Home संपादकीय तात्पर्य औषध विक्रेत्यांची मनमानी

औषध विक्रेत्यांची मनमानी

1

औषध विक्री संघटना आणि त्यांचा सरकारशी सतत चालणारा वाद हा कायमचा डोकेदुखीचा विषय झाला आहे. देशामध्ये बनावट औषधांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या ब्रँडच्या नावाची भ्रष्ट नक्कल करून काही औषधे बाजारात आणली जात आहेत. त्यावरून देशात बरेच खटलेही झालेले आहेत आणि काही औषधनिर्माते सध्या कारागृहात आहेत. औषधांच्या निर्मितीमध्ये आणि विक्रीमध्ये काळाबाजार होऊ नये, ग्राहकांची लूट होऊ नये, यासाठी सरकार काही नियमांचा आग्रह धरत आहे आणि तो योग्यच आहे. परंतु औषध विक्रेते आणि सरकार यांच्यातला संवाद म्हणावा तसा सुरळीतपणे होत नाही. त्यामुळे त्यांच्यात सतत रस्सीखेच सुरू असते. औषध विक्रेते संघटित आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव टाकण्यासाठी औषध विक्रेत्यांची संघटना कधी औषधे बंद ठेवण्याचा तर कधी मर्यादित प्रमाणात उघडी ठेवण्याचा इशारा देत असतात. सध्या मुंबईतील औषध दुकाने अशाच एका वादाच्या परिणामी केवळ संध्याकाळी सहा पर्यंत सुरू राहणार आहेत. हे औषध विक्रेत्यांचे आंदोलन काही निर्बंधांच्या विरोधात आहे. सरकारने गेल्या १५-२० वर्षात औषधांच्या दुकानांत एक मोठा बदल घडवून आणला आहे. औषधनिर्मिती आणि विक्री या संबंधीचे प्रशिक्षण असलेल्या व्यक्तीला औषध दुकान उघडण्याची परवानगी देण्याचा एक नियम आहे. किमानपक्षी त्या दुकानात औषधे देणारी व्यक्ती (फार्मासिस्ट)ही तरी प्रशिक्षित असावी, अशी अट आहे. पूर्वीच्या काळी असे नोकर मिळत नव्हते. परंतु आता फार्मसी (औषध निर्माणशास्त्र) या विषयातील पदवी-पदविका घेणारे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपलब्ध झालेले आहेत. तेव्हा कसल्याही प्रशिक्षणाविना अंदाजे औषधे देणारे विक्रेते आता या दुकानातून दिसत नाहीत. सरसकट सगळीकडेच प्रशिक्षित उमेदवार दिसायला लागले आहेत. परंतु औषध दुकानदारांना अशा लोकांसाठी जास्त पगार मोजावा लागतो आणि त्यांना ठरावीक वेळेतच काम द्यावे लागते. जास्त वेळ काम करवून घ्यायचे असेल तर ओव्हरटाइम मोजावा लागतो. त्यातूनच हा संघर्ष निर्माण झाला आहे. सरकारच्या नियमांनुसार, हे प्रशिक्षित कर्मचारी दुकानात असले पाहिजेत. म्हणजे जेवढा वेळ दुकान उघडे असेल तेवढा वेळ प्रशिक्षित कर्मचारी दुकानात असला पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे. परंतु औषध विक्रेत्यांच्या संघटनेला हा निर्बंध मंजूर नाही. औषध विक्रेता दुकानात सदैव राहणार नाही, याचा अर्थ त्याची डय़ुटी संपल्यानंतर तो अप्रशिक्षित नोकर औषधे देईल, असा प्रकार सुरूही झालेला होता. परंतु त्याची दखल घेऊन सरकारने हा नियम न पाळणाऱ्यांना औषधांची विक्री बंद ठेवण्याची सूचना केली. त्यातून संघर्ष निर्माण झाला आहे आणि आता दुकानदारांनी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी दहाच तास औषध विक्री सुरू राहील, असे जाहीर केले आहे. अप्रशिक्षित व्यक्तींकडून चुकीची औषधे दिली गेल्याची काही प्रकरणे समोरही आलेली आहेत. सध्या तरी अनेक रुग्णालयांनी स्वत:चीच औषध दुकाने रुग्णालयाच्या परिसरात सुरू केलेली आहेत. अशी दुकाने या आंदोलनात सहभागी होणार नाहीत, अशी आशा आहे.

1 COMMENT

  1. खरं तर ग्रामीम भागातील स्थिती अधिक विदारक आहे. तालुक्याचे ठिकाण आणि मोठी गावे येथे औषधशास्त्राची पदवी आणि पदविका प्राप्त व्यक्ती त्यांचा परवाना अप्रशिक्षित व्यक्तीला ३ ते १० हजारापर्यंत दर महिन्याचे भाडे आकारून किरायाने देतात. ज्या दुकानदारांना हा परवाना भाड्याने दिला जातो त्याच्याकडे औषधशास्त्राचे कसलेच प्रशिक्षिण नसते. या उलट परवाना भाड्याने देणारे औषध कंपन्यात विविध पदांवर नोकरी करतात; मात्र सरकारचे अधिकारी तपासणीला गेल्यानंतर चिरीमिरी घेऊन गप्प बसतात. या विरुद्ध कोणी आवाज उठवत नाही वा मीडियासुद्धा स्टिंग ऑपरेश करीत नाही. ही बाब गंभीर आहे. म्हात्रे साहेबांनी ‘प्रहार’मधून या विरुद्ध प्रहार करावा आणि सरकारी यंत्रणा कामाला लावावी, अशी अपेक्षा आहे.
    – विकास वि. देशमुख
    करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.
    ९८५०६०२२७५
    ०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version