Home संपादकीय तात्पर्य कठोर शिक्षा हवीच

कठोर शिक्षा हवीच

1

नवी दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर लोकांच्या संतापाची दखल घेऊन केंद्र सरकारने बलात्काराबद्दल जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद असणारा कायदा केला. या कायद्यानुसार जन्मठेप झालेल्या काही निवडक प्रकरणांमध्ये आता धौला कुआँ प्रकरणाचा समावेश झाला आहे. २०१० साली हे बलात्काराचे प्रकरण घडले होते. त्याचा निकाल आता उशिराने लागला असला तरी जन्मठेपेच्या तरतुदीनुसार या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा ठोठावल्या गेल्या आहेत. दिल्लीच्या एका सत्र न्यायालयात हरयाणाच्या मेवात भागातील पाच तरुणांना दिल्लीच्या बीपीओमधून काम करून मध्यरात्री घरी परतणा-या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली आहे. ही ३० वर्षीय तरुणी ईशान्य भारतातील असून दिल्ली नजिकच्या बीपीओमध्ये नोकरीला होती. मध्यरात्री काम संपवून ती घरी निघाली, तिच्यासोबत तिची मैत्रीणही होती. या दोघींना कंपनीच्या गाडीमधून घराजवळ आणून सोडले गेले. मात्र त्यांना सोडलेली जागा आणि प्रत्यक्ष त्यांचे घर यांच्या दरम्यान त्या दोघींचेही अपहरण करण्यात आले. त्यातल्या एकीने शिताफीने सुटका करून घेतली तर दुसरीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यांनी तिच्यावर वाहनात आधी बलात्कार केला, नंतर तिला मंगोलपुरी भागात नेऊन तिथेही हाच प्रकार केला. या पाच जणांना सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा त्यातला एक आरोपी बेशुद्ध पडला. तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश करायला सुरुवात केली. आपल्या मुलाला या प्रकरणात नाहक गुंतवले आहे, असा त्यांचा आरोप होता. शिवाय अन्य चार आरोपींनाही दया दाखवावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती; परंतु पीडित मुलीने या प्रकरणाचे जे वर्णन केले आहे ते ऐकल्यानंतर हे आरोपी दया दाखवण्यास कसे पात्र नव्हते, हे लक्षात येते. या लोकांनी या दोघींना पिस्तुलचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. नंतर तावडीत सापडलेल्या एका मुलीचे हातपाय बांधून टाकून तसेच तिच्या तोंडात बोळे कोंबून तिच्यावर बलात्कार केला होता. या आरोपींचा मूळ धंदा जनावरे चोरून ती विकणे हा होता. त्यातला एक आरोपी तर अन्य एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपी होता. त्याच्या भावाने आणि त्याने मिळून हा बलात्कार केला होता. शेवटी दोघेही या प्रकरणात निर्दोष सुटले; परंतु त्यांच्या वर्तनावरून ते सराईत गुन्हेगार होते हे लक्षात येते. या प्रकरणात सुटका करून घेतलेल्या पीडितेच्या मैत्रीणीने तातडीने कंपनीला फोन केला आणि कंपनीने पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे सूत्रे हलली आणि खटला उभा राहू शकला, पुरावा गोळा होऊ शकला आणि आरोपींना शिक्षा झाली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून सतविंदर कौर या महिलेनेच काम केले, हे विशेष होय. अ‍ॅड. कौर यांनी या आरोपींना सध्याच्या कायद्यात उपलब्ध असलेली सर्वात गंभीर स्वरूपाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आणि न्यायालयाने ती मान्य केली. या गुन्हेगारांनी उच्च न्यायालयात अपील केला आहे. पण अशा आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहेत. कारण हे सगळेच गुन्हेगार हे सराईत आहेत. उच्च न्यायालयात गेल्यावर तिथे शिक्षा कमी होण्याऐवजी त्यांच्या सराईतपणाचा मुद्दा पुढे करून त्यांना फाशीची शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

1 COMMENT

  1. ह्या भडव्याना सौदी अरब सारक्या देशात असलेल्या कायद्या प्रमाणे भर बाजारांत ” फासावर ” लटकावा, 20 / २५ ,वर्षे जेल मध्ये
    पोसत राहू नका ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version