Home विज्ञान तंत्रज्ञान कर्करोगाच्या निदानासाठी ‘पेपर टेस्ट’

कर्करोगाच्या निदानासाठी ‘पेपर टेस्ट’

1

येत्या काळात अत्यंत सोपी, स्वस्त कर्करोग निदान चाचणी प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. 
जगात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या आजाराच्या तपासणीसाठी महागडी व वेदनादायी ‘बायोप्सी’ करावी लागते. या चाचणीत भरपूर वेळ व पैसा खर्च होतो. येत्या काळात अत्यंत सोपी, स्वस्त कर्करोग निदान चाचणी प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. या अभिनव चाचणीचा शोध अमेरिकेत राहणा-या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञ संगीता भाटिया यांनी लावला आहे.

महिलांची गर्भारपणाची चाचणी अवघ्या काही मिनिटांत व अत्यल्प खर्चात होते. यासाठी केवळ एक पेपर वापरला जातो. तर कर्करोग निदान चाचणी का होऊ शकत नाही, असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला. त्यांनी या विषयावर व्यापक संशोधन करून नवीन कर्करोग निदान पद्धती तयार केली. मॅसॅच्युसेटस् इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि हार्वर्ड जेस मेडिकल इन्स्टिटयूटमधील संशोधक संगीता भाटिया यांनी हा शोध लावला आहे. यामुळे संसर्गजन्य आजार आणि अन्य आजारांची तपासणी करता येऊ शकेल.

या उत्पादनामुळे कर्करोगाचे निदान कोणत्याही छायाचित्राशिवाय, घरी किंवा कार्यालयात होऊ शकेल. या पद्धतीत रुग्णाला पहिल्यांदा ‘नॅनो पार्टिकल्स’चे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर त्याच्या लघवीची तपासणी केली जाते. या पेपरमधील नॅनो पार्टिकल्सचा संयोग टयूमर प्रोटिनशी होतो. हे पार्टिकल्स रुग्णाच्या लघवीतील घटकांशी संयोग पावतात. त्यानंतर सिंथेटिक बायोमार्कर तंत्रज्ञानाद्वारे कर्करोगाचे निदान होऊ शकते, असे भाटिया यांनी सांगितले.

विकसनशील देशांतील ग्रामीण भागात तपासणीसाठी अवाढव्य यंत्रणा उभारणे शक्य नसते. या नव्या शोधामुळे अवघ्या एका कागदाने कर्करोगाचे निदान शक्य होणार आहे. तसेच तुमच्या मोबाइल फोनवर तुमचे निदान अन्यत्र पाठवता येऊ शकते. या नवीन पेपरचा वापर पहिल्यांदा कर्करोग झालेल्या रुग्णांवर करण्यात येणार आहे, असे भाटिया यांनी सांगितले.

एमआयटीच्या कोच इन्स्टिटयूट फॉर इंटिग्रेटिव्ह कर्करोग संशोधन अ‍ॅँड इन्स्टिटयूट फॉर मेडिकल इंजिनीअरिंग अ‍ॅँड सायन्स या संस्थेच्या भाटिया या सदस्य आहेत. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सच्या अहवालात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. भाटिया यांना या संशोधनात अ‍ॅँड्रयू वॉरेन, गॅब्रियल क्वॉँग आणि डेव्हिड वूड यांनी सहकार्य केले.

२०१२ मध्ये भाटिया आणि त्यांच्या सहका-यांनी सिंथेटिक बायोमार्कर तंत्रज्ञान पहिल्यांदाच विकसित केले. टयुमर प्रोटिन्स घेऊन ही चाचणी केली जाते. यामुळे कर्करोगाच्या पेशींचे नेमके स्थान ओळखण्यास मदत मिळते. या निदान चाचणीत वापरल्या जाणा-या ‘पेपर’मध्ये नायट्रोसेल्युलोज पेपर वापरला जातो. यात प्रतिजैविकांचाही समावेश असतो. याद्वारे रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या द्रव्यांचे निदान सहजपणे करता येते. या शोधासाठी एमआयटीच्या देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनकडून अनुदान मिळाले. या पेपरच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्यानंतर याचे व्यावसायिक उत्पादन होणार आहे.

1 COMMENT

  1. — कर्करोग गौमुत्र सेवनाने आटोक्यात येउ शकतो (गौमुत्र भारतीय गाइचेच असले पाहिजे आणि गाय गामण(Pregnant) नसावी). गोमुत्र + हळद + पुनर्नवा यांचे सेवनाने कर्करोग बरा होऊ शकतो. पुण्यात असेल तर मी केव्हाही मदत करू शकतो . lokesh.chirmade@gmail.com

Leave a Reply to lokesh chirmade Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version