Home प्रतिबिंब आला उन्हाळा, तब्येत सांभाळा!

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा!

0

आला उन्हाळा तब्येत सांभाळा, असा कानमंत्र सतत आपल्याला मिळत असतो. त्याकरता काय करावे. या बाबतचे सल्ले सतत तज्ज्ञांकडून मिळत असतात. त्याचा अवलंब केल्यास आपलीच तब्येत छान टवटवीत, ताजीतवानी राहू शकते.

होळी पार पडली की उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरातही वाढते आणि बाहेरदेखिल. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंना घ्यावी लागते. भारतासारख्या देशात उन्हाळा अतिशय कडक असतो. त्यातही विविध छटा असतात. समुद्रकिनारी, मुंबईतील उन्हाळा घामेघाम करणारा तर विदर्भातील उन्हाळा चटके देणारा. हा चटके देणारा उन्हाळा माणसाला उष्माघातापर्यंत नेतो. म्हणूनच उन्हाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन सर्वांना माहीत असले पाहिजे, कारण नेहमीच्या जीवनशैलीतच बदल करावा लागतो.

उन्हात फिरण्याचे टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मात्र उन्हातून फिरण्याची वेळ आल्यास डोळे, डोके व शरीर यांना संरक्षण देणे गरजेचे आहे; तसेच उन्हातून फिरून आल्यानंतर थंड पेय लगेच पिण्याचे टाळावे. उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारी अंगाची काहिली होत आहे. काहीवेळा ग्लानी आल्यासारखे वाटते. डोळ्यात काही वेळा लाली येऊन ते चुरचुरल्यासारखे वाटतात. त्यामुळे प्रत्येकानेच स्वत:हून काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हात घ्यावयाची काळजी

महत्त्वाचे व आवश्यक काम असल्याशिवाय उन्हातून घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर पडताना पातळ, सुती, फिक्या किंवा पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. डोक्याला टोपी डोळ्यांना गॉगल असावा. उन्हाच्या झळा लागू नयेत यासाठी संपूर्ण अंग झाकणारे असावेत. तिखट, खूप गरम, रूक्ष असे पदार्थ टाळावेत. दही, लस्सी वर्ज्य करावी; मात्र ताक भरपूर प्यावे. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबूचे सरबत, शहाळ्याचे पाणी प्यावे. उसाच्या रसात किंवा कोणत्याही पेयात बर्फ टाकून घेऊ नका. हा बर्फ औद्योगिक वापरासाठी म्हणजे एखादी वस्तू बाहेरून थंड करण्यासाठी तयार केलेला असतो. तो पेयात वापरला तर त्यापासून आजार होऊ शकतात. पाणी शक्यतो उकळून प्या.

ताप आल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या, मुलांना सुटीत पोहण्याच्या तलावावर पाठवण्याआधी विषमज्वर प्रतिबंध लस देणे आवश्यक आहे. तसेच तीन-चार जणांच्या गटाने मुलांना पोहायला पाठवावे. खूप गर्दीच्या तलावांवर पोहण्याचे टाळावे.

घरात, कामच्या ठिकाणी थंडावा निर्माण होईल, अशी व्यवस्था असावी. थंड पाण्याने स्नान करावे. दुपारी अर्धा तास झोप घ्यावी. उन्हाळ्यात खूप घामाघूम करणारा व्यायाम प्रकार करू नये. मात्र सकाळी हिरवळीवर अनवाणी किंवा सायंकाळी झाडांच्या सावलीतून चालण्याचा, पोहण्याचा व्यायाम केला तरी चालेल. ढोबळी मिरची, कारले, मेथी आदी भाज्या टाळाव्यात. उष्णतेचा त्रास जाणवल्यास कांद्याचा रस, गुळवेल सत्व, गुलकंद, मोरावळा, दुर्वांचा रस, यांचे सेवन करावे. रात्री झोपताना कपाळावर चंदन उगाळून लेप लावावा. कलिंगड, काकडी, व कोहळ्याचा पेठा खाणे. उत्तम ठरेल. उन्हाळ्यात घामोळे येते. खाज आल्याने सहजपणे ते खाजविले जाते.

काहीवेळा त्यातून रक्त येते. कुशीतील त्वचा कोरडी व उष्ण असते. तेथे घामोळे आले असेल, तर ‘कोनाइट’ हे औषध उपयोगी पडते. घामोळ्यांचा दाह होत असल्यास ‘एपिस मेल’ हे औषध आणि लहान मुलांना ‘चामोमिला’ हे औषध उपयोगी आहे. ही औषधे वैद्यकीय सल्ल्यानंतर घ्यावीत. उन्हाळ्यात कावीळ, प्रामुख्याने विषमज्वर, कावीळ, गॅस्ट्रो यांसारखे रोग होऊ शकतात. त्यांची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उघडय़ावरील तसेच शिळे अन्न खाऊ नये. घरी जेवतानाही आहार हलक्या स्वरूपाचा ठेवावा. त्यामध्ये दूध, दही, ताक, फळे आणि कोथिंबीर यांवर भर द्यावा. तिखट, तेलकट अन्नही टाळावे.

उन्हाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. बर्फ तयार करण्यासाठी चांगलेच पाणी वापरणे आवश्यक आहे. कारखान्यात तयार झालेल्या बर्फाचे नमुने तपासणे आता सुरू केले पाहिजेत. सरबत किंवा फळांच्या रसात बर्फ घालण्याऐवजी ते बाहेरून बर्फ ठेवून थंड करावेत. रंगीबेरंगी सरबते, उघडय़ावर कापून ठेवलेली फळे, शक्यतो खाऊ नयेत. महापालिकेच्या नळातूनच येणारे पाणी पिण्यासाठी वापरावे.

उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे जरूरीचे असते. चटके देणा-या उन्हामुळे डोळ्यांची आग-आग होऊ शकते. उन्हाळ्यात घेण्यात येणारा गॉगल हा त्याच्या काचा शास्त्रशुद्ध आहेत हे तपासून घ्यावा. दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. जलतरण तलावांद्वारे डोळ्यांचे संसर्गजन्य रोग होऊ शकतात, त्यामुळे तलाव स्वच्छ असेल तरच तेथे जावे. शीतपेय आणि आईस्क्रिम यांचाही भडिमार केला जाऊ नये.उन्हातून लगेच आल्यावर पाणी पिऊ नये. अशाप्रकाराने उन्हाळ्यात जर तब्येतीची काळजी घेतल्यास तब्येत छान व टवटवीत राहण्यास मदत होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version