीची सायकल हितेशला विना-मोबदला वापरण्यास दिली. मोहिमेसाठी अत्यावश्यक सायकल आणि ऑफिसमधून अत्यावश्यक रजा यांचा गुंता झटपट सुटला. पाच जानेवारी २०१३ च्या भल्या पहाटे त्याने आई-बाबा आणि मित्रपरिवारांच्या साक्षीने अंधारातच डोंबिवलीचा निरोप घेतला. मग पुढे सुरुवात झाली एका महत्त्वाकांक्षी सायकल सफरीला.

पहिल्याच दिवशी नाशिकपर्यंतचा टप्पा गाठायची अपेक्षा ठेवून तो निघाला; पण सफरीची त्याची साथीदार सायकल कमालीची सक्षम आणि तेजतर्रार निघाली. कसारा-इगतपुरी- नाशिक-ओझर असे मैलांचे दगड गाठत संध्याकाळी दिवे लागणीस तो पिंपळगावात पोहोचला. अनपेक्षितपणे चक्क १८० किमी अंतर अगदी आरामात कापल्याने तो भलताच सुखावला. याचं सारं श्रेय मात्र त्याने आपल्या अनोख्या सायकललाच दिलं. गावातील एका सद्गृहस्थानं त्याच्या जेवणा-खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था खुशीने केली.

दुस-या दिवशी उजाडायच्या आत त्याने पुन्हा एकदा सायकलवर मांड ठोकून पुढचा प्रवास सुरूही केला. पहाटे लवकर निघून दुपारचं कडक ऊन लागण्याआधी चांगल्याशा हॉटेल/ खानावळीत दुपारचं जेवणं केलं. दुपारचा विश्राम, पुन्हा संध्याकाळी हलका नाश्ता करून प्रवासास सुरुवात, एकदम भरपेट न खाता थोडं थोडं खाणं व बाटलीबंद पाणी कटाक्षानं पिणं, असा दंडकच त्याने स्वत:स घालून घेतला; तोही मोहीम पूर्ण होईपर्यंत! कारण यादरम्यान आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणाने प्रवास खंडित होऊ न देणं महत्त्वाचं होतं. आजही कालच्याप्रमाणेच धडाकेबाज सुरुवात करून चांदवड-मालेगाव-धुळे असे टप्पे गाठत एरंडोल गावातील (१९१ किमी) साईबाबा मंदिरात रात्रीचा मुक्काम ठोकला.

तिस-या दिवशी (सात जानेवारी) सकाळी लवकरच प्रवास सुरू करून त्याने जळगाव गाठलं. त्या प्रवासात त्याला वाटेत पायीच प्रवास करीत शेगावला जाणारे बरेच यात्रेकरू भेटले. संध्याकाळी त्याने चांदीसाठी प्रसिद्ध असलेलं खोमगाव गाठलं; पण अजून उजेड असल्यामुळे त्याहीपुढे जाऊन ‘टेंभरूण’ नामक गावात पोहोचून मुक्काम ठोकायचा निर्णय घेतला. गावात राहण्यासाठी मंदिर अथवा धर्मशाळा सापडेना. ‘काय करायचं, या संभ्रमात असतानाच नर्मदा मैय्याच्या कृपेने एक सद्गृहस्थ मदतीस धावून आले. त्यांनी स्वत:च्या घरी हितेशची सोय केली.

अपेक्षेपेक्षा सरस सायकल लाभल्यामुळे हितेशने आखलेल्या वेळापत्रकात थोडासा फरक पडू लागला होता; पण मोहीम एक-दोन दिवस अगोदरच संपण्याची चिन्हं दिसत होती. त्यामुळे त्याच्या रात्रीच्या मुक्कामांच्या ठिकाणांमध्ये थोडा-थोडा फरक होत होता; पण हा फरक त्याच्यादृष्टीने फायदेशीरच होता. डोंबिवली-नाशिक-अकोला-नागपूर- रायपूर-अमर कंटक-जबलपूर-भोपाळ- इंदोर-ओमकारेश्वर-अंकलेश्वर-वसई-ठाणे-डोंबिवली, असा एकूण ३१०० किमीचा प्रवास त्याने रेखाटला होता. चौथ्या दिवशी दिवस मावळेपर्यंत त्याने अमरावती गाठली.

पाचव्या दिवशी अमरावती सोडली आणि नागपूरच्या दिशेने कूच केलं. एकशे सहासष्ठ किमी अंतर पार करून नागपुरात प्रवेश करताच इथेही नातेवाइकांनी त्याला घेरलं. नातेवाइकांचा पाहुणचार घेत सहाव्या दिवशी पहाटे त्याने नागपूर सोडून छत्तीसगड गाठलं. इथे काही सोय न झाल्याने एका धाब्यावरच रात्र काढली. पुन्हा सकाळी कालच्यासारखीच सुरुवात करून १३५ किमीची रपेट करीत तो रायपूरमध्ये पोहोचला. आठव्या दिवशी ‘कोटा’ गाठून तेथील धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम ठोकला.

नववा दिवस उजाडला. त्या दिवशी त्याला कोणत्याही परिस्थितीत अमरकंटक गाठायचंच होतं. ही जिद्द मनात बाळगून त्याने प्रवास सुरू केला. पण मार्गात चार-पाच घाट असलेला हा आजवरचा सर्वात कठीण मार्ग होता. या प्रवासादरम्यान त्याला जरा जास्तच एकटेपणा जाणवू लागला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हा एकांडा शिलेदार मोठया धर्याने एकेक घाट पार करत होता. गिर्यारोहण करताना घेतलेली मेहनत, शिकवण, एकेक अनुभव त्याला कामी येत होते. अमरकंटक गाठताच त्याला हायसं वाटलं. जवळपास मोहिमेचा अर्धा प्रवास पूर्ण झाला होता. नर्मदा मैय्याच्या सान्निध्यात पोहोचताच त्याचा थकवा दूर झाला होता. रात्री आश्रमातच मुक्काम केला. सकाळ होताच त्याने नर्मदेचं मनोहारी दर्शन घेतलं. एका अनामिक ओढीने तो नर्मदेच्या कुशीत शिरला. थंडगार पाण्याच्या ममतामयी स्पर्शाने तो सुखावून गेला.

