Home प्रतिबिंब एक वास्तव अस्वस्थ करणारे!

एक वास्तव अस्वस्थ करणारे!

1

आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर असे अनेक क्षण येतात, की ज्यामुळे आपला आनंद कधी आभाळालाही गवसणी घालतो. कधी इतके अस्वस्थ होतो, की त्यामुळे आपली झोपही उडते. काही साहित्यकृती, कविता, कलाकृती अशाच आनंद देतात, कधी प्रचंड अस्वस्थ करून जातात. म्हणूनच त्या अजरामर होतात. या आठवडयाच्या सुरुवातीला अशाच दोन ओळी व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर होऊ लागल्या आणि त्या ओळींनी अनेकांची झोप उडवली.
व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याला वेगवेगळ्या पोस्ट मिळत असतात. बातम्या मिळत असतात. कधी हलके-फुलके विनोद तर कधी बोऽऽर करणारे भलेमोठे लेखही असतातच. सकाळी सकाळी व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘शुभप्रभात’च्या शुभेच्छांनी जागे झालेले आपण रात्री उशिरापर्यंत सर्वाना ‘शुभरात्री’ म्हणता म्हणता मध्यरात्रही ओलांडून टाकतो. एवढे या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्याला कवेत घेतले आहे. सातासमुद्रापार असलेल्या मित्र-मैत्रिणींपासून तर हाकेच्या अंतरावर असलेल्या आप्तस्वकियांचेही संवादाचे माध्यम व्हॉट्सअ‍ॅपच झाले आहे. त्याचा किती चांगला वापर करून घ्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे. खरे तर वाह्यात गोष्टीकडे दुर्लक्ष करून, चांगले काही वेचायचे, वाचायचे आणि हसतखेळत जगायचे हे माध्यम होऊ शकेल. तसा प्रयत्न अनेक मोबाइलधारक करताहेत. चांगल्या कविता, वचने, सुभाषित, छायाचित्रे एकमेकांना शेअर करून एकमेकांचा आनंद द्विगुणित करताहेत.

त्या दिवशीही वेगवेगळ्या ग्रुपवर गप्पा सुरू होत्या. दिवस सोमवारचा होता. वेळ रात्री सायंकाळी सात-आठची. २५ तारखेला होणा-या रेल्वे भाडेवाढीपूर्वी मुंबईकर मित्र-मैत्रिणींनी रेल्वेपास काढला की नाही, या चर्चेपासून तर साखरही कशी कडू झाली इथपर्यंतची चिंता व्यक्त होत होती. दहा-पंधरा वर्षापूर्वी महाविद्यालयीन जीवनात तरुणाईचा उत्सव साजरा करणारे आज तीस-पस्तीशीत आले आहेत. अशा त्या ‘तरुणाई’च्या आठवणी जोपासणारा एक ग्रुपही व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. त्या ग्रुपवर कॉलेज जीवनातील आठवणींना ऊत आला होता. धम्माल, मस्ती, दोस्ती, हरलेल्या कुस्तीपर्यंत त्यांची चर्चा पोहोचली होती. कार्यालयीन कामात व्यस्त असणारे सदस्य अधे-मधे या चर्चेत डोकावत होते. मजा घेत होते. काही गप्प होते. याच ग्रुपवर एक पत्रकार मित्र आहे, त्याने रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक पोस्ट टाकली. नेहमीच्याच काहीतरी चार ओळी असणार, अशा पद्धतीने अनेकांनी दुर्लक्ष केले. काहींनी त्या ओळी वाचल्या आणि या पोस्टला काय दाद द्यावी, म्हणून गप्प राहिले. काहींनी ‘क्या बात है’ म्हणत दाद दिली. काहींनी मस्त म्हणत ‘लाइक’ करून वाह वाह केली. काहींनी हीच पोस्ट वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर केली. ती इकडून तिकडे फिरायला लागली. त्या ओळींनी संवेदनशील मनांची झोपही उडवली. त्या ओळी होत्या,

सो गए बच्चे गरीब के जल्दी से यह सुनकर
फरिश्ते आते हैं ख्वाबों में रोटिया लेकर!

गरिबीचे भेदक वास्तव मांडणा-या या ओळी कुणी लिहिल्यात याची शोधमोहीम सुरू झाली. ज्यांनी ही पोस्ट टाकली त्यांना विचारणा झाली. कुठेच काही सापडत नव्हते. जे ग्रुप एका विषयावरच खास चर्चा करतात, त्या विषयांव्यतिरिक्त इतर विनोद, कविता, फोटो, शुभेच्छा यांना बंदी असते, अशा ग्रुपवरही सदस्यांची क्षमा मागून या ओळी शेअर केल्या. ही रचना कुणाची, याची विचारणा केली. कुणाकडूनही उत्तर मिळत नव्हते. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. अनेकांनी जगविख्यात संशोधक ‘गुगल’ला विचारून काही धागेदोरे सापडतात का, हे तपासून पाहिले. गुगलवर थेट या ओळी टाकल्या. त्यातही या कवीचे नाव सापडले नाही. पण महेश भट यांनी ‘कही सुना था..’, अशी टॅग देऊन या ओळी शेअर केल्याचे दिसले. वेगवेगळ्या ग्रुपवरही रात्री उशिरापर्यंत एकमेकांना विचारणा करणे सुरूच होते.

