Home रिलॅक्स ‘ऑलराउंडर’ कला दिग्दर्शक

‘ऑलराउंडर’ कला दिग्दर्शक

0

कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक व्यक्ती अशी असते, जी खरोखरंच ‘ऑलराउंडर’ असते. कारण चित्रपटाचं कथानक, चित्रीकरण, दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांची गरज, कथानकातील व्यक्तिरेखा, त्यांचं सादरीकरण या सगळ्या आणि चित्रीकरणाशी निगडित असे अनेक बारकावे ती जवळून हाताळत असते. ती व्यक्ती म्हणजे ‘कला दिग्दर्शक’. भांडुपच्या सतीश चिपकर यांनी २००० सालापासून कला दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ‘अब तक छप्पन’, ‘शबरी’ यांसारखे ‘गॅँगवॉर’वर आधारलेले अनेक चित्रपट त्यांना मिळत गेले आणि त्यांच्यावर ‘गॅँगवॉर सेट स्पेशालिस्ट’ असा शिक्कामोर्तब झाला.

चित्रपटाचं कथानक आणि त्यानुसार दिग्दर्शकाची गरज समजून घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सेट उभारला जातो. यात कथानक कोणत्या काळातलं आहे, कुठे घडत आहे, चित्रपटातील व्यक्तिरेखांचं राहणीमान, आवडी-निवडी या सगळ्यांमधले बारकावे विचारात घ्यावे लागतात. या सगळ्याला अनुसरून वास्तवदर्शी सेट उभारणं हे कला दिग्दर्शकाचं काम असतं.

समजा, एखाद्या कथानकात १९९०चा काळ दाखवायचा आहे. मग त्यासाठी त्या काळातले लोक, त्यांचं राहणीमान, त्यांची जीवनशैली, पद्धती शिवाय तिथे वावरणा-या व्यक्तिरेखा या सगळ्याचा अभ्यास करून तो कालखंड हुबेहूब उभा करणं हे खरं कसब असतं. हॉस्पिटल दाखवताना त्यातला जनरल वॉर्ड, आय.सी.यू., ऑपरेशन थिएटर, लॅब यापैकी दिग्दर्शकाला जे अपेक्षित आहे, त्यानुसार सेट उभारायचा असतो.

दादासाहेब फाळकेंच्या काळापासून कला दिग्दर्शकाला दिग्दर्शकाइतकंच महत्त्व होतं. त्याला चित्रपटाच्या ‘प्रॉडक्शन डिझायनिंग’च्या विविध पैलूंचं काम पाहावं लागतं. त्यात सेटचं डिझाइन काढणं, तो उभारणं, कॅमेरामनचा सेटअप लावणं अशी अनेक कामं अंतर्भूत असत. परंतु कलाकारांचा मेकअप आणि कलाकार कसा दिसायला हवा, हेदेखील कला दिग्दर्शकच ठरवत असे. म्हणजे प्रसंगी दिग्दर्शक सेटवर नसतानाही, कला दिग्दर्शक सगळं एकटयानं सांभाळणारा ‘ऑलराउंडर’च असायचा.

कालांतरानं चित्रपटसृष्टीशी निगडित तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं, कामाचा दर्जा जसजसा उंचावत गेला आणि कामाची व्याप्तीही वाढू लागल्यानं मेकअप, वेशभूषाकार, इतर तंत्रज्ञ, प्रॉपर्टी मास्टर्स ही काम स्वतंत्रपणे करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनसामग्री, संगणकीय तंत्रज्ञान या सगळ्याचा मेळ साधून कला दिग्दर्शकाचं काम पूर्वीपेक्षा बरंच सोप झालं आहे. अगदी १९८०-९० च्या काळापर्यंत सेट उभारताना लाकडाची एक फळी कापायला करवत, कापण्यासाठी एक ते दोन माणसं आणि १५-२० मिनिटं लागायची. आत हेच काम आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीनं अवघ्या काही सेकंदांत पूर्ण होतं. पर्यायानं जो सेट उभारण्यासाठी पूर्वी १५-२० दिवस लागायचे, तोच सेट आता ५-६ दिवसात उभारून होतो.