दहाव्या दिवशी त्याने नर्मदेच्या परिसरातच विश्रांती करायचं ठरवलं. रोजची नित्यकर्म आणि न्याहरी उरकून तो आश्रमातून बाहेर पडला. नर्मदेच्या पात्राच्या परिसरातील सुप्रसिद्ध असं केशव नारायण मंदिर आणि मन थक्क करणारं कोरीवकाम त्याने पाहिलं. आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या जीवापाड मेहनतीचं एक जिवंत उदाहरणच समोर दिसत होतं. इथून पुढे त्याने नर्मदेच्या पात्रातील उगमस्थानांचंही मनोहारी दर्शन घेतलं. दिवसभराच्या उत्साही वातावरणात सुट्टीचा दहावा दिवस केव्हा संपला हे कळलंदेखील नाही. 

सकाळी पुन्हा एकदा नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन तो पुढच्या प्रवासास निघाला. अकराव्या दिवसाचा टप्पाही परवासारखाच नवव्या दिवसाप्रमाणे अवघड प्रकारात मोडणारा होता. सायकलिंग करताना विरुद्ध दिशेने वारा असल्यामुळे सारखं मागे-मागे रेटायला होत होतं. त्यामुळे त्या मार्गातले शाडोल-पाली-एरिया असे अवघड टप्पे गाठतानाच अंधार पडला. त्यामुळे शेवटी सुमारे तेरा किमी अंतर मिट्ट काळोखात कापत त्याने ‘सागराम’ आश्रम गाठला.

बाराव्या दिवशी १४० किमी प्रवास करून जबलपूरमध्ये पोहोचताच त्याचे काका धर्मेद्र साठवणे यांनी त्याचं हार्दिक स्वागत केलं. पुन्हा एकदा घरगुती पाहुणचार झाल्यानं हितेशची बॅटरी पूर्ण चार्ज झाली. सकाळी लवकरच सुरुवात करून त्याने दहा वाजता ‘बेडाघाट’ गाठला. येथील ‘धुवांधारच’ नयनरम्य दर्शन घेऊन तो पुढे निघाला. तो ‘होशंगाबाद’मार्गे ‘तेंडुखेडा’ येथे पोहोचला. रात्री एका देवळात त्यानं मुक्काम केला.

चौदाव्या दिवशीही सुमारे २०० किमी सायकलिंग करून त्याला भोपाळ गाठायचं होतं; पण वाटेत बरालीचा आव्हानात्मक घाट आणि घनदाट जंगलातून गेलेला रस्ता भर दिवासाही एखादं हिंस्र श्वापद तुमच्या समोरच उभं ठाकण्याचा धोका आणि त्यात भर म्हणून वा-याच्या विरोधात सायकलिंग या सर्वाचा चिकाटीनं सामना करीत रात्री नऊ वाजता त्याने नियोजित भोपाळ गाठलं. त्याची बहीण आरती इथे त्याच्या स्वागतास हजरच होती. एकूण मोहिमेतील सर्वात अवघड टप्पा आज पूर्ण झाल्याच्या समाधानात बहिणीच्या पाहुणचाराची भर! अगदी सोने पे सुहागाच! उद्या मोहिमेतील सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळी घाई करायची गरज नव्हती.

सोळाव्या दिवशी त्याने भोपाळ सोडलं. दिवसभर सायकल दामटवत संध्याकाळी पावणेसातला देवास गाठलं. तिथल्या धर्मशाळेत रात्रीच्या मुक्कामात प्रसिद्ध आणि रुचकर ‘दाल-बाफले’ त्याने खाल्ले. त्या आनोख्या खाद्यपदार्थाने त्याचा जीव अगदी सुखावला गेला. नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर निघून इंदोरमधील ‘फायर फॉक्स बायकिंग स्टेशन’ गाठलं. मुंबईनंतर त्याच्या खास सायकलचं एकमेव सव्‍‌र्हिस स्टेशन ते होतं. त्या सायकल स्टेशनमध्ये सायकलची आवश्यक ती दुरुस्ती करून दुपारी एक वाजता त्याने इंदोर सोडलं. सायंकाळी सात वाजता ‘सीव्हरकूट’ इथल्या जैन मंदिरात त्याने मुक्काम केला.

सकाळी कावेरी नदीतलं स्नान उरकून ओमकारेश्वराचं दर्शन घेतलं. सीव्हर कूट सोडलं ते दुपारी ‘बारवाह’ येथे प्रवेश. माता अहिल्या घाट पाहून झाल्यावर सुप्रसिद्ध महेश्वर मंदिरातलं कोरीव काम पाहताना उगीचच मन भरून आलं. थोडा वेळ आराम करून मग अंकलेश्वरच्या दिशेने कूच करीत रात्री ‘मनवार’मध्ये प्रवेश केला. सकाळी साडेसातला ‘मनवार’ सोडलं दिवसभर सायकलिंग करीत सायंकाळी छोटा उदयपूर गाठून तेथील जैन धर्मशाळेत मुक्काम केला. जेवणा-खाण्याची इथे छानच व्यवस्था झाली.

विसाव्या दिवशी सकाळीच निघून सायंकाळी अंकलेश्वर इथे प्रवेश केला. एकविसाव्या दिवशी सुमारे २८० किलोमीटर अंतर सायकलीने कापून त्याने वसई गाठायचा चंग मनाशी बांधला; कारण दुस-या दिवशी असणा-या २६ जानेवारी २०१३ च्या मुहूर्तावर डोंबिवलीत प्रवेश करून मोहिमेची सांगता करायचे वेध लागले होते; मात्र २५ जानेवारीचा टप्पा खूपच मोठा होता. दिवसभर सुसाट सायकलिंग सुरू होतं. जणूकाही वा-याशी प्रतिस्पर्धाच! एखादा गाडीवालासुद्धा एवढा मोठा टप्पा गाठून मरगळून जाईल; पण इथे तर हितेशने कमाल केली. सुमारे २८० किमी सायकल चालवूनही अगदी उत्साहात त्याने वसई गाठली. ही खूशखबर दूरवर ट्रेकिंगसाठी गेलेल्या आम्हा सर्वाना फोनवरून कळवताच त्याच्या आजच्या पराक्रमाने आम्हालाही अभिमानाने एकदम स्फुरण चढलं. उद्या त्याच्या स्वागतास स्वत: जातीनं हजर राहू न शकल्याचं लक्षात येताच सर्वाचीच मनं हिरमुसली.

