Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती कर्दळीबनएक सुखद यात्रानुभव

कर्दळीबनएक सुखद यात्रानुभव

1

कर्दळीबन’ हा शब्द अनेक वर्षापासून गुरुचरित्र तसंच श्री स्वामी समर्थ, श्रीपादवल्लभ व नृसिंह सरस्वती इ.च्या चरित्र ग्रंथांमधून वाचनात येत होता, पण हे स्थान नेमकं कुठे आहे, याचा कुठेही उल्लेख आढळेना. श्री नृसिंह सरस्वती तपश्चर्या करीत कर्दळीबनात गुप्त झाले आणि कालांतरानं श्री स्वामी समर्थ प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. आंध्र प्रदेशातील हे स्थान आता ‘श्री स्वामी समर्थ प्रकट स्थान’ म्हणून ओळखलं जातं.

कर्दळीबनातील ‘श्री स्वामी समर्थ प्रकट स्थान’ हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. या स्थानाची आख्यायिका कळल्यावर या पवित्र स्थानाचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा गाणगापूरच्या काही पुजा-यांना झाली व साधारण १२ ते १४ वर्षापूर्वी ते या स्थानावर प्रथम जाऊन आले, असं म्हणतात. त्यानंतर हळूहळू मुंबई, पुणे, गाणगापूर, अक्कलकोट व हैदराबादहूनही अनेक मंडळी या स्थानाचं दर्शन घेऊन आली. हैदराबादपासून साधारण २२० कि. मी. अंतरावर बारा ज्योर्तिलिंगांपैकी ‘मल्लीकार्जुना’चं प्रसिद्ध मंदिर आहे. तिथून साधारण एक कि.मी.वर असलेल्या कृष्णा नदीवर पाताळगंगा हे स्थान आहे. ६०० पाय-या उतरून तिथे जावे लागते किंवा रोप-वेनंही जाता येतं. पाताळगंगा येथे कृष्णा नदीमध्ये खणा-नारळांनी ओटी भरून तसेच द्रोणामध्ये मिळणारे वातीचे दिवे नदीच्या पात्रात सोडून भाविक त्याची पूजा करतात.

पाताळगंगेच्या या किना-यावरून यांत्रिक बोटीनं व्यंकटेश किनारा इथे जावं लागतं, हा प्रवास साधारण एक तासाचा आहे. या किना-यावर मच्छीमारांची १०-१२ कुटुंबं राहतात. तिथेच आप्पा राव स्वामी व त्याच्या सहचारिणी यांचा छोटासा आश्रम आहे. ते अन्नछत्र चालवतात परंतु कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.

हा पाहुणचार आटोपल्यावर भक्त मंडळी कर्दळीबनासाठी पुन्हा मार्गस्थ होतात, बाहेर पडताच समोरच असलेली डोंगराची चढाई त्यांची वाट पाहत असते. साधारण सात कि.मी.चा हा मार्ग आपणास कर्दळीबनात म्हणजेच आपल्या या यात्रेचा पहिल्या दिवसाच्या मुक्कामाच्या स्थळी घेऊन जातो. हा मार्ग अतिशय खडकाळ असल्यामुळे खूप सांभाळून व सावकाश चढाई करावी लागते. आप्पा राव स्वामींच्या आश्रमातून निघताना त्यांनी दिलेल्या काठया आठवणीनं घेतल्यास चढाई करताना याचा निश्चितच फायदा होतो. साधारण चढाईचे एकंदर चार टप्पे पार करावे लागतात.

संपूर्ण मार्गावर आजूबाजूस नजर टाकल्यास कृष्णा नदीचं पात्र, डोंगररांगा व सभोवतालचा अप्रतिम परिसर मनाला सुखावतो. प्रत्येक चढाईच्या टप्प्यानंतर सपाट भागाचा रस्ता लागतो. अंतर पार करायला साधारण दोन ते तीन तास लागू शकतात, तिथे ज्येष्ठ नागरिकांना तीन ते चार तास सहज लागतात. चढाईच्या टप्प्यामध्ये दोन-तीन ठिकाणी थोडी सावलीची झाडं तसंच पुढे चार टप्प्यांचा चढ संपत असताना उजव्या बाजूस गाठ असलेलं झाड दृष्टीस पडतं, म्हणजेच आता पाच मिनिटात चढ संपून पुढील साधारण अडीच ते तीन कि.मी.चा सपाट रस्ता लागणार याचं समाधान भक्तांना वाटतं.

