Home मध्यंतर भन्नाट सावधान.. सेल्फीकरांनो!

सावधान.. सेल्फीकरांनो!

0

ट्रेकर्स मंडळींमध्ये सध्या एका फोटोची चर्चा जोरात सुरू आहे. काही जणांनी एका गडाच्या टोकाच्या काठावर बसून काढलेला हा मनात धडकी भरवणारा सेल्फी सोशल मीडियावर सध्या फिरतोय. बहुतेकांनी या सेल्फीवर आक्षेप घेऊन टीका केलीय. त्यातून अनेक विषयांना तोंड फुटलंय. या फोटोच्या निमित्ताने एक अनुभवी ट्रेकर असलेल्या व ट्रेकमेट्स इंडियाचे सह-संस्थापक नीलेश पाटील यांनी त्यांचे विचार या लेखातून मांडले आहेत.

त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला सकाळीच हाक मारली आणि त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक फोटो दाखवला. या फोटोत एका गडाच्या कडय़ावर काही मुलं बसलेली होती व त्यांनी सेल्फीस्टीकने तो फोटो काढला होता. मुलं बसलेली ते ठिकाण धोकादायक होतं त्यामुळे वडिलांच्या चेह-यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह आलं होतं, अर्थातच त्यांच्या चेह-यावर खूप काळजी देखील दाटलेली होती. त्यांनी काही बोलण्याऐवजी त्यांचा चेहराच मला त्यांचा प्रश्न सांगत होता. तरीही त्यांचा पुढला प्रश्न मला ऐकावाच लागला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ट्रेकर्स ट्रेकिंगला गेल्यावर हे अशा पद्धतीने फोटो काढता? असा जीव धोक्यात घालून फोटो काढल्यामुळे काही अपघात किंवा मृत्यू देखील होऊ शकतो हे तुम्हाला कळतं की नाही ?’’ खरं तर माझ्या वडिलांची नोकरी ही पोलीस सेवेतली आणि त्यांचं क्षेत्र हे काही कमी धोकादायक नाही. मी स्वत: गेली १४ वर्ष ट्रेकिंग करतो आहे आणि याच अनुभवांमधून माझ्यातला उत्तम ट्रेकर घडलाय असं म्हणता येईल. परंतु मी चांगला प्रशिक्षित ट्रेकर आहे हे माहीत असूनही त्यांनी काळजी, भीतीपोटी मला हा प्रश्न विचारला होता; आता माझ्या घरी ही परिस्थिती असेल तर इतर नवख्या ट्रेकर्सच्या पालकांच्या पोटात हा फोटो पाहून नक्कीच भीतीचा गोळा उमटला असेल असा विचार माझ्या मनात आला. त्या कडय़ावर बसलेल्या मुलांचा सेल्फी सध्या सर्वत्र सोशल मीडियावर फिरतो आहे, याच अनुषंगाने मला खूप जणांचे फोनही आले आणि ब-याच प्रतिक्रियाही वाचायला मिळाल्या. या सर्वानी मला या विषयावर विचार करायला आणि लिहायला प्रवृत्त केलं. 

