Home टॉप स्टोरी व्हॉट्सअॅपवरील फसवणुकीला आळा बसणार!

व्हॉट्सअॅपवरील फसवणुकीला आळा बसणार!

0

व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होणा-या अफवा, पॉर्न, खोट्या बातम्या यासर्व फसवणुकीवर लवकरच आळा बसणार असून व्हायरल झालेल्या मेसेज किंवा व्हिडिओचा स्त्रोत ओळखता येणार आहे.

नवी दिल्ली- व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होणा-या अफवा, पॉर्न, खोट्या बातम्या यासर्व फसवणुकीवर लवकरच आळा बसणार असून व्हायरल झालेल्या मेसेज किंवा व्हिडिओचा स्त्रोत ओळखता येणार आहे.

भारत दौ-यावर आलेले व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स यांनी मंगळवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी केंद्राच्या वतीने रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना तीन सूचना केल्या आहेत. यात भारतात व्हॉट्स अॅपचे कॉर्पोरेट कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणा-या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला कडक शब्दांत निर्वाणीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या अफवांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले असून या अफवांवर ठोस नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे तसेच व्हायरल होणा-या अफवा, पॉर्न, खोट्या बातम्या यासर्वांना आळा घालण्यासाठी त्वरीत तांत्रिक उपाय शोधण्यासाठी सरकारतर्फे यावेळी सांगण्यात आले.

या भेटीनंतर रविशंकर प्रसाद यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली. आमच्यात तीन विषयांवर चर्चा झाली आणि व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारच्या सूचनांची पूर्तता करण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅपने भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान दिले असले तरी फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासाठी ठोस उपाय शोधावा लागणार आहे. मुख्य म्हणजे व्हायरल झालेल्या मेसेज किंवा व्हिडिओचा स्त्रोत ओळखता यावा असे फीचर तयार करावे, अशा अटी डॅनियल यांच्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत.

वा-याच्या वेगाने पसरणा-या अफवांमुळे सामाजिक शांतता भंग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार आवाहन करूनही नेटिझन्स पुरेशी काळजी घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे व्हाट्सअॅपने काही बदल केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे व्हॉट्सअॅप युजर एकाच वेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करु शकणार नाहीत. तसेच फॉरवर्ड मेसेज ओळखता येतात. त्या मेसेजची खात्री पटल्यानंतरच ते फॉरवर्ड करता येतात अन्यथा त्यावर रेड मार्क येत असला तरी नेटिझन्स पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे आता स्त्रोत ओळखता यावा असे फीचर व्हॉट्सअॅपने तयार करावे, अशा सुचना यावेळी सरकारतर्फे ख्रिस डॅनियल्स यांना करण्यात आल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version