Home मनोरंजन मल्टिप्लेक्स एक प्रेमकथा एक सूडकथा

एक प्रेमकथा एक सूडकथा

1

२३ वर्षापूर्वी यशस्वी झालेल्या महेश भटनिर्मित‘आशिकी’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘आशिकी’च्या यशात जणू आपलाच हात होता, अशी भट कॅम्पची समजूत झाली असावी. खर तर…

आशिकी २
दिग्दर्शक : मोहित सुरी
कलाकार : सिद्धार्थ रॉय कपूर, श्रद्धा कपूर

नेहमी हॉलिवुडपटांकडे डोळे लावून बसलेल्या हिंदी चित्रपटांना कधी कधी आपण महाराष्ट्राच्या जवळ असल्याची जाणीव होते. त्यामुळे काही कथानकांमध्ये मराठी पात्रं, तिथली संस्कृती दिसून येते. मात्र, ती सादर करताना आपल्याला फार अभ्यास किंवा विचारमंथन करावं लागतं, ही गोष्ट ते विसरतात. कोणताही भाग पडद्यावर दाखवायचा असेल तर किमान त्याचा प्रयत्न तरी प्रामाणिक असावा एवढी माफक अपेक्षा असते. या सगळ्यामध्ये अनेकदा नकारात्मक टोनही असतो. हिंदी चित्रपटांतून दाखवणा-या मराठी व्यक्तिरेखा हा तर स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. हे सगळं आठवण्याचं कारण हेच की या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘आशिकी २’ हा चित्रपट.

२३ वर्षापूर्वी यशस्वी झालेल्या महेश भटनिर्मित‘आशिकी’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘आशिकी’च्या यशात जणू आपलाच हात होता, अशी भट कॅम्पची समजूत झाली असावी. खर तर त्या काळातल्या तरुणतरुणींच्या जाणिवा, नव्याने होत असलेले सामाजिक बदल व ‘आशिकी’ची गाणी यामुळे ‘आशिकी’ सुमार असूनही चालला होता. त्यात केवळ नशिबाचा भाग होता (भट यांच्या) कर्तृत्वाचा नाही, हे समजून घ्यायला हवं होतं. पण ते समजूत घेतील तर ते भट कसले? या चित्रपटाची तुलना अमिताभ व जया यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटाशीही करण्याचा प्रयत्न झाला, तो मात्र खुद्द निर्मात्यांनीच सोडलेल्या बातम्यांमधून. एरवी त्या अभिजात कलाकृतीशी या चित्रपटाचा काडीमात्र संबंध नाही. 

‘आशिकी २’ हीदेखील अर्थातच एक प्रेमकथा आहे. फक्त त्याला सूडाचीही किनार आहे. स्वत:च्या अस्तित्वाला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात दुस-या एका माणसाला मोठं करण्याचा तो प्रवास आहे. दोन कलाकारांच्या मनातल्या कलाविषयक भावनांचा हा आविष्कार आहे, असं वरवर वाटतं, मात्र तो तसा नाही. ही इतकी तरल, सरळ प्रेमकथा नाही. ती तशी असती तर हा चित्रपट डोक्यावर घेऊन नाचावं लागलं असतं. या चित्रपटाची कथा निखळ न ठेवता त्यात अनेक भावभावनांचा एक गुंता तयार करण्यात आलाय. जो कधी कधी अगदी असह्य होऊन जातो.

चित्रपटाची कथा घडते ती गोव्यात. काही कथानकांच्या सादरीकरणात गोव्याची पार्श्वभूमी चित्ताकर्षक ठरते तशी ती झालीय. राहुल जयकर हा इथला रॉकस्टार आहे. एक चांगला गायक आहे. मात्र त्याला जे यश मिळतंय ते त्याच्या अपेक्षेप्रमाणे नाही. आपल्याला याहीपेक्षा अधिक प्रसिद्धी व यश हवं, असं त्याला वाटत असतं. त्यापोटी त्याला प्रचंड नैराश्य आलंय. आपल्या गुणांचं योग्य मूल्यमापन न झाल्याचा राग तो एका वेगळयाच मार्गाने व्यक्त करतो. जे आपल्याला मिळालं नाही ते केवळ आपल्या मार्गदर्शनावर दुस-या कुणाला तरी मिळावं, असा पण करून तो त्याच ठिकाणी एका बारमध्ये गाणा-या आरोही शिर्के (श्रद्धा कपूर) ला निवडतो. तिच्याशी मैत्री करतो. तिला मदत करून तो यशाच्या जवळ आणतोही. तीही त्याच्यावर कृतज्ञ भावनेने प्रेम करते. त्याला सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करते. तो मात्र या नैराश्याच्या गर्तेत अधिकाधिक रुतत जातो, स्वत:ला दारूत बुडवतो. ती त्याला सावरते का? दारूच्या व्यसनातून तो मुक्त होतो का? त्याला जे हवंय ते त्याला मिळतं का? त्यांच्या प्रेमाचं काय होतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यात आपला पुढचा वेळ निघून जातो.