हल्लीच्या कला दिग्दर्शकांचं काम हे पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालेलं आहे, हे सांगताना, सतीश म्हणतात, ‘‘आताच्या कला दिग्दर्शकाला केवळ ‘बॅकग्राउंड (सेट)’चं काम सांभाळावं लागतं. कला दिगदर्शक हाच ‘सेट डिझायनर’ असतो. कला दिग्दर्शक सर्वप्रथम कथानक वाचून त्याचा अभ्यास करून सेट कसा असायला हवा, याचा एक अंदाज बांधतो. त्यानंतर दिग्दर्शकासोबत चर्चा करून त्याला काय अपेक्षित आहे आणि कॅमेरामनचा दृष्टिकोनही विचारात घेऊन त्याचं ‘स्टोरी बार्डिग (चित्र काढणं)’ करायचं असतं. अतिभव्य स्वरूपाचा सेट उभारायचा असल्यास प्रसंगी त्याचं मॉडेल / मिनिएचर (लहान प्रतिकृती)ही तयार करावं लागतं. कारण त्याद्वारे दिग्दर्शक आणि कॅमेरामनला कॅमेरा कोणकोणत्या ठिकाणी लावायचा आहे, याचा अचूक अंदाज येतो.’’

सतीश यांच्या सेट उभारण्याच्या शैलीविषयी ते सांगतात, ‘‘माझ्या प्रत्येक सेटच्या डिझाइनचं स्टोरी बोर्डिग मीच करतो. माझ्यासह सात एक्सपर्ट असिस्टंट्सची टीम आहे. यातला प्रत्येक जण हा कला दिग्दर्शकाइतकंच चोख काम करणारा आहे. शिवाय कारपेंटर, टेलर्स, पेंटर्स (यातही नुसतं रंगकाम करणारे आणि एजिंग आर्टिस्ट), मोल्डर्स (पी.ओ.पी.चा सेट उभारण्यासाठीचा साचा तयार करणारे), प्रॉपर्टी मास्टर्स, इतर तंत्रज्ञ आणि मजूर यांचा ताफा असतोच. सेट उभारताना दिग्दर्शक आणि कॅमेरामनला काम करणं अधिक सोयिस्कर जावं, यासाठी ३६० अंशात कॅमेरा फिरवता येईल, अशी व्यवस्था करूनच सेट उभारला जातो, जेणेकरून कॅमेराच्या फ्रेममध्ये संपूर्ण सेट मावेल आणि रन आऊट (फ्रेमसाठी अपुरा पडणं) होणारा नाही, याची खबरदारी मी घेतो. कधी मुंबई तर कधी दिल्ली किंवा मुंबईतही वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण सुरू असल्यानं दरवेळी प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही. परंतु मी काही ठिकाणी हजर नसतानाही माझ्या टीममधले प्रत्येक तंत्रज्ञ हे सगळ्या जबाबदा-या लीलया पेलतात.’’

शाळेत असल्यापासून चित्रकलेची आवड असलेल्या सतीशना त्यांच्या मोठया भावानं चित्रकलेच्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. दहावीनंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली खरी, पण एकाच वर्षानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कमर्शिअल आर्ट्स शाखेत अॅडमिशन घेतली. त्यांचा सगळा मित्रपरिवार हा रहेजा इन्स्टिटय़ूटमध्ये असल्याने तिथे त्यांचं मन रमलं नाही, म्हणून पुढचं शिक्षण त्यांनी रहेजामध्ये घेतलं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी जाहिरातींची पत्रकं, बॅनर्स, पोस्टर्स बनवणं अशा कामांना सुरुवात केली.

कला दिग्दर्शक हा ‘ऑलराउंडर’ असतो, असं ठाम मत असलेले सतीश हे आव्हानात्मक सेट उभारताना इंजिनीअरची गरज कशी पडते, याविषयी एक रंजक अनुभव सांगतात, ‘‘एखाद्या ठिकाणी अतिभव्य भिंत उभारताना काही टेक्निकल आव्हानं येतात. कला दिग्दर्शक हे करू शकतो. परंतु त्याच्या मोजमापात अचूकता येण्यासाठी आणि अपघातात कधी-कधी इंजिनीअरची गरज भासते. ‘हसुमख पिघल गया’मधे अमिताभ बच्चन इमारतीच्या भिंतीपासून ३० फूट बाहेर जोडलेल्या फळीवर रॅम्पवॉक करतो, असा प्रसंग चित्रित करायचा होता. अशा वेळी ३० फूट लांब फळीला भक्कम आधार देण्यासाठी मी ही फळी इमारतीच्या आतल्या बाजूला २० फूट वाढवली आणि त्या अधांतरी फळीवर येणारा ताण पेलला. ही फळी व्यवस्थित उभारून झाल्यावर त्यावरून सर्वप्रथम मी स्वत:, माझा असिस्टंट आम्ही दोघांनीही चालून दाखवलं आणि मग त्यावर अमिताभजी चालले आणि तो प्रसंग चित्रित झाला.’’