पुढे या वाटेवर साधारण अर्धा कि. मी. चाललं की, एका कातळावर कोरलेलं साधारण १२-१४ इंचाचं एक पाऊल दृष्टिक्षेपात येतं व इथे संपूर्ण परिसर कमालीचा सुगंधित व पावित्र्यानं भारलेला असल्याची जाण होते. इथून पुढे आपली वाट संपते आणि १०० पावलं डाव्या बाजूस चालल्यावर आपण अक्कमहादेवीच्या गुहेच्या वरील बाजूस येऊन पोहोचतो. त्यानंतर साधारण २०-२५ दगडी पाय-यांवरून खाली उतरलं की, बारमाही वाहणा-या निर्मल झ-याचं पाण्याचं टाकं आपल्याला दिसतं व तिथे हात-पाय धुवून ते पाणी प्यायल्यावर आपला सगळा क्षीण तात्काळ निघून गेल्याचं जाणवतं व पुढच्या पाच पाय-या चढलो की, आपण गुहेत पोहोचतो हीच कर्दळीबनातील अक्कमहादेवीची गुहा आपल्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाचं स्थान.

दुस-या दिवशी सकाळी साधारण सहा वाजता श्री स्वामी समर्थाच्या प्रकटस्थानाकडे प्रस्थान करतो. हा मार्ग जंगलातून जाणारा असल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक चालावं लागतं. या मार्गावरील स्थानिक आदिवासी असलेल्या चेंचू जमातीच्या चार-पाच झोपडया लागतात. पुढील वाटेत ओहोळ लागतो, काही ठिकाणी थोडं निसरडं असतं. म्हणून प्रत्येकानं हातात आधारासाठी काही घेणं आवश्यक आहे. पाच कि.मी.चा हा रस्ता पार करण्यास दीड ते दोन तास लागतात. थोडयाच वेळात आपण अनघालक्ष्मी- दत्तात्रेयाच्या भव्य फोटोजवळ पोहोचतो. वळसा घालून थोडं खाली उतरलं की, आपल्याला साधारण १५ फुटांवरून कोसळणारा धबधबा दिसतो व त्याच्या मागे साधारण पाच फूट बाय सहा फूट व अडीच फूट उंच अशा कपारीचं दर्शन होतं. हेच ते स्वामी समर्थाचं प्रकटस्थान.

या प्रपातामध्ये स्नान करून सर्व भक्त मंडळी दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. सर्व जण रांगेत उभं राहून आळीपाळीनं त्या कपारीमधील स्थानाचं दर्शन घेतात. तिथे शिवलिंग असून त्याच्या मागे श्रीगुरुदेव दत्त व श्रीस्वामी समर्थ यांच्या मूर्ती व त्यांचे फोटोही आहेत. तिथे धूप-अगरबत्ती लावून नमस्कार करून सगळे जण बाहेर येऊन खाली १०० पावलांवर असलेल्या पादुकांचं दर्शन घेतात. त्यानंतर शांतपणे जप, पोथींचं वाचन इ. केलं जातं. या संपूर्ण परिसरात उंच, डेरेदार वृक्ष आहेत, ज्यामुळे भर दुपारीही सूर्यकिरणं अभावानंच पाहावयास मिळतात. या संपूर्ण परिसरात अत्यंत दुर्मीळ असलेल्या वनौषधी आहेत. अनेक जंगली श्वापदंही आहेत.

त्या प्रकटस्थानाचं दर्शन घेऊन साधारण दुपारी ११ ते १२च्या सुमारास परत अक्कमहादेवीच्या गुहेत येऊन भोजन व मुक्काम करावा आणि तिस-या दिवशी पुन्हा व्यंकटेश किना-यावरून बोटीनं जवळच असलेल्या अक्कमहादेवीचं लेणं, तेथील गणेश ऋषींचा आश्रम पाहून श्री शैल्य यात्रेकरता प्रस्थान करावं.

कर्दळीबनात जाण्यासाठी आणखी दोन-तीन लांबचे मार्ग आहेत, पण सर्वसाधरणपणे भक्तांनी नेहमीच्या मार्गानंच जावं. आपल्याबरोबर तीन दिवस पुरेल इतक्या खाण्याची सोय ठेवावीच लागते. तसंच जाताना १०-१५ जणांच्या गटानं जाणं आणि सोबत श्रीशैल्य येथून मार्गदर्शक/ हमाल घेतल्यास उत्तम.

1 COMMENT

  1. When we go for Darshan,there should be provision for manan and chintan. Yatra to this place is ideal in that sense. A group of like minded friends and family members can have this pilgrimage. Three days in forest safari also refreshing exercise.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version