ट्रेकिंग म्हणजे फक्त स्वानंद नाही, तर यात अनेक जणांचा सहभाग असल्यामुळे तिथे वर्तनाचं, सुरक्षेचं सामाजिक भानही ठेवणं आवश्यक आहे. त्यात अनेकांची जबाबदारी टीम लिडर घेत असतो कारण ट्रेकिंगमध्ये सामूहिक प्रयत्न असतात. अशात एखादा टीम लिडर बाष्कळ थरार दाखवण्यासाठी अशा प्रकारे कडय़ांच्या टोकावर जाऊन सेल्फी खेचू लागला तर त्यातला धोका जाणवून देण्यासाठी विरोध करणं गरजेचं आहे असं मला वाटलं. आधीच ट्रेकिंगकडे एक जोखमीचा क्रीडाप्रकार म्हणून पाहिलं जातं, डोंगरांचे सुळके निवडक साहित्यानिशी चढणं ही काही सोपी बाब नव्हे. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या मुलांना ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग इ. प्रकार शिकण्यासाठी पाठवताना घाबरलेले असतात. अर्थातच त्यामागे मुलांची काळजीच असते. परंतु असे कडय़ांवर बसून काढलेले सेल्फी पाहून इतर नवख्या लोकांनीही त्याचं अनुकरण केलं आणि त्यातून काही अपघात झाले तर त्याला जबाबदार कोण ठरेल? अशा प्रकारचे प्रश्न पालकांच्या व ट्रेकर्सच्याही मनात आतापासून उमटू लागले आहेत. आता जे असे कडय़ांच्या टोकांवर बसून काढलेले सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहेत ते काढणा-यांचे नेमके विचार काय होते याची कल्पना मला नाही. पण यात धोका आहे हे मात्र निश्चित हे मी सांगू इच्छितो. भले ते फोटो फोटोग्राफीच्या दृष्टीने अत्यंत अप्रतिम असतील, भले त्यासाठी त्यांनी काही विशेष फोटोग्राफी ट्रिक्स वापरल्या असतील, विशिष्ट प्रकारचे कॅमेरा वापरले असतील, काही विशेष तंत्राने हे फोटो काढले असतील, फोटो काढतानाही कदाचित त्यांनी खूप काळजी घेतली असण्याची शक्यता आहे. असंही असू शकतं की या फोटोंना एडिटिंगच्या तंत्राने आता दिसतंय तसं विशिष्ट स्वरूप देण्यात आलं असेल. परंतु या सर्व गोष्टी सोशल मीडियावर ते फोटो पाहणा-यांना सर्वानाच कशा काय समजणार? आज अनेक ट्रेकिंग ग्रुप्स हे नावाजलेले आहेत, त्यांच्यामार्फत हजारो जण ट्रेकिंगला जातात. त्यांच्याकडून अशा प्रकारे सेल्फी किंवा फोटो काढताना आवश्यक काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र जे चार-दोघे मित्रमंडळी ट्रेकिंगला जातात किंवा नवखे ग्रुप ट्रेकिंगला जातात त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात असे सेल्फी खेचताना अपघात होण्याची शक्यता नक्कीच आहे. काहीच दिवसांपूर्वी एका ट्रेकरचा लोहगडावर सेल्फी खेचत असताना तळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जोधपूरच्या मेहरानगढवर सेल्फी खेचणा-या मुलाचा तोल जाऊन यावर्षी मृत्यू झाला. आपल्याकडेही वांद्रय़ाला तीन मुली अशाच सेल्फीच्या नादात समुद्रात पडल्या आणि वाहून गेल्या. गडावर जाऊन सेल्फी काढू नये अशा मताचा मी नाही; परंतु बेसावधपणे, निष्काळजीपणे सेल्फी काढायला गेलात तर अपघात नक्कीच ठरलेला आहे हे लक्षात घ्या.

आता सध्या गडकिल्ल्यांवर टोकांवर उभं राहून, बसून वगैरे काढलेल्या सेल्फींवर खूप प्रमाणात टीका सुरू झालीय. बहुतेकांनी अशा सेल्फींना आक्षेप घेतलाय. फोटोग्राफीसाठी म्हणून गड-किल्ल्यांवर अनवट जागी जाऊन फोटो घेणं ही वेगळी गोष्ट आणि केवळ साहस करायचं म्हणून एखाद्या कठीण जागी जाऊन सेल्फी काढण्याचा थरार व आनंद मिळवणं ही वेगळी गोष्ट. ही पूर्णत: स्वत:च्या जबाबदारीवर केली जावी अशी गोष्ट. पण मुळात अशी जोखीम भरी गोष्ट आपण करावीच का? कारण ट्रेकर्स ग्रुप्सना फॉलो करून त्यांचं अनुकरण करणारे अनेक जण आहेत. अज्ञानी लोकांकडून असं वर्तन होण्याची दाट शक्यता आहे. गडांवर असे सेल्फी किंवा फोटो काढताना अपघात झाल्यास ट्रेकिंग क्षेत्राची नाहक बदनामी होईल. ती टाळता येणार नाही. सेल्फी काढण्यामधून होणारे अपघात टाळण्यासाठी पुढे-मागे सरकारकडून ट्रेकिंग क्षेत्रावर कडक जाचदायक नियमही लादले जाऊ शकतात. ही शक्यताही नाकारता येत नाही. उद्या पालकही त्यांच्या तरुण मुला-मुलींना ट्रेकिंग करायला पाठवण्यासाठी परवानगी देताना हज्जारदा विचार करतील, ज्याचा प्रतिकूल परिणाम या छंदावर व ट्रेकिंगशी संबंधित व्यवसायांवर होऊ शकतो. या सर्व शक्यता भविष्यात वास्तवात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज काही ग्रुप अशा प्रकारे तुम्हाला थरारक सेल्फी गड-किल्ल्यांवर काढून देऊ अशी जाहिरात करून ट्रेकर्सची दिशाभूल करत आहेत. या सर्वाना आम्ही जाणते ट्रेकर्स विनंती करतो की त्यांनी अशा दिशाभूल करणा-या जाहिरातींना बळी पडू नये व धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा वेडेपणा करू नये. ग्रुप असो किंवा एकटे-दुकटे, कधीच असा साहसी प्रकार करू नका. अगदीच करावंसं वाटलं तर त्यावेळी तुमच्यासोबत तज्ज्ञ ट्रेकर्स व तज्ज्ञ फोटोग्राफर्स हे असलेच पाहिजेत. शिवाय स्थानिक माहितगार व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर अधिकच उत्तम.