दिग्दर्शक मोहित सुरी याने प्रेक्षकांनी आपल्या जागेवरून उठून जाऊ नये, इतपत चांगली कामगिरी केलीय. अशी कथानकं कधी कधी त्याच्या साधेपणानंच प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतात, ही गोष्ट मात्र तो पार विसरून गेलाय. त्यामुळे हा चित्रपट पाहताना आपण एक लटकी प्रेमकथा पाहत आहोत, असं वाटतं राहतं. कधी कधी तर हे सर्वसामान्य व्यक्तिरेखांचं कथानक आहे की, मानसिकदृष्टया दुर्बलांचा मनोव्यापार आहे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा चित्रपट ना एक चांगली प्रेमकथा झालाय ना ट्रॅजेडी. ‘देवदास’सारख्या कथानकातून ज्या गोष्टी ‘अपिलिंग’ होतात, त्याच इथं ‘मिसिंग’ आहेत, असं सारखं वाटतं राहतं.

चित्रपटातली कौतुकास्पद बाब म्हणजे दोन्ही तरुण कलाकारांचा अभिनय. पात्रांकडून अभिनय करून घेताना, कधी कधी दिग्दर्शक आयत्या वेळी सूचना देतो तर कधी संपूर्ण भूमिका समजावून सांगतो. सिद्धार्थ रॉय कपूरने या दोन्ही शैलीचं संतुलन राखल्याचं दिसून येतंय. काही काही प्रसंगात त्याची भूमिकेची समज दिसून येते तर काही ठिकाणी त्याच इम्प्रोव्हायजेशन. आपली भूमिका त्याने ‘प्रोफाइल रोल’ समजून प्रचंड मेहनतीने सादर केलीय. भूमिकेच्या वेगवेगळय़ा छटा दाखवताना त्याच्यातला चाणाक्ष व कुशल अभिनेता दिसून येतो. त्याला वापरून घेण्यात दिग्दर्शकच कुठेतरी कमी पडलाय की काय, असंही वाटून जातं. श्रद्धा कपूरचेही कौतुक करायला हवंय. उदयोन्मुख ते यशस्वी गायिका, एक खरी प्रेयसी, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असे तिने भूमिकेचे विविध पदर ताकदीने दाखवलेत. तिला मराठी करण्याच्या दिग्दर्शकाच्या हव्यासालाही तिने न्याय दिलाय.

चित्रपटाचा एक भाग हा दारूच्या दुष्परिणामांचा आहे. कलाकाराच्या ठायी असलेला अहंभाव ठाशीवपणे समोर आलाय. ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरावी. यासाठी चित्रपटाच्या कथाकाराला शंभर गुण द्यायला हवेत. अशा प्रकारची पात्रं ही अनेकदा सभोवताली पाहायला मिळत असतात. ती त्यांनी प्रामाणिकपणे आणली आहेत. आहे ती कथा साधेपणाने प्रेक्षकांसमोर पेश करण्याऐवजी त्यात अनेक शैलींचा गोंधळ घालण्यात आलाय, एक गोष्ट खटकत राहते. सगळयांसाठीच काही ना काही देण्याचा व्यावसायिक प्रयत्न या कथानकाचा गळा घोटतो. गाणी व संगीत ठाकठीक आहे. त्याचा आताच्या काळात कितपत फायदा होईल, हे सांगता येणार नाही. हा चित्रपट जर कथानकाशी प्रामाणिक राहून सादर केला असता तर आवर्जून पाहावा, असा झाला असता, एवढं निश्चित.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version