दिवस बावीसावा, सकाळीच त्याने वसई सोडली.. घोडबंदर रोडमार्गे ठाणे गाठलं. ‘गिरिविराज’चे राधेश तोरणेकर आणि अनिकेत साळुंखे यांनी त्याचं ठाण्यात स्वागत केलं. स्वत: सायकली घेऊन तेही हितेशसोबत डोंबिवलीच्या दिशेने निघाले. सकाळी ठीक अकरा वाजता रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने हितेशचं शाही थाटात आगत-स्वागत झालं. तीन हजारएकशे किलोमीटरची महत्त्वाकांक्षी एकांडी सायकल मोहीम सफल झाली.

जिद्दी, ध्येयवादी सवंगडया, हितेश तुला गिरिविराजचा त्रिवार मानाचा मुजरा!

7 COMMENTS

  1. aabhinandan…. barobar 1 varshyani vachti ahe.tumchya jidila kharch salam ahe.vachtana asa vatet hota ki me pan narmada parikrama karti ahe.n bara vatla khup ki ajun pn tumchya sarkhe lok ahe ki jya mule apli sanskruti tikun ahe,parat ekda aabhinandan

  2. Manapasun abhinandan. man koutukane bharun ale tumchya. maze age 56 ahe ani me service karte ahe. mala pan parikrma karnyachi khup icha ahe. tumchykade prerna milali ahech. pahu narmada kenvha ghadavate darshan. punha ekda abhinandan. khup ushira vachali post.

  3. नमस्कार
    आपला उपक्रम स्तुत्त्य आहे पण
    ५ जानेवारी ते २६ जानेवारी म्हणजे १५-२० दिवसात सायकलने परिक्रमा संपूर्ण ३५०० किमी होणे शक्य वाटत नाही
    मी चार महिन्यापूर्वी परिक्रमा करून आलो ( साधारण अर्धी पायी आणि अर्धी बस टेम्पो रेल्वे आदी साधने वापरून
    आणि दक्षिण तटावरून उत्तर तटावर पोचणे हा साडेचार ते पाच तसच बोटीने प्रवास करावा लागतो .
    मला दक्षिण तटावर कठपोर इथे नाशिकचे दोन परिक्रमावासी भेटले जे दुचाकीवर (मोटार सायकलने )
    परिक्रमा करत होते , कार आणि मोटार सायकलनेहि १८ दिवस लागतात तेव्हा आपली इतक्या कमी दिवसात
    संपूर्ण परिक्रमा सायकलने कशी झाली ? आपण म्हटले आहे कि होशंगाबादहून भोपाळ (नदी ओलांडून पलीकडे आहे ) गाठले म्हणजे आपण गुजरात मध्ये कठपोर (दक्षिण तटावरील शेवटचे गाव ) इथे गेलात नाही का ?
    कारण होशंगाबाद दक्षिण तटावर आहे आणि भोपाळ उत्तर तटावर आहे म्हणजे आपण नदी ओलांडून पुलावरून
    पलीकडे गेलात का ? परिक्रमेत नदी ओलांडायची नाही / नसते , म्हणून तर ती नदीची परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा म्हणतात . असो आपण नर्मदा किनारी गेलात हे उत्तम फक्त कोणाचा गैर समाज होऊ नये म्हणून हि प्रश उत्तरे
    बाकी परिक्रमावासी म्हणतातच जशी मैयाची इच्छा तशी प्रत्येकाला बुद्धी होते तिथे जायची , जशी तिची इच्छा असेल तशी परिक्रमा होते , माझ्या परिक्रमेतील दोन दिवसांचे वर्णनच आपल्या पूर्ण परीक्रमाच्या वर्णना इतके आहे , ते खाली वाचाक्न्साठी देत आहे .
    धन्यवाद – सुरेश पित्रे , ठाणे
    $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
    नमस्कार
    नर्मदा परिक्रमेवर आधारित लेख पाठविला आहे , तो छापणार असाल तर कृपया
    मला तसे इमेलने कळविलेत तर बरे होईल , तसे म्हटले तर गेल्याच वर्षी अनुपमा
    देवधर ह्यांचा ” नर्मदे हर ” हा लेख लोकसत्तात छापुन आला होता , पण त्या आणि ह्या लेखात फरक हा आहे कि त्यांनी पूर्ण पायी परिक्रमा केली होती आणि इथे जे मी वर्णन दिले आहे ते अर्धे पायी आणि अर्धे अंतर बस, रेल्वेने असे आहे , तेव्हा अशीही अडीच महिन्यात ज्यांना नर्मदा परिक्रमा करायची आहे त्यांना हा लेख उपयुक्त ठरेल. माझे बरेच साहित्त्य
    कविता , लेख अनेक मासिकातुन , वृत्तपत्रातुन प्रकाशित झाले आहे , तसा मी काही professional साहित्तिक नाही पण काही अनुभव असल्यामुळे वेगळ्या शब्दांकनाची गरज नाही असे वाटते , तरी गरज वाटली तर तसे शब्दांकन / संपादन करून घ्यावे हि विनंती.
    धन्यवाद – सुरेश पित्रे, चेंदणी, ठाणे (प)