वास्तविक सेल्फीच्या दुष्परिणामांच्या निमित्ताने राज्य सरकारला एक सुधारणा करता येणं शक्य आहे. आपल्याकडील प्रत्येक गड-किल्ल्यावर पायथ्याशी सरकारी तपासणी चौकी असावी. जिथे ट्रेकर्सना त्यांचे ते प्रमाणित ट्रेकर असल्याचे वैध प्रमाणपत्र सादर करावे लागेल (हे प्रमाणपत्र देशात फक्त चारच संस्थांमध्ये मिळते.) व प्रत्येक ट्रेकला जाण्याआधी जंगल सफारी बुकिंगसारखं ट्रेकर्सनाही गड-किल्ल्यांचं बुकिंग करून परवानगी मिळवणं आवश्यक असेल. असे काही नियम केल्यास बेकायदेशीर ट्रेकिंग ग्रुप्सना व नवख्या ट्रेकर्सना एकटय़ादुकटय़ाने गडांवर जाण्यापासून व पुढील अपघातांना रोखता येईल. राज्यातल्या सर्वच किल्ल्यांवर काही सामान्य पर्यटक जात नाहीत, काही गडांवर फक्त मुरलेले ट्रेकर्स व हौशी मंडळीच जातात. त्यामुळे फक्त वैध प्रमाणपत्र असलेले ट्रेकर्सच चढाई करू शकतील, असा नियम काढल्यास अशा अपघातांना रोखलं जाऊ शकतं. कारण तज्ज्ञ ट्रेकर्स असे अपघात होऊ नयेत याची निश्चितच पूर्ण काळजी घेतील. महाराष्ट्रात १४०० किल्ले आहेत आणि या प्रत्येक गड-किल्ल्यांवर उंच, भीतिदायक वाटणारे स्पॉट्स आहेतच. तोरणागड, कोकणकडा, रतनगड, हरिश्चंद्रगड अशी कित्येक नावं यात घेता येतील.

आज सोशल मीडियावर फिरणा-या या सेल्फीजना अडीच-तीन हजार लाईक्स मिळालेत, किमान १० हजारांनी तो फोटो पाहिला असेल. यातील काहीशे जण तर नक्कीच गडांवर अशा जागांवर जाऊन सेल्फी काढण्याचा थरारक प्रयत्न मोहापोटी करतीलच. त्यांना अडवणं इथे बसून शक्य नाही. म्हणूनच त्यांच्यापर्यंत जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नका हा संदेश पोहोचवण्यासाठीच हा सर्व लेखप्रपंच !

