Home किलबिल करा दिवाळी आगळीवेगळी!

करा दिवाळी आगळीवेगळी!

1

काय मग दोस्तहो, दिवाळीची सुट्टी सुरू होतेय. दिवाळीत कोणते कपडे घालायचे, कोणाकडे फराळाला जायचं याची यादी तुम्ही आधीच ठरवली असेल, यात काहीच शंका नाही. दिवाळीचे नवीन कपडे, नवीन चपला, फटाके, खाऊ यांची खरेदीही कधीच पार पडली असेल. परीक्षा, अभ्यास, ना टीव्ही, ना खेळ यामुळे दोन आठवडाभर तुम्ही चांगलेच कंटाळला असाल. म्हणूनच या दिवाळीच्या सुट्टीची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत असाल. पण बरं का दोस्तहो, या दिवाळीच्या सुट्टीत मजा तर कराच, पण या सुट्टीचा सदुपयोग कसा करून घेता येईल, याकडेही लक्ष द्यायला अजिबात विसरू नका.

भाषेच्या पेपरात ‘माझा आवडता सण – दिवाळी’ हा निबंध ठरलेलाच असतो आणि दिवाळी जवळच आलेली असल्याने तुम्ही तो निबंध लिहून छान मार्क मिळवले असतील. त्यामुळे दिवाळी म्हणजे काय आणि या सणाचं महत्त्व काय, हे तुम्हाला नव्याने सांगायची काहीच गरज नाही. अगदी लहानपणापासून आजी-आजोबांकडून, आई-बाबांकडून तुम्ही ‘दिवाळी’च्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील. दिवाळीच्या दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत परत आले होते. त्या वेळी आपल्या घराभोवती दिव्यांची रोषणाई करून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. म्हणूनच दिवाळीला ‘दीपोत्सव’ म्हणजे ‘दिव्यांचा उत्सव’ असंही म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीत या सणाचं खूप महत्त्व आहे. शाळेलाही पंधरा दिवस सुट्टी असल्याने लहान-थोर सगळेच सण उत्साहात साजरे करतात. दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही खूप गोष्टी शिकू शकता, आईला मदत करू शकता. शिवाय अभ्यासही करा म्हणजे आई-बाबाही खूश, तुम्हीही खूश, पण नेमकं काय करायचं हे सुचत नाहीये? टेन्शन घेऊ नका. एकदम सोपं आहे. दिवाळीत काय करता येईल, या कामाची यादी ‘छोट्टम मोठ्ठम’ तुम्हाला देणार आहे. चला तर मग तयारीला लागा..

दिवाळीचा अभ्यास

दिवाळीत चांगली पंधरा दिवस सुट्टी असणार म्हणजे शाळेतून तुम्हाला भरपूर अभ्यास मिळाला असणार. दिवाळीच्या अभ्यासाची एक वेगळी वही बहुतेक सगळ्याच शाळांमधून देतात. त्या वहीत प्रत्येक विषयाचा वेगळा विभाग असतो. अगदी चित्रकला आणि हस्तकला या विषयांनासुद्धा वेगळी जागा असते. त्यामुळे त्या वहीत अभ्यास करायला मजा वाटते. शिवाय सगळे विषय एकाच वहीत असल्यामुळे काही हरवायचा किंवा अनेक वह्या बाळगायचा प्रश्न येत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, दिवाळीच्या दरम्यान वेगवेगळी पुस्तकं, वर्तमानपत्रं, दिवाळी अंक यामध्ये छान महत्त्वपूर्ण माहिती, फोटो, शिबिरं अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी छापून येत असतात. त्या तुम्ही जमवून ठेवा. कारण पुढे कधीही तुम्हाला त्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो.


दिवाळीचा किल्ला

तुमच्यापैकी दिवाळीत कोण कोण किल्ला बनवतं? जर बनवत नसाल तर या वर्षीपासून दिवाळीसाठी किल्ला बनवायला विसरू नका बरं का! आपल्या या संस्कृतीचा आपल्याला हळूहळू विसर पडत चालला आहे आणि आपली ही संस्कृती-परंपरा जपणं आपल्याच हातात आहे. म्हणूनच दरवर्षी तुम्ही आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन छान मातीचे किल्ले बनवा आणि बरं का, त्या किल्ल्यांवर शिवाजी महाराज, मावळे, बाजार असा देखावा तयार करायला विसरू नका. शिवाजी महाराज आणि मावळे यांचे छोटे मातीचे पुतळेही दिवाळीच्या काळात विकत मिळतात. ते वापरून झाल्यावर नीट सांभाळून ठेवा, म्हणजे पुढच्या वर्षीच्या दिवाळीत किल्ला करताना त्यांचाच वापर पुन्हा करता येईल.


आईला मदत
आई आपल्यासाठी नेहमी खूप काही करते नाही का? डब्यात पोळी-भाजी लागते म्हणून लवकर उठते, आपला अभ्यास घेते, शाळेचा गणवेश तयार करते, आपलं दप्तर भरते, शाळा-टयूशनला घेऊन जाते नि आणते, वगैरे वगैरे. आता दिवाळी तर आईला दुप्पट काम. फराळ, घराची साफसफाई, दिवाळीची तयारी करणे या सर्व गोष्टी आईला एकटीला कराव्या लागणार, म्हणूनच आईची मदत करायला विसरू नका. फराळ करताना अगदी तळायला वगैरे बसायची गरज नाही, पण फराळासाठी लागणा-या डाळी साफ करणे, घराची साफसफाई करणे, घर आवरून ठेवणे एवढी मदत नक्कीच करू शकता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version