    नर्मदा परिक्रमा २०१४ – नर्मदे S हर ! हर हर नर्मदे !
    ठाण्याच्या अनुपमा देवधर ह्यांचा लोकसत्ता मधे छापुन आलेला ”नर्मदे हर हर” हा लेख वाचनात आला , आणि ठाण्याचेच श्री दिनकर जोशी (नर्मदा प्रसाद) ह्यांचे नर्मदा परीक्रमेचे पुस्तक हेही वाचले होते , हे वाचन झाल्यावर मलाही नर्मदा परिक्रमा करावी असे वाटू लागले . पण असे म्हणतात नर्मदा नदीचे बोलावणे आल्याशिवाय आपण तिथे जात नाही , अनुपमा देवधर आणि दिनकर जोशी दोघांनाही भेटून काय तयारी करायची , कसे जायचे ह्याची माहिती घेतली. अनुपमा ताई म्हणाल्या कि दसरा मुहुर्त चांगला आहे , तेव्हा लगेच निघा , मधे फक्त आठच दिवस होते , पण हो, नाही असा विचार करता करता जायचा विचार बारगळला , वर म्हटल्याप्रमाणे बोलावणे आले नव्हते असे म्हणायचे . मग अचानक मार्च महिन्यात पुन्हा अनुपमा देवधर आणि दिनकर जोशी ह्यांना भेटलो आणि त्यांना माझा जायचा विचार कळविला , मनात परिक्रमेला जायची इतकी ओढ निर्माण झाली कि बस ! आता निघायचेच, ते म्हणाले तुम्हाला आता फक्त तीन महिने वेळ आहे , म्हणजे थोडी घाईच होईल , कारण अक्षय तृतिया किंवा त्याआधी आठ दिवस समुद्रामधे नावा जायच्या बंद होतात . पण काही हरकत नाही, बरेच जण १०० ते १२० दिवसात ही परिक्रमा पूर्ण करतात तुमच्याकडे ९० दिवस आहेत . आपण काही ठरवायचे नाही , मैयावर सोडायचे कि तूच तुझ्या परीने परिक्रमा पूर्ण करून घे. पण नियमाप्रमाणे केले तर परिक्रमेचा काळ ” तीन वर्ष , तीन महिने , तेरा दिवस” असा आहे. २० मार्चला दादर – अमृतसर रेल्वे गाडीचे खांडवा स्थानकाचे तात्काळ मधे आरक्षित तिकीट मिळणार ह्याची खात्री झाल्यावर मग तयारीला लागलो , खरे म्हणजे अगदी आवश्यक सामानाशिवाय तसे काही न्यावे लागत नाही असे जाऊन आलेले सगळे परिक्रमावासी सांगत होते , पण तरीही आपला पहिलाच अनुभव असल्यामुळे काही सामान मी माझ्या कल्पनेप्रमाणे घेतले , जे जरा जास्तच झाले मग ते गुरुजींकडे काढुन ठेवावे लागले , तेव्हा आवश्यक सामानच घ्यावे हे आता जाऊन आल्यावर मीही सांगतो आहे, २० तारखेला रात्री गाडीत बसुन २१ तारखेला सकाळी खांडव्याला उतरलो , तिथुन बसने ओमकारेश्वर रोड स्थानक गाठले ( खांडवा ते ओमकारेश्वर रोड स्थानक अशी छोटी रेल्वेही जाते ) ओमकारेश्वर रोड (मोरटक्का ) इथून ओमकारेश्वर मंदिर / पायऱ्यांचा घाट १२ कि.मी. आहे ते छोट्या टक टक ने (रिक्षाने) गेलो , तिथे श्री संत गजानन महाराज आश्रमात मुक्काम केला , २२ तारखेला पहाटे पाचलाच गोमुखावर स्नान करून पुढच्या अडीच महिन्याच्या पायी प्रवासाची एक झलक असे म्हणता येईल अशी नर्मदा नदीच्या उत्तर तटावर मांधाता पर्वताची अंदाजे दोन तासाची छोटी परिक्रमा पूर्ण केली , वाटेत कावेरी – नर्मदा संगम आहे. पुन्हा पुलावरून दक्षिण तटावर आलो आणि गोमुख घाटावर मुंडण आणि नंतर परिक्रमेचा संकल्प पुजन झाले. संकल्प असाच सोडायचा कि नर्मदा देवी जशी तुझी इच्छा असेल तशी माझ्याकडुन परिक्रमा पूर्ण करून घे , कारण तुम्ही असा काही विशेष संकल्प केला कि मी अनवाणी व किनारा पकडूनच परिक्रमा करीन वगैरे तर त्याचाही एक अहं आपल्यात येतो जो परिक्रमेला पोषक नाही. तसे वय वर्ष १० ते ८८ वयाच्या अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमा केल्याचे उल्लेख आढळतात.

    नर्मदे हर ! हर हर नर्मदे ! असे म्हणुन परिक्रमेला चालायला सुरुवात केली , सोबत ”नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका” हे पुस्तक होते. ( परिक्रमेच्या वाटेत उत्तर तटावर तिलकवाडा इथल्या महाराजांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे , तिकडे पोचल्यावर हे पुस्तक सर्व परीक्रमावासियाना दिले जाते ) त्याप्रमाणे एक एक गाव पार करत आमची परिक्रमेला सुरुवात झाली ,
    पूर्वी परीक्रमेचे एकूण अंतर २६०० कि.मी. होते पण आता ते धरणांमुळे अंदाजे ३५०० कि.मी. इतके वाढले आहे . रोज साधारण १५-१७ कि.मी. चालत असे अंदाजे १२०० कि.मी. पायी आणि उरलेले २३०० किमी रिक्षा, बस, रेल्वे आदी साधने वापरून हि परिक्रमा माझ्याकडुन अडीच महिन्यात नर्मदा मैयाने पूर्ण करून घेतली. त्यातील दोन दिवसाचे वर्णन / अनुभव मी इथे देत आहे. पुढच्या वेळी संपूर्ण परिक्रमा पायीच करण्याची इच्छा आहे.