अनुकरण करा पण भान राखून!
गिर्यारोहणाबद्दलच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतीलही मात्र गिर्यारोहणाचा मूळ गाभा जपणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे प्रथम कर्तव्य आहे. नवखे गिर्यारोहक नामांकित गिर्यारोहण संस्थांच्या पावलांवर पाऊल ठेवून सह्याद्रीचा प्रवास करतात. त्यामुळे गिर्यारोहण अथवा भटकंती करताना बरेच जण प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतात. आजकाल तरुणाईमध्ये ‘सेल्फी’ हा आजार वाढीस लागला असल्याने किल्ल्यांवरील उंच ठिकाणी उभे राहून धोका पत्करून सेल्फी काढण्याचे प्रयत्न सर्रास होत आहेत. काही वेळेस अशा प्रकारांमुळे जीवघेणे अपघात देखील घडतात. असे प्रकार घडल्याने पर्यायाने इतरांच्या मनात गड-किल्ल्यांवरील अशा जागेबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. काही ठिकाणी अशा प्रसंगामुळे संरक्षक कठडा उभारण्यात येतो व पर्यायाने त्या जागेचे मूळ नसíगक सौंदर्यच नष्ट होते. सरकारी पातळीवर देखील अशा प्रकारांची दखल घेऊन सदर ठिकाणांवर बंदी येऊ शकते. प्रत्येकाने नसíगक सौंदर्याचा पुरेपूर आनंद जरूर घ्यावा मात्र आपल्या कृतीचे अनुकरण नवशिके करत असतात याचे भान ठेवून योग्य खबरदारी घेतल्यास अनुचित प्रकार टळतील. – संदेश कुडतरकर

शिवरायांनी गड सेल्फीसाठी नाही बांधलेत!
सध्या ट्रेकिंगच्या नावाखाली गडांवर उंच टोकांवर जाऊन सेल्फी काढून देऊ अशा काही ज्या जाहिराती सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत. मुळात अशा ठिकाणी सेल्फी काढूच नयेत. कारण शिवाजी महाराजांनी किंवा इतर कोणत्याही राज्य शासकाने असले सेल्फी काढण्यासाठी गड-किल्ले बनवलेले नाहीत. ते एका विशिष्ट उद्देशाने बांधलेले होते. त्याचा अनादर करू नका. त्यामुळे अशा प्रकारचे सेल्फी काढण्यासाठी प्रोत्साहन नकोच. एक आठवण म्हणून गडांवर फोटो काढायला हरकत नाही. शक्यतो सेल्फी वगरे प्रकार करूच नयेत. सेल्फी किंवा अगदी फोटो देखील काढणं ही गट नेतृत्वाची जबाबदारी असावी. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच छायाचित्रण करावं. – दीप्ती ठाकूर, गटनेता, नेचर्स लव्हर्स

ट्रेकिंगला बदनाम करू नका
ज्या सेल्फीवरून एकंदरीत ही चर्चा सुरू झाली तो मूळ सेल्फी तांत्रिकदृष्टय़ा खूप चांगला आहे व तो पूर्ण काळजी घेऊन सुरक्षितरीत्या काढलेला असावा असं मला वाटतं. पण त्याचं अनुकरण करून इतर जे काही सेल्फी सोशल मीडियावर फिरतायत ते मात्र चुकीचे आहेत कारण त्यातून चुकीचा संदेश जातो आहे आणि ट्रेकिंग क्षेत्राची, ट्रेकर्सची नाहक बदनामी होते आहे. गडकिल्ल्यांवर जाऊन सेल्फी काढणं यात काही चूक नाही फक्त यात खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. आज आपल्याकडे तंत्रज्ञान हाती आहे तर अशा प्रकारच्या फोटोंचा आनंद का मिळवू नये? त्यात काही गैर नाही. कारण अपघात हे सर्वत्र होतात. म्हणून काही आपण गाडय़ा, विमानं वगैरे चालवायचं तर बंद केले नाहीये. पण मग सेल्फी काढला म्हणून ट्रेकर्सवर टीका करण्यापेक्षा असे सेल्फी काढताना सुरक्षेचे नियम पाळूनच मग ते काढावेत असा संदेश ट्रेकर्समध्ये पोहोचणं गरजेचं आहे. नवख्यांकडूनच असे अपघात घडण्याची जास्त शक्यता असते. कारण त्यांना अति उत्साह असतो. म्हणूनच गडांवर वगैरे सेल्फी काढताना पुरेपूर काळजी घेणं आवश्यक आहे आणि ही एक प्रकारे टीम लिडरचीही जबाबदारी आहे. – संजय अमृतकर, संस्थापक, नाशिक हायकर्स

