Home Uncategorized कंत्राटी शेतीचा नवा मार्ग

कंत्राटी शेतीचा नवा मार्ग

1

जग वेगाने बदलत आहे. त्यात कृषी क्षेत्र तरी कसे मागे राहील? जवळपास सर्वच क्षेत्रांत आता ‘कंत्राटी’ व्यवस्थेने जम बसवला असून तिचा शेतीमध्येही प्रवेश झाला आहे. मालवण तालुक्यातील चुनवरे खांबटवाडी येथील उत्तम गावडे या कृषिभूषण पुरस्कार (सेंद्रिय शेती) प्राप्त शेतक-याने कंत्राटी शेतीचा अंगीकार केला आहे. इतर शेतक-यांची जवळपास सात एकर जमीन करार पद्धतीने घेऊन त्यामध्ये झेंडूची फुलशेती त्यांनी केली आहे. या फुलशेतीबरोबरच आपल्याकडील इतर शेतीत अनेक शेतीविषयक उपक्रम राबवले आहेत.

चुनवरे खांबटवाडी या वाडीत पूर्णत: कातळयुक्त जमीन आहे. गावडे व त्यांचे पुतणे भालचंद्र अ‍ॅग्रो फार्म प्रा. लि.चे संस्थापक संतोष गावडे यांनी मातीतूनच नव्हे, तर दगडातून सोने पिकवता येते हे आपल्या प्रयोगशीलतेतून दाखवून दिले आहे. आपल्या २१ एकर शेतजमिनीत शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय, शेळीपालन, गांडूळ खत प्रकल्प, शेती पर्यटन आदी प्रकल्प त्यांनी राबवले आहेत. आपले गाव, शेती सोडून नोकरीच्या मागे न लागता कृषी उत्पादनाची, हरितक्रांतीची, कृषी पर्यटनाची कास धरल्यास निश्चितच आर्थिक स्थैर्य लाभू शकते, असे ते नेहमी सांगतात. गावातील शेतक-यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दराने विकण्यापेक्षा कंत्राटी शेती पद्धतीचा अवलंब केल्यास शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्याबरोबरच त्यांची जमीनही विक्री न होता स्वमालकीची राहते. परिसरातील शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम गावडे यांनी ही संकल्पना अंमलात आणून त्याची कार्यवाही सुरू केली. 

चुनवरे येथील माळरानावर कुशे यांची सात एकर पडीक जमिनीची साफसफाई करून त्यामध्ये त्यांनी झेंडूचे पीक घेतले आहे. योग्य नियोजनामुळे झेंडू पिकाचा बहर त्यांना फायदा देऊन गेला. जमिनीचा कस सुधारण्याबरोबरच परिसरातील बेरोजगार युवक व युवतींना या शेतीमध्ये काम करून रोजगाराची संधीसुद्धा उपलब्ध झाली आहे. झेंडूसोबतच मिरची व भुईमूग शेतीही त्यांनी केली आहे.

आडवली येथील विजय घाडीगावकर यांच्या मालकीच्या ५० एकर जमिनीमध्ये करारतत्त्वावर शेतीचा प्रयोग भालचंद्र अ‍ॅग्रोकडून करण्यात येत आहे. मालोंड चुनवरे परिसरातील इतर शेतक-यांच्या जमिनी करारावर कंत्राटी शेती करण्यासाठी घेण्यात येणार असून त्याद्वारे येथील नापीक जमिनीची मशागत होऊन जमिनीचा कस सुधारणार आहे.

चुनवरे, मालोंड, बेलाचीवाडी परिसरातील शेतकरी स्वयंसिद्ध होण्यासाठी गावडे सर्व शेतक-यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. भालचंद्र अ‍ॅग्रोच्या माध्यमातून कै. सावित्री गावडे कृषी एज्युकेशन ट्रस्ट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संतोष गावडे यांनी दिली. या माध्यमातून शेतीविषयक सर्व मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शेतक-यांना दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल जिल्ह्याच्या कृषी विभागानेसुद्धा घेतली असून जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र वाकडे यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देऊन कंत्राटी शेतीचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल गावडे यांचे अभिनंदन केले आहे. चुनवरे गावच्या माळरानावर हा कंत्राटी शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी केवळ जिल्हाभरातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी नियमित भेट देत आहेत.

आज केवळ मनुष्यबळाच्या अभावाने किंवा आळसाने शेकडो एकर जमीन पडीक राहत आहे. जमिनीत कोणतेही पीक न घेता ती पडीक राहिल्यास जमिनीचा पोत बिघडतो व जमीन नापीक होण्याचा धोका असतो. उत्तम गावडे यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील पडीक जमिनीत शेतक-यांनी कंत्राटी पद्धतीने शेती केल्यास आर्थिक लाभाबरोबरच रोजगाराची संधी निर्माण होतील. चुनवरे येथे भालचंद्र अ‍ॅग्रोच्या माध्यमातून राबवलेला कंत्राटी शेतीचा हा यशस्वी प्रयोग आदर्श असाच आहे. नियोजन आणि मेहनत घेण्याची तयारी ठेवल्यास शेतकरी ते कृषी व्यावसायिक असा बदल होण्यास फार वेळ लागणार नाही.

1 COMMENT

  1. सर कंञाटी शेतीचे करार पत्राचा नमुना व सोबतसंलग्न असलेले शासकीय योजना बाबत माहिती मिळावी..संपर्क ९४२०८५७६४०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version