    २ एप्रिल २०१४ –
    सकाळी हरीधाम ( गोरागाव ) सोडले , वाटेत २ कि.मी. वसंतपुरा (आनंद आश्रय )
    हा आश्रम लागला पुढे ३ किमी इंद्रवरणा , पुढे ३ कि.मी. नानी रावल (वैद्यनाथ व्यासेश्वर ) हि दर्शने घेतली. वाटेत गाय,बैल,सरडा , साप ,मुंगुस, कुत्रा, मांजर, माणसे, झाडे, जो भेटेल त्याला ”नर्मदे हर” म्हणायचे. वैद्यनाथ व्यासेश्वर ह्या मंदिरात मी म्हटले ”नर्मदे हर बाबा ” तसे
    ते म्हणाले मी सदावर्त देतो पण तुम्हाला पुढे फुलबाडीला तयार जेवण मिळेल, तुम्ही तिथे जाता तर पहा , मी म्हटले ठीक आहे, आह्मी पुढे निघालो पण पुढची ४ कि.मी. वाट कठीण असल्यामुळे आह्माला पोचायला उशीर झाला , इथेही एक जटाधारी साधु होते मी जवळ जाऊन म्हटले ”नर्मदे हर बाबा” तसे ते म्हणाले मी तयार जेवण रोज देतो पण तुम्हाला आता जरा उशीर झाला मंदिराची जेवणाची वेळ टळून गेली, साडे बारा वाजले आहेत , आता मी सदावर्त देतो , त्यांनी पीठ, डाळ आदी सामान दिले, मी कणिक भिजवून पोळ्या लाटल्या , चुलीवर स्वयंपाक, बरोबरचे सत्तरी ओलांडलेले आजी आजोबा ह्यांना टिक्कडची सवय म्हणून टिक्कड सारख्या जाड पोळ्या लाटल्या त्या चांगल्या फुगल्या आणि माझ्यासाठी मी पातळ पोळ्या लाटल्या तर त्या कडक झाल्या , डाळ शिजवुन डाळ आणि ते जाड जुड टिक्कड असे जेवण ,
    आटपले . एका झाडाखाली थोडा आराम केला आणि साडेचारला फुलबाडी सोडले , वाटेत एकाने सांगितले कि आता पुढे रामपरा गाव आहे तिथे
    जायला तुम्ही किनाऱ्याची वाट पकडा , वरून गेलात तर टेकड्या डोंगर भुल भुलैया होईल काटेरी झाडे आहेत वाट चुकू शकता , काही काटेरी झाडांना काटे किती मोठे असतील तर हाताच्या बोटा एवढे लांब , इतके मोठे काटे मी आयुष्यात प्रथम पाहिले , झाडांचेही तसेच कडुनिंब, पिंपळ , वड आदी मोठे वृक्ष चारशे पाचशे वर्ष जुने असावेत , आह्मी किनाऱ्याची वाट धरली किनाऱ्यावरहि सुरुवातीला काटेरी झाडे बरीच होती , त्या नंतर ३ कि.मी. रस्ता अगदी किनाऱ्यावर उताराचा आणि तो कसा तर संपूर्ण रस्ताभर ६-९ इंचाचे नुसते मोठे दगडच दगड , त्या दगडांवर पाय ठेवत ठेवत चालायचे डाव्या हाताला जिथून हे दगड निखळलेत तो डोंगर आणि उजवीकडे ६-७ फुटावर खोल नर्मदा नदी , आपण जोरात चाललो तर हे दगड घरंगळून खाली नदीत पडतात , म्हणजे आपला पाय निसटला तर आपली गत त्या दगडासारखी होणार , इथे नदी खोल आहे हे त्या माणसाने सांगितले होते , पण काळजी पूर्वक चालले तर हा रस्ता त्या भूल भुलैया पेक्षा सोपा वाटतो , आह्मी अगदी डोळ्यात तेल घालुन खाली पाहुन चालायला लागलो , अशा वेळी तरुण माणसाला सुद्धा काठी का लागते ते कळते , मग पुढे अनडवाहि उपनदी आडवी नर्मदा नदीला जाऊन मिळते , तिथे काही कामगार होते त्यांनी लांबुनच हाक देऊन सांगितले कि तुमच्यासमोर ह्या नदीचे पात्र माने पर्यंत खोल आहे तुम्ही जरा मागे चालत जा म्हणजे ती ओलांडताना तुम्हाला कमी पाण्यातुन यावे लागेल , ते कामगार आमच्या दिशेने इकडे येत होते त्याच वाटेने आह्माला पुढे तिकडे रामपराचा घाट गाठायचा होता , तरी गुडघाभर पाण्यातुन आह्मी अनडवाही नदी पार केली , काठीला आणि मैयाला मनोमन वंदन केले, अगदी रोमांचक अनुभवातुन पार पडलो. पण इथे म्हणतात ” जब जय हो मैयाकी, तब चिंता काहेकी ”. पुढे पुन्हा थोडा किनारा चालत गेल्यावर घाट दिसायला लागला , घाटाजवळ नुकतेच दाहन संस्कार झालेले दिसत होते, चिता जळत होती , बरोबरच्या आजी जरा घाबरल्या होत्या , आधीच मागचा रोमांचक अनुभव आणि आता हि चिता जळताना पाहिली. अंधार पडायला सुरुवात झाली होती , चितेचा धूर सर्वत्र घाटावर पसरत होता
    सुनसान भन्नाट वातावरणाची निर्मिती झाली होती, त्यामुळे संध्याकाळचे स्नान न करताच आह्मी घाट वर चढलो होतो , आणखी जरा एक तास जरी उशीर झाला असता तर त्या खतरनाक उताराच्या दगडी वाटेत आपले काही खरे नव्हते असे मी त्या आजी, आजोबांना म्हटले , तसे ते म्हणाले मैयाची कृपा आणि लक्ष आपल्यावर आहे , आपण बरोबर वेळेत इथे पोचलो. वर गेल्यावर कळले राम मंदिरात सोय नाही , योगानंद आश्रमात / मंदिरात सोय आहे , लाईट पंखे बंद होते , आह्मी खोलीत बसतो ना बसतो तोच तिथे लाईट आले , पंखा चालू झाला पण खोली गरम तापलेली भट्टीच जणू , म्हणून व्यवस्थापकांना विनंती करून समोर एक मजली इमारतीत तळात पडवीवर आसन लावले , आधी मंदिरासमोर आसन लावायचे विचारले पण ते म्हणाले ते वाटेतही येईल आणि इथे अंगणात विंचु फिरतात , म्हणून त्या पडवीत त्यांनी लाईट लावुन दिला , आमचे पूजा पाठ झाले. मंदिरात आरती दर्शन झाले . नंतर आमची नावे मंदिराच्या रजिस्टर मधे लिहुन घेतली , आमच्या ओळख पत्रावर / छोट्या वहीत मंदिराचे सील मारले गेले. रात्री तयार भोजन प्रसादही मिळाला. रात्री उघड्यावर झोपल्यामुळे सकाळी छान थंडावा जाणवत होता , इथे नर्मदा मैया उत्तर वाहिनी आहे.

