Home कोलाज ओ माझी रे, अपना किनारा..

ओ माझी रे, अपना किनारा..

1

मुंबईने नकळत प्रेमातच पाडले ते समुद्राच्या या न थांबणा-या लाटांच्या गाण्यामुळेच ! त्यांचे एक वेगळेच संगीत हे मुंबईच्या जीवनाचे पार्श्वसंगीतच आहे जणू ! मला त्या लाटांची हाक आत कुठेतरी जाणवली. क्षणभर असे वाटले की, या लाटा गेली कितीतरी वर्षे माझी वाटच पाहत होत्या.

का कुणास ठाऊक मुंबई सोडायचे फार जीवावर आले होते. खरे तर ठाण्यात, तोही स्टेशनच्या जवळ, स्वत:चा फ्लॅट असताना मुंबईत सरकारी क्वार्टरमध्ये राहणे कुणीच शहाणपणाचे मानणार नाही. पण, मी ते जवळजवळ २० वर्षे पसंत केले. माझे कारण फार वेगळे होते. जवळजवळ ३० वर्षापूर्वी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हाच मी इथल्या समुद्राच्या प्रेमात पडलो होतो. नंतर कितीतरी गोष्टी आवडल्या, अनुभवल्या पण समुद्रावरचे ते प्रेम कधीच कमी होऊ शकले नाही. आयुष्याच्या आजवरच्या प्रवासात श्रीरामपूर, औरंगाबाद, नाशिक अशी अनेक गावे झाली, वेगवेगळ्या नोक-या झाल्या, पण मुंबईच्या समुद्राने जे वेड लावले आणि त्यामुळे या महानगराचे जे आकर्षण निर्माण झाले ते काही मनातून गेले नाही. एकदा विचार केला, हे वेड पाण्याचे आहे का? पण, लगेच लक्षात आले टिळकनगरला आमच्या कॉलनीजवळ किमान ५ विहिरी होत्या. श्रीरामपूरला तर प्रवरेचा मोठा कालवा घराजवळून वाहत होता. नाशिकला गोदावरीचे दर्शन रोज होत होते. म्हणजे पाण्याची अपूर्वाई नव्हती, तर! मग या जलनिधीचे हे असे विलक्षण आकर्षण कशातून निर्माण झाले असावे?

पहिल्यांदा जेव्हा एम.आय.डी.सी.च्या डोंबिवली डिव्हिजनला बदली होऊन आलो, तेव्हा आयुष्यात प्रथमच समुद्र पाहिला तो गिरगाव चौपाटीचा आणि बस्स! मनाने ठरविले आता इथेच राहायचे! त्यावेळी कोणत्या तरी सुट्टीच्या दिवशी अंबरनाथहून येऊन संध्याकाळी मी मित्राबरोबर चौपाटी पाहिली होती. माझ्यासारख्या, देशावरून आलेल्या कोणत्याही माणसाला मुंबई समुद्र प्रभावित करते ती तिच्या प्रशस्त रस्त्यांनी, उंच उंच इमारतींनी, प्रचंड गर्दीने, दिव्यांच्या झगमगाटाने आणि या प्रचंड जलनिधीच्या भारून टाकणा-या दर्शनाने! गावाकडे असताना कोणत्याही दिशेने गावाबाहेर पडलो तरी एखादा चौक आणि तिथून चारी दिशांना वेगवेगळ्या गावाला जाणारे रस्ते किंवा महामार्ग दिसतात. तिथले ढाबे, हॉटेल्स, नाहीतर रस्त्याकडच्या चहाच्या छोटय़ा टप-या ओळखीच्या वाटत. पण, मुंबईच्या पश्चिम बाजूला गेले की, भूमीची सीमाच संपते. खरे तर केवळ या महानगराची, या राज्याचीच नव्हे तर देशाचीच सीमा संपते. पुढे सुरू होते ते अनोळखी दुसरे गूढ जग. भलेही आपली सागरी हद्द काही किलोमीटर आत, समद्रात, संपत असेल, पण मानवी डोळ्यांना तर इथे ‘आपले जग इथे संपले’ अशीच जाणीव होते या समद्राच्या दर्शनाने! तीस वर्षापूर्वी अनेक स्वप्ने घेऊन या किना-यावर मी आलो होतो तेव्हा केवढी मजेदार वाटली होती मला ती गोष्ट!