‘व्हर्च्युअल सेट डिझायनिंग’चा हल्लीच्या कला दिग्दर्शकांना तोटा न होता, उलट नवनवीन तंत्र, आयडिया आत्मसात करण्यासाठी उपयुक्त आहे, असं ते मानतात. कारण प्रत्यक्ष सेट उभारल्यावर आणि कॅमे-यामध्ये चित्रित करून झाल्यावर हे चित्रीकरण लगेचच दिग्दर्शकाला पाहता येतं, परंतु ‘व्हच्र्युअल डिझायिनग’मध्ये चित्रीकरण केल्यावर ते स्क्रीनवर कसं दिसेल, याबाबत साशंकता असते. एकदा ‘घुंघट’ चित्रपटासाठी माझे गुरू रत्नाकर फडके यांना असिस्ट करण्यासाठी मला विचारलं गेलं. ही मला कला दिग्दर्शक म्हणून सेट उभारण्यासाठी मिळालेली पहिली संधी. पहिलाच उभारलेला सेट रत्नाकर फडके आणि दिग्दर्शकालाही खूप आवडला आणि मग पुढे काम मिळत गेली.

उभारलेला सेट नष्ट करताना, कशी रूखरूख वाटते, याविषयी ते सांगतात, ‘‘अब तक छप्पन’मध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकच कमिशनर ऑफिस उभारलं होतं. परंतु प्रत्येक ठिकाणी हुबेहूब सेट उभारल्याबाबत नाना पाटेकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली होती. आता चित्रीकरण सुरू असलेल्या संजय जाधव यांच्या ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’मध्ये गणपती मंदिर आणि मशीदही उभारली होती. हा सेट तोडताना सर्वात आधी मंदिरातल्या गणपतीचं विसर्जन केलं आणि मगच तो सेट तोडायला घेतला. तो तोडायलाही पाच दिवस लागले. त्यामुळे जीव ओतून केलेलं काम तुटताना वाईट हे वाटतंच!’’

आतापर्यंतचे राम गोपाल वर्मा यांचा ‘अब तक छप्पन’, ‘शबरी’, विश्राम सावंत यांचा ‘डी’, मनीष गुप्ता यांचा ‘स्टोन मॅन’ असे चित्रपट हे ‘गॅँगवॉर’वर आधारलेल्या चित्रपटांचे सेट्स सतीश चिपकर यांनी उभारले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अभिनेता मिलिंद सोमण याच्या ‘प्यार का सुपरहीट फॉर्म्युला’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा स्वतंत्रपणे सेट उभारला. हा अतिशय संथ गतीचं कथानक असलेला चित्रपट होता. तर ‘अब तक छप्पन’ हा त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होता. ‘अब तक छप्पन’ मधल्या सेटचं काम आवडल्यामुळे पुढेही मला ‘गॅँगवॉर’वर आधारलेले चित्रपट मिळत गेले आणि मग ‘गॅँगवॉर’वरच्या चित्रपटांचे सेट सफाईदारपणे करणारा असा एक शिक्काच माझ्यावर लागला! एका खासगी संस्थेतर्फे भांडुप ते ठाणे या दरम्यानच्या होतकरू कलाकारांना दरवर्षी गौरवलं जातं. या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वीच सतीश यांना गौरवलं गेलं.

सध्या संजय जाधव दिग्दर्शित करत असलेल्या ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचं शूटिंग पनवेलमध्ये सुरू आहे. या चित्रपटासाठी १९८० ते १९९० दरम्यानच्या काळातली प्रेमकथा, त्या काळातली माणसं, घरं, अवती-भवतीचं वातावरण, वापरल्या जाणा-या वस्तू या सगळ्याचा विचार करून सेट उभारला गेला आहे. याशिवाय विश्राम सावंत यांचा ‘गॅँगवॉर’वरच आधरलेला ‘शूटर’, संजय दत्त प्रॉडक्शनचा ‘हसुमख पिघल गया’, ‘फॉर्टी फोर डेज’ या चित्रपटांचं शूटिंगही सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version