    ४ एप्रिल २०१४
    कुम्भेश्वरहुन सकाळी साडेसहा वाजता निघालो , कोणतेच देऊळ उघडले नव्हते. आह्मी बाहेरूनच वंदन केले आणि निघालो , सील रात्रीच मारून झाले होते, २ कि.मी. चालून बाहेर मुख्य रस्त्यावर आलो , वाटेत कोठारा गाव लागले , स्वामी नारायण गुरुकुल, पोइचा , नरखडी आदी गावे किनाऱ्याला सोडली , कुम्भेश्वर ते रुंडगाव हे १५ कि.मी. अंतर आहे पण जवळचा कच्चा मातीचा टेकडीवरून दुसरा रस्ता १० कि.मी. चा आहे तो रस्ता गुराख्याने दाखविला होता, वाटेत ताड गोळ्याची अनेक झाडे आहेत, पण झाडावर एकही ताडगोळा दिसत नव्हता मुख्य रस्ता सोडून पुढे आश्रमापर्यंत मातीचा रस्ता आहे , टेकडीवर आश्रम आहे. दोन कुट्या एक बांबुची दुसरी पत्र्याची , कुटीत एक साधू होते , त्यांना आह्मी ”नर्मदे S हर” म्हणून नमस्कार केला , त्यांनी विचारले ”कितने मुर्ती है ? ” आह्मी म्हणालो ”चार मुर्ती है बाबा” ! तिथे हे दोन प्रश्न कुठेही गेलो कि विचारतात ”कौन जिल्हेके” आणि ”कितने मूर्ती है ?” कुटीत सामान ठेवले , त्या साधुंनी थोड्याच वेळात आह्माला भोजन प्रसादासाठी बसा म्हणुन सांगितले साधुंबरोबर सगळ्यांनी जोरात म्हटले ”बोलो अन्न पुर्णा माता कि जय ” नमः पार्वती पते हर हर महादेव ” नर्मदे S हर !” , भोजनाला सुरुवात झाली , तिकडे कशी पद्धत
    आहे कि वाढताना / विचारताना प्रत्येक पदार्थाला ”राम” लावुन उच्चारतात , म्हणजे
    मिठाला ”रामरस” , ”रोटी राम , सब्जी राम ” असे म्हणतात, आणि जेवण झाले आता पुरे असे म्हणायच्या ऐवजी ”महापुरण” असे वेगळेच शब्द वापरतात. आपल्या कडच्या ज्वारीच्या भाकरीच्या दुप्पट जाडीची गव्हाच्या पिठाची जरा कडक पोळी असते त्याला ते टिक्कड म्हणतात , तिकडचे लोकं असे चार पाच टिक्कड सहज खातात त्यांना सवय असते , पण आपल्याला ते काही इतके जात नाहीत , वाटेत परिक्रमेत दोन जण मध्य प्रदेशातील परिक्रमावासी होते आणि अडीच महिने तिथे राहिल्यामुळे तिथल्या भाषेतील काही शब्द कळले झोरा म्हणजे झरा , फडकी म्हणजे फाटक , पिसी म्हणजे गव्हाचे शेत , गेल / पगदंडी म्हणजे पाऊलवाट , ककडी म्हणजे पपई , बिहि म्हणजे पेरु , दिंडोरी भागातल्या तांदुळाला ”कोदु” म्हणतात. तिथे कोणी स्वर्गवासी झाले ह्यासाठी ”शान्त हो गए ” असे म्हटले जाते , सुरुवातीला माझ्याबरोबर एक मराठी परिक्रमावासी होते , ते आणि मी कुठे सावलीत बसुन माठाचे गार पाणी प्यायलो कि आह्मी म्हणायचो आता कस शान्त थंड वाटत आहे, असे म्हटले कि आजुबाजुचे लोक असे विचित्र नजरेने पहायचे , मग एकाने हे आह्माला सांगितले कि ”शान्त हो गए ” म्हणजे स्वर्गवासी झाले . तुम्ही असे पुन्हा पुन्हा शांत, शांत म्हणु नका. आह्माला ऐकायला चांगले नाही वाटत . मग एकदा दुसरे परिक्रमावासी होते त्यांना मी सहज विचारले आपल्या बम्बैया हिंदीत ” बाबाजी कल हम लोग कितने बजे उठेंगे ?” तर त्यांनी कपाळाला हातच लावला आणि गप्पच बसले, मी म्हटले काय झाले ? तेव्हा त्यांनी सांगितल्यावर कळले कि ”उठ गए ” म्हणजे पण ”वारले” ह्या अर्थानेच म्हटले जाते . तेव्हा त्यांनी सांगितले कि असे म्हणा ” बाबाजी कल हम कितने बजे खडे होनेवाले है ?” असो ! तर हे नविन शब्द ज्ञात झाले ,
    जेवणानंतर कुटीत गरम होत असल्यामुळे बाहेर कडु निंबाच्या झाडाखाली सावलीत झोपलो. दुपारी साडेतीनला निघालो , अंदाजे ७०-८० फुट खाली करजण नदी दिसत होती ती पार करायची होती , इथल्या आश्रमातील बाबांनी अगदी सहज सांगितले कि सरळ उतरा आणि रस्ता धरा , पण रस्ता कसला ? आह्मी जेमतेम १०-१५ फुट उतरलो आणि समजलं कि टेकडी उतरायची आहे पण पाऊलवाट इतकी उताराची आहे कि काठी टेकुनही तुम्ही तोल जाऊन सामानासकट खाली घसरुन पडणार ! मग काय आधी सामान चक्क खाली फेकण्यावाचुन दुसरा पर्याय नव्हता , सगळे सामान कमण्डलुसकट खाली सोडले तेसुद्धा दोन टप्प्यात , मग कमण्डलु म्हणजे स्टीलचा कडीचा डबा १० फुटावर मधेच अडकला , नंतर आह्मी एकेक जण खाली बसत बसत टोकेरी काठी टेकत (मातीत घुसवत) खाली उतरलो , एकदम सर्व जण उतरताना एक धोका होता कि वरचा माणूस घसरला तर सर्व जण पडणार म्हणुन एक एकटे उतरलो , मग मी पुन्हा तो बाजुला अडकलेला डबा काढण्यासाठी आजुबाजुच्या छोट्या फांद्या झाडांना धरून वर चढलो आणि डबा काठीने खाली ढकलला , खाली उतरून पाहिले तर चारी बाजुने डोंगर आणि आह्मी दरीत , क्षणभर असे वाटले कि आता कुठे वाटच नाही पण असे कसे होईल ? कुठेतरी वाट असणारच ना ? जिथे आह्मी उतरलो त्या दरीत आणखी एक टेकडी मधे होती ज्याच्या भोवताली वाट होती , आह्मी उजव्या बाजुने चालू लागलो सकाळी भेटलेले गुराखी पुन्हा भेटले. गुराखी म्हणाले आह्मी परीक्रमावासियाना नदी पार करून देण्यासाठीच इथे बसलो आहोत ,त्यांच्या गाई शेळ्या मात्र वर त्या तशाच उतारावर मस्त मजेत चरत होत्या , आह्माला आश्चर्य वाटले, ती जनावरे पडत नाहीत ते पाहिल्यावर निसर्गाचा चमत्कार कसा असतो ते कळले . त्यांना कसे विशिष्ट रचना असलेले पाय दिले आहेत त्यामुळे ती जनावरे पडत नाहीत . मग इथे आह्मी जरा बसलो , हात, पाय, कपडे, सामान सर्वच मातीने माखले होते , गुराखी म्हणाले ”आता करजण नदी ओलांडली कि पुढे रस्ता ठीक आहे , आह्मी हि नदी तुम्हाला ओलांडायला मदत करतो”. दोन गुराखी आले त्यांनी आमचे थोडे सामान स्वतःच्या डोक्यावर घेऊन आमचे हात धरले आणि कमरे इतक्या खोल पाण्यातुन नदी ओलांडायला सर्वाना मदत केली , ( पावसाळ्यानंतर इथेच पाणी मानेपर्यंत असते ) त्यांना मनोमन धन्यवाद दिले आणि नर्मदे S हर ! म्हटले आणि आता पुन्हा नर्मदा नदी किनाऱ्याची काटेरी झुडुपातून जाणारी पाय वाट चालायला सुरुवात झाली , त्याधी करजण नदीतच कमंडलु भरून घेतले होते कारण नर्मदा किनारी पोचणे चिखल दलदलीमुळे शक्य नव्हते. अगदी किनाऱ्याला खेटूनहि ऊस , भात शेती दिसली कारण ह्याला पाणी जास्त लागते ते किनाऱ्यावर मुबलक उपलब्ध असते. ती शेते सोडून पुन्हा वाट वर गेली पुढे पुढे जाता लक्षात आले कि आह्मी अंदाजे १५० फुट उंचावरून जात आहोत , आणि खाली दीडशे फुटावर मैया वाहत आहे , त्यामुळे तिथून कडेने जाताना काळजी घ्यावी लागते कारण एकदम कडेला गेलात तर पाय घसरून १५० फुट खाली पडणार कारण कडेची माती काहीवेळा धसते. आणि डाव्या हाताला शेतीतून वाटा जातात पण त्या लांबून नीट दिसत नसल्यामुळे निश्चित कुठली वाट कुठे पोचते त्याचा अंदाज येत नाही . म्हणून किनाऱ्याची वाट अशा वेळेस धोक्याची वाटली तरी सोपी वाटते. आणखी ५०-६० फुट वर चढून शुकदेवेश्वर , मार्कंडेश्वर राधा कृष्ण मंदिरात पोचलो . राधाकृष्ण मंदिर नवीन बांधले आहे बाकीची मंदिरे ४०० वर्षे जुनी आहेत , राखाडी अंगाची काळ्या तोंडाची माकडे इथे आहेत .
    मंदिर परिसरात चाफा, बिट्टीची इतकी मोठी झाडे मी पहिल्यांदाच पाहिली , मंदिरा भोवती
    काहीशे फुलांचा खच पडलेला दिसत होता , तिकडच्या लोकांचे परिक्रमा वासियांसाठी अगत्य आणि सेवा पाहुन थक्क व्हायला होते . चाचड पुजाऱ्यांची अकरावी पिढी इथे चालू आहे , आज आरतीच्या वेळी मंदिराची घंटा मला वाजवायला सांगितली गेली, खाली गावातुन चहा , जेवणाची व्यवस्था झाली तेच रजिस्टर मधे नावे नोंदवून घेतात आणि आपल्या ओळख पत्रावर सही शिक्क्का मारतात. रात्री खोलीत गरम होत असल्यामुळे देवळाच्या उघडया सभागृहात आह्माला आसन लावायला सांगितले होते. इथे रात्री मुक्काम.