आपण मरिन लाइन्स स्टेशनच्या पश्चिमेकडील दरवाजाने बाहेर पडलो की, आधी चमचमणारा प्रशस्त रस्ता दिसतो. गावाकडून आलेल्या मला त्यावरून सतत वेगाने धावत जाणा-या गाडय़ा पाहून फार आश्चर्य वाटायचे. आजूबाजूचा परिसर अनेकदा सिनेमातून पाहिला असल्याने पहिल्यांदा तर अगदी वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटले होते. त्याकाळी आमच्या गावात दिवसभरात २/३ गाडय़ासुद्धा रस्त्यावरून जाताना दिसत नसत. इथे तर एका मिनिटाला १६० गाडय़ा एकदा मीच मोजल्या होत्या. आधीआधी तर मरिन लाइन्सचा तो रस्ता ओलांडणेसुद्धा दिव्य वाटायचे! एका बाजूची वाहने सांभाळत अर्धा रस्ता ओलांडला की, थोडा दिलासा मिळायचा. मधल्या दुभाजकावर तोल सांभाळत उभे राहून, दुसरीकडे पाहिले तर दुस-या दिशेने तेवढीच वाहने, तेवढय़ाच वेगाने जणू अंगावरच येत असायची. मग ती सिग्नलसाठी थांबली की, दुसरा टप्पा पार करायचा. त्यानंतर समुद्राकाठी खास चालायला केलेला मोठा रस्ता-कम-फुटपाथ! त्यापुढे गेले तर सोन्यासारख्या बारीक वाळूचा लांबच लांब किनारा आणि त्यानंतर सतत उसळत असलेला अथांग समुद्र! त्याच्या सतत किनारा गिळून टाकायचा प्रयत्न करणा-या अविरत लाटा. त्यातही एक लय होती. सहा लाटा लहान आल्या की एक मोठ्ठी लाट येते, असे कुणीतरी सांगितले होते. मी आपला अनेकदा ही मोजदाद करीतच वेळ काढला आहे.

मुंबईने नकळत प्रेमातच पाडले ते समुद्राच्या या न थांबणा-या लाटांच्या गाण्यामुळेच! त्यांचे एक वेगळेच संगीत हे मुंबईच्या जीवनाचे पार्श्वसंगीतच आहे जणू! मला त्या लाटांची हाक आत कुठेतरी जाणवली. क्षणभर असे वाटले की, या लाटा गेली कितीतरी वर्षे माझी वाटच पाहत होत्या. आमच्यात पहिल्याच दिवशी एक अनामिक नाते प्रस्थापित झाले. त्या स्वच्छ रवाळ तांबूसपांढ-या वाळूत बसून मग संध्याकाळी मी पश्चिमेकडे बुडत असलेला तांबडालाल सूर्य नियमितच बघू लागलो. हळूहळू जगाचा निरोप घेणारा तो तेजाचा गोळा शांतपणे पाहत बसताना तुम्ही सगळ्या दिवसाचा शीण नकळत कधी विसरून गेलात आणि ताजेतवाने झालात ते सुद्धा कळत नाही. केवढा आल्हाददायक अनुभव!

एकदा किना-यावर आल्यावर मग मला सवयच लागली. मग आनंद असो, दु:ख असो, विरह असो की, भेट असो. साजरी व्हायची ती याच जीवलगाच्या साक्षीने, असे जणू ठरूनच गेले होते. अंबरनाथला एकटाच राहत असल्याने दर रविवारी मी आपला दुपारीच निघायचो आणि गिरगावकडे कूच करायचो. अख्खी संध्याकाळ समुद्रावरचा बेभान करणारा वारा, थांबून थांबून येणा-या थंड झुळुका अनुभवल्यावर, हळूहळू दिवे लागू लागायचे आणि लक्षात यायचे, अरे देवा! आता पुन्हा घरी जायचे आहे तेही लोकलने, तेही सेन्ट्रल लाइनवर! पण एकटा असल्याने कसलेच काही वाटायचे नाही. दोन-तीन तास लागलेली ती त्या लाटांशेजारची समाधी एवढा आनंद द्यायची की, बाकीची धडपड काहीच वाटू नये. हळूहळू कळाले, असाच जास्त रम्य किनारा जुहूला आहे. मग तिकडेही गेलो. नंतर त्याकाळी निळूभाऊ खाडिलकरांच्या ‘प्रॅक्टिकल सोशालीझम’चे काम करणा-या सुरेश नगर्सेकरची ओळख झाल्यावर एकदा त्याच्या वसईच्या घरी गेलो. तिथे जुन्या हिंदी सिनेमात दाखवतात तसा कोरा किनारा पाहिला. किती आवडला होता तो मला! ते घर विकतच घेऊन टाकावे असे वाटले होते!