त्या ओळींची दखल घेत अनेक जण मध्यरात्रीपर्यंत व्यक्त होत होते. ‘खरोखरच ढवळून काढणारे शब्द आहेत हे..! खरं तर दाहक चटके देणारे निखारेच!’ कुणी याच ओळींचे विश्लेषण करीत ‘आपण सगळेच स्वप्नात मिळणा-या रोटीची वाट पाहतोय.. वेगवेगळ्या अर्थाने’ मत व्यक्त करीत होते. कुणी हृदयाला हात घालणा-या या ओळी असल्याचे सांगत होते तर कुणी या ओळींतून भीषण वास्तव मांडल्याचे म्हणाले. रात्र उलटली. सकाळी पुन्हा वेगवेगळ्या ग्रुपवर याच ओळी नव्याने शेअर व्हायला लागल्या. सकाळी पुन्हा कवीच्या नावाचा शोध सुरू झाला.

सकाळी १० वाजताच्या सुमारास एका ग्रुपवर याच ओळी प्रसिद्ध झाल्या. त्या ओळी कुणाच्या, या प्रश्नाच्या शोधात असणा-यांनी त्या सदस्याला विचारले. ‘मलाही माहीत नाही’ हेच उत्तर पुन्हा मिळाले. अर्धा-पाऊण तास उलटून गेला आणि या कवीचे नाव, एका सदस्याने सांगितले. हा थोर कवी आहे डॉ. बशीर बद्र!

बशीर बद्रच्या नावाने पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. १५ फेब्रुवारी १९३५मध्ये जन्मलेले बशीर बद्र यांनी अलीगडच्या मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले. वयाच्या सातव्या वर्षापासून कविता लिहिणा-या या कवीला १९९९ मध्ये पद्मश्री आणि ऊर्दूच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या असंख्य कविता गुगलवर मिळतात. या कवीने आयुष्यभर कवितेवर प्रेमच केले नाही, तर ते कविता जगले आहेत. त्यांच्या असंख्य कवितांनी समाजातील व्यंगांवर प्रखर भाष्य केले आहे, ते सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजमन अस्वस्थ करणारे आहे. त्यातल्याच या काही ओळी..

लोग तूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तिया जलाने में
तमाम रिश्तों को मैं घर पे छोड आया था
फिर उसके बाद मुझे कोई अजनबी नही मिला..

अशा असंख्य ताकदीच्या रचना त्यांच्या नावावर सापडल्या पण, ‘सो गये बच्चे..’ या ओळी ‘गुगल सर्च’मध्ये त्यांच्या नावावर सापडल्या नाहीत. पण या ओळी त्यांच्याच आहेत. त्यांच्या शायरीचे मराठी अभ्यासक आणि गझलप्रेमींनी त्यांचे कवितासंग्रह जपून ठेवले आहेत.

व्हॉटस्अ‍ॅपवरील त्यांच्या या दोन ओळींनी प्रभावित झालेले मित्र आता वेगवेगळ्या ग्रुपवर बशीर साहेबांच्या वेगवेगळ्या रचना शेअर करताहेत. कविता शोधण्याची मोहीम वाढली आहे. वेगवेगळ्या प्रसिद्ध शायरांच्या रचनांची ताकद नव्या पिढीला माहीत होते आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर अशी एखादी ओळही तरुण पिढीला जिज्ञासू बनवू शकते, हे सिद्ध झाले आहे. ही जिज्ञासू वृत्ती वाढली तर व्हॉटस्अ‍ॅप हे माध्यम आपल्याला रंजनासोबतच ज्ञानरंजनातही गुंतवू शकते, याची खात्री देणारे आहे.

1 COMMENT

  1. किसने मुझको सदा दी बता कौन है
    ऐ हवा तेरे घर में छुपा कौन है

    बारिशों में किसी पेड़ को देखना
    शाल ओढ़े हुए भीगता कौन है

    मैं यहाँ धूप में तप रहा हूँ मगर
    वो पसीने में डूबा हुआ कौन है

    आसमानों को हमने बताया नहीं
    डूबती शाम में डूबता कौन है

    ख़ुशबूओं में नहाई हुई शाख़ पर
    फूल-सा मुस्कुराता हुआ कौन है

    दिल को पत्थर हुये इक ज़माना हुआ
    इस मकाँ में मगर बोलता कौन है

    तुम भी मजबूर हो हम भी मजबूर है
    बेवफा कौन है बावफा कौन है

Leave a Reply to Lalit Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version