    खुल्या वातावरणात पक्षी , साप , ससे , सरडे , मोठे कोळी , कोल्हा , मगर , मुंगुस असे प्राणी पहायचा आणि मातीच्या जंगल वाटेत त्यांचे पायाचे ठसे पाहण्याचा योगही मी शहरवासी असल्यामुळे वेगळाच अनुभव देऊन गेला. माझ्या बरोबर एक औषधी वनस्पती जाणणारे होते एका ठिकाणी जंगल वाटेत ते म्हणाले कि सगळ्या झाडांना हात लावु नकोस कारण एक भूलभुलैया नावाची वनस्पती असते , तिला हात लावला तर म्हणे माणूस तिथेच घुटमळत राहतो आता हे कितपत खरे आहे कि हे गमतीत त्यांनी म्हटले होते ते त्या वनस्पती तज्ञांनाच माहित असावे. एक महिना चाललो तेवढ्या काळात शेकटाचे / शेवग्याचे झाड अभावाने एका ठिकाणीच दिसले तेव्हा मी त्यांना म्हटले हे झाड इथे फारसे
    दिसत नाही ना ? , तेव्हा ते म्हणाले मध्य प्रदेशात आह्मी ह्याच्या शेंगा वगैरे काही खात नाही , मी त्यांना म्हटले आम्ही खाण्यासाठी व औषधासाठी ह्याच्या शेंगा, फुले, पाने सर्व वापरतो. तुम्ही पण खाऊन पहा , आणि ह्याची भरपूर झाडे लावा .

