Home महाराष्ट्र एसटी महामंडळाचे उन्हाळी स्पेशल!

एसटी महामंडळाचे उन्हाळी स्पेशल!

1

एसटी महामंडळाने सालाबादप्रमाणे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान ६१४ जादा गाड्या दररोज सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या पडण्यास सुरुवात झाल्याने उन्हाळी सुट्टीत गाव गाठण्याचे बेत मुंबईकर आखू लागले आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या मोसमात लग्नसराई असल्याने गावी जाणा-यांची संख्या लक्षणीय असते. बहुतांश प्रवाशांची खासगी वाहतुकीपेक्षा एसटीलाच प्रथम पसंती असल्याने एसटी महामंडळाने सालाबादप्रमाणे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान ६१४ जादा गाड्या दररोज सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गावखेड्यात आजही दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटीवरील प्रवाशांचे प्रेम आजही कायम असून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद सार्थ करण्यासाठी महामंडळही सज्ज झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार असून, जेथे गरज भासेल तेथे एसटीच्या जादा फे-याही चालवण्यात येणार असल्याचे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी मुकुं द धस यांनी सांगितले.

मुंबईतून मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर, बोरिवली, तर ठाणे विभागातून ठाणे, भिवंडी, कल्याण, पनवेल, पालघर, अर्नाळा येथून जादा एसटी सोडण्यात येणार आहेत. एसटीचा तिकीट दरही वाढला असला तरी एसटीला होणारी गर्दी आजही कमी झालेली नाही. सुरक्षित आणि निर्धोक प्रवासासाठी बहुतेक प्रवासी खासगी बसपेक्षा एसटीच बरी असे म्हणत आजही एसटीची निवड करत आहेत. त्यामुळे एसटी आगारात उन्हाळी सुट्टीच्या आरक्षणासाठी गर्दी सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी उन्हाळी हंगामासाठी एसटी महामंडळाने ५७२ जादा बस सोडल्या होत्या. महामंडळाने यंदा एसटीच्या फे-यांत वाढ करण्याचे नियोजन केले असून, प्रवाशांना तिकिटे मिळवणे सुलभ होईल. उन्हाळी सुट्टीत जादा वाहतुकीबाबत प्रवाशांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

विभाग फे-या
मुंबई १४७
नाशिक १२४
औरंगाबाद १०७
अमरावती ३०
पुणे १४७
नागपूर ५९

1 COMMENT

  1. एसटी दरवर्षी जादा गाड्या सोडते पण जादा गाड्यांना ऑनलाइन आरक्षण मध्ये थांबे द्यायला विसरते.
    उदा. गेल्यावर्षी मुंबई रत्नागिरी या जादा गाडीला मुंबई सेंट्रल नंतर संगमेश्वरअसा थांबा दिला होता आणि दादर,सायन,कुर्ला, मैत्री पार्क,वाशी,नेरूळ,बेलापूर,पनवेल येथे थांबा देण्यात आहे नव्हते.
    प्रवाश्यांना गाडीसाठी मुंबई सेंट्रल गाठावे लागते आणि त्यात कुटुंबाला घेऊन जाताना प्रचंड गैरसोय होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version