भविष्याचा कागद कोरा असल्याने, संध्याकाळी जेव्हा जेव्हा समुद्राच्या किनारी बसलो, तेव्हा सहजच वर आकाशात चाललेली ढगांची रंगरंगोटी पाहताना मनातली मोकळी जागा वेगवेगळ्या दिवास्वप्नांनी भरली जायची. कधीकधी दूरवर क्षितिजरेषेवर जहाजांच्या अंधुक आकृती दिसत राहायच्या. रात्र झाली आणि त्या जहाजात दिवे लागले की, जणू त्या बाजूलाही वस्ती आहे आणि इमारतीतले लोक आताच घरी आले आलेत, त्यांनी दिवे लावले असावेत असे वाटायचे. मग पुन्हा औरंगाबादला गेलो, बँकेची नोकरी मिळाली होती ना! जाणेच भाग होते!

जड अंत:करणाने मुंबई सोडली आणि जुने ओळखीचे औरंगाबाद जवळ केले, पण तिथे रमलो नाही. तिथून निसटलो आणि नाशिकला आलो. पण आत कुठेतरी हा अथांग जलनिधी साद देत होताच. शेवटी नाशिकमधून सुटका करून घेतली आणि आलो ते सरळ राजभवनलाच. राज्यपालांचे निवासस्थानवजा कार्यालय! त्यात तर या समुद्राशी चांगलीच जवळीक झाली होती. कारण दर्यावर्दी इंग्रजांनी सुमारे २०० वर्षापूर्वी बांधलेले ‘गव्हर्नर हाऊस’ हे समुद्रात गेलेल्या एका निमुळत्या २५ एकरच्या जमिनीवर बसलेले होते. त्या भागाला पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून असे दोन्ही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले होते. तिथे प्रथमच पूर्वेकडचा समुद्रकिनारा पाहिला. मला मिळालेले सरकारी निवासस्थान पूर्वेकडच्या समुद्रापाशीच होते. दिवसभर घराच्या खिडकीतून तो दिसत राहायचा. एका लयीत त्याच्या लाटांचा अंतर्नाद मनाला गुंगवून ठेवायचा. ऑफिसला जातानाही त्याचे अनेकदा दर्शन व्हायचे कारण राजभवनला सगळीकडून समुद्राने वेढा टाकला आहे.

तिथे असताना दिवसरात्र समुद्राची गाज ऐकू येत राहायची. राजभवनची टर्म संपल्यावर पत्नीच्या क्वार्टरमध्ये वरळीला राहायला गेलो. तिथेही समुद्र शेजारीच होता. शेवटी तर तिची मंत्रालयात बदली झाल्यावर चर्चगेटला घर मिळाले. १०व्या मजल्यावरून पुन्हा तिन्ही बाजूनी याचे दर्शन व्हायचे. अनेकदा असे वाटते नक्की आमच्यात मागच्या जन्मीचेच नाते असावे. नाहीतर आता ठाण्यात आलो तेव्हाही हा कसा पुन्हा माझा शेजारी निघावा. इथेही एकदा सकाळी सहज फिरायला गेलो, तर पुन्हा खाडीचे दर्शन झाले. अरे वा! म्हणजे आता ही साथ आयुषभर राहणार तर. केवढी सुखद जाणीव!!

1 COMMENT

  1. वा मित्रा तुमच्या हा लेख वाचून मला साता सामुद्रा पलीकडून मला माझ्या वसई ची आठवण आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version