    एकूण परिक्रमेचा प्रवास पायी, बस, रेल्वे असा केला तो कोठून कुठ पर्यंत कसा केला
    ते थोडक्यात पुढे दिले आहे.

    नर्मदा नदीच्या दक्षिण तटावरुन सुरुवात – ओमकारेश्वर ते तेली भट्ट्याण – राजघाट पर्यंत पायी , तिथून नूतन शूलपाणी मंदिर (गोरागाव ) पर्यंत बसने – पुन्हा पायी कुंभेश्वर – असा गाव – मणिनागेश्वर ते अगदी गुजरातच्या अरबी समुद्राच्या किनारी टोकाशी कठपोर , विमलेश्वर पर्यंत पायी पोचलो , तिथुन रात्री बारा वाजता छोट्या नावेने पाच तास अरबी समुद्रातुन पार करून पलीकडे उत्तर तटावर मिठीतलाई इथे सकाळी पाच वाजता पोचलो , तिथून पुढे – रेल्वेने दहेज ते भरूच (दोन तास ) – पुन्हा पायी नारेश्वर , कुबेर भंडारी , गरुडेश्वर पर्यंत पायी, इथुन कोटेश्वर पर्यंत बस , पुन्हा पायी चिखलदा , मांडवगड (चढायला सोपा उतरायला अत्त्यंत कठीण ) , महेश्वर, नेमावर , बुधनी पर्यंत पायी , इथुन पेंड्रा पर्यंत रेल्वे – पेंड्रा ते अमर कंटक पर्यंत ऑटोरिक्षा , पुन्हा पायी माई कि बगिया, शोणमुढा – कबीर चबुतरा , दिंडोरी, महाराजपूर , बर्गी धरण – नरसिंहपूर पर्यंत पायी , तिथून होशंगाबाद (नर्मदापूर) – खांडवा – ओमकारेश्वर रोड पर्यंत रेल्वे – इथून पुन्हा पायी शिवकोठी असे करत करत अडीच महिन्याची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आह्मी
    ओमकारेश्वर इथे परत आलो ,
    इथे पुन्हा मुंडण , सांगता पूजन, कन्या भोजन , मांधाता परिक्रमा आदी झाले मैयाचे पुन्हा दर्शन घेतले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. शरीराने मी घरी आलो पण मनाने अजून नर्मदा किनारीच आहे असे वाटते. नर्मदेS हर ! हर हर नर्मदे !

    सुरेश पित्रे.
    पत्ता- ” वैद्य सदन “, पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
    चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. – ४००६०१
    भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९

    • तुमचा अनुभव आवडला मलाही इच्छा आहे पाहू केव्हा मैय्या बोलावते.तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या अनुपमा देवधर माझी मावशी (आईची बालमैत्रीण ) आहे. आमच्या जवळच त्या राहतात. मी अवधुतानंद स्वामी (पूर्वाश्रमीचे श्री. जगन्नाथ कुंटे) यांची नर्मदा परिक्रमेवरील सर्व पुस्तके पन्ह पुन्हा वाचली आहेत एक वेगळाच आनंद मिळतो.आपणही पुस्तक लिहावे आपले लेखन वाचनीय आहे. अनुभव आवडले.

  4. नमस्कार
    नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
    NARMADA PARIKRAMA (PRADAKSHINA) 2014 श्री नर्मदा परिक्रमा (प्रदक्षिणा) २०१४ श्री दत्त अवतार परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी ( श्री महाराजांचे जन्मगाव माणगाव, महाराष्ट्र आणि समाधीस्थळ श्री क्षेत्र गरुडेश्वर, मध्य प्रदेश ) ह्यांचा समाधी शताब्दी महोत्सव श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे वर्षभर चालु होता , समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त माझी अशी इच्छा होती कि श्री महाराजांनी त्यांच्या परीक्रमेच्या वेळी जिथे चातुर्मास केला आणि नर्मदा नदी किनारीच अन्य ठिकाणीही त्यांची काही स्मृति स्थळे आहेत तिथे समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त जावे , ती माझी इच्छा नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने श्री नर्मदा मैयाच्या / देवीच्या आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. – सुरेश पित्रे , ठाणे. , SURESH PITRE,THANE

  5. नमस्कार
    ह्या ध्वनी चित्रफितीहि ऐकण्या / पाहण्यासारख्या आहेत , खाली लिंक देत आहे
    https://www.youtube.com/channel/UC395WrTCA1NJ7qfzcweaAXQ
    इथे चितळे पती पत्नी ह्यांनी केलेल्या परीक्रमेचे वर्णन श्रवणीय झाले आहे,
    https://www.youtube.com/watch?v=EwNjidYYXuQ
    इथे अण्णा महाराज बाविसकर ह्यांचे वर्णन / गोष्ट ऐकायला मिळते तीही श्रवणीय झाली आहे
    महा जालावर जितके वीडीओ आहेत त्यापैकी हेच छान श्रवणीय आहेत
    धन्यवाद – सुरेश पित्रे ,ठाणे

Leave a Reply to suresh pitre Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version