अनुभवी ट्रेकर्सकडून आधी शिकून घ्या
आज अनेक लोक ट्रेकिंगचा अनुभव नसताना उंच सुळके, गडांवर धोकादायक ठिकाणी जात आहेत. याच लोकांकडून सुरक्षेचं भान राखलं जात नाही. मग कुठेतरी कडय़ावर जाऊन सेल्फी काढणं वगरे प्रकार होतात. हे प्रकार अजून वाढतील देखील. अशा लोकांनी नतिक जबाबदारी पाळली पाहिजे. आधी ट्रेकिंगचं व्यवस्थित प्रशिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. असे सेल्फी काढणं हे तर चुकीचंच आहे. पण होतं काय की ही नवखी मुलं अनुभवी ट्रेकर्सचं अनुकरण करायला जातात आणि अनुकरण करताना त्यांच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते. हे तरुणाईच्या जोशातून घडू शकतं. मुळात जो अनुभवी ट्रेकर असेल तो सुरक्षेची साधनं बांधूनच असे सेल्फी काढेल. त्यातही मूळ फोटो हा गडांच्या टोकावर असे अपघात घडू शकतात, तेव्हा काळजीपूर्वक फोटो काढा हे सांगण्यासाठीच होता. पण त्याचं गरप्रकारे अनुकरण केलं गेलं हे दुर्दैव. नवीन ट्रेकिंग शिकणा-यांनी मर्यादा ओलांडू नयेत. सेल्फीच्या नादात अपघात घडतील आणि ट्रेकिंगवरच बंदी येईल, अशी परिस्थिती निर्माण करू नका एवढीच ट्रेकर्सना विनंती आहे. – राहुल मेश्राम, संस्थापक, ट्रेकक्षितीज

गडांवर चुकीच्या ठिकाणी सेल्फी ही विकृतीच!
किल्ल्यांवर जाऊन उंच टोकांवर बसून सेल्फी काढण्याचा थरार मिळवा अशा प्रकारच्या ज्या जाहिराती आणि फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत ते पाहून मला तर धक्काच बसला. हे पूर्णत: गैर आहे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर फोटोग्राफी ही होतेच, करावी देखील पण त्याला एक मर्यादा ही हवीच. हे असले सेल्फी म्हणजे तर विकृतीच म्हटले पाहिजेत. यात कसला थरार आलाय? हे तर जीवाशी खेळच आहेत. पुन्हा सोशल मीडियावर हे फोटो टाकल्याने हजारो जण हे फोटो पाहतात व तसंच करू पाहतात. त्यामुळे अपघातांना उत्तेजन देणारा चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो. त्यामुळे टीम लिडर्सनी सुरेक्षेचे नियम पाळूनच फोटो वगरे काढावेत आणि तशा सक्त सूचना गटाला दिल्या पाहिजेत. – संभाजी धनवे, स्वराज्य ट्रेकिंग क्लब

स्वातंत्र्याचा गैरवापर नको
ट्रेकिंगच्या माध्यमातून तरुणाईला, ट्रेकर्सना एक वेगळंच आयुष्य उपभोगण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं असतं. अनेक दृश्यं जी सर्वसामान्यांना अनुभवता येत नाहीत, ती ट्रेकर्स मंडळींना अनुभवण्याचा आनंद मिळतो. पुन्हा फोटो, लिखाण इत्यादी माध्यमातून तो आनंद इतरांपर्यंत पोहोचवताही येतो. मात्र अत्यंत धोकादायक परिस्थितीत उभं राहून, जीव जोखमीत घालून सेल्फी, ग्रुप फोटो वगैरे काढणं म्हणजे या स्वातंत्र्याचा गैरवापर करण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही अप्रत्यक्षरीत्या दुस-यांपर्यंत गैरसमजुती पोहोचवता. आजची पिढी अशी आहे की एखाद्या गोष्टीचे पुढे काय परिणाम होतील याचा विचारही तरुण करत नाहीत. अशावेळी काही भरकटलेल्या मुलांकडून उत्साहाच्या भरात काही अपघात घडू शकतात. तेव्हा प्रत्येकाने स्वत:वर व ट्रेकर्स ग्रुप लिडरने ग्रुपवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. – स्वप्नाली धाबुगडे-पाटील

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version