Home कोलाज कविता म्हणजे काय?

कविता म्हणजे काय?

2

माणूस कविता का लिहितो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी माणूस म्हणजे काय? आणि कविता म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरे आधी शोधावी लागतील. माणूस म्हणजे पृथ्वीतलावरील एक बुद्धिमान प्राणी, असे आपण म्हणतो.

माणूस कविता का लिहितो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी माणूस म्हणजे काय? आणि कविता म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरे आधी शोधावी लागतील. माणूस म्हणजे पृथ्वीतलावरील एक बुद्धिमान प्राणी, असे आपण म्हणतो. याचा अर्थ पृथ्वीवरील इतर प्राणी बुद्धिमान नसतात, असा नाही. प्रत्येक जीव-प्राण्याला मेंदू असतो आणि त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला बुद्धी असते.

अर्थात, मुंगीचा मेंदू केवढा असेल माहिती नाही; परंतु मुंगीला वाटेत खडा लागला तर त्या खडयाला वळसा घालून जाण्याइतपत तिच्याकडे बुद्धी असते. म्हणजे किडया-मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व प्राणिमात्रांना निसर्गाने बुद्धी दिली आहे.

हत्ती तर प्राण्यांमधला अधिक बुद्धिमान प्राणी असतो. त्याच्या गंडस्थळात मानवासारखाच मेंदू असतो आणि म्हणून राग, द्वेष, आनंद हे मानवी भाव त्यांच्याकडेही असतात. सोंडेने इतरांवर पाणी उडविण्याचा वात्रटपणा तो जसा करतो तसाच त्याचा मेंदू एकदा सटकला की तो बेभानही होतो. याचा अर्थ एवढाच की, प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे निसर्गाने प्राणिमात्राला मेंदू दिलाय.

मात्र माणसाच्या मेंदूइतकी परिपूर्णता वा वाढ त्यांच्यात होत नसते. दुसरी बाब म्हणजे माणसाला विचार करता येतो. पण मला वाटते इतर प्राणीही आपापल्या परीने विचार करतातच. पावसाळा आलाय, आता घरटे बांधले पाहिजे, हा विचार कावळयाने केला नाही तर त्याला पावसात भिजावे लागेल.

सावजाचा आवाज न करता पाठलाग करणे किंवा दबा धरून बसणे हा विचार वाघाने केला नाही तर त्याला उपाशी बसावे लागेल. म्हणजे निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती दिली आहे. फक्त माणसात बुद्धीविकास झाला आहे. उत्क्रांतीचा विचार करता आपण हल्ली यंत्राचा वा रोबोचा वापर जास्त करतो म्हणजे कोटय़वधी वर्षानी शेपूट जशी गळाली तसे हातही गळून जाण्याची शक्यता म्हणजे माणसाने विचार केला नाही तर मेंदू निकामी होणार?

माणूस हा बोलका प्राणी आहे. इतर प्राण्यांना बोलता येत नाही. परंतु हे खरे नाही. इतर प्राणीही आपापल्या भाषेत बोलतात. फरक एवढाच की माणूस हल्ली जास्तच बोलतो. ज्यांना आपण मुके प्राणी म्हणतो ते प्राणी आपल्या सांकेतिक भाषेत बोलतात.

अगदी किडा-मुंगीपासून वृक्ष-वल्लरीपर्यंत तर झ-यापासून प्रचंड प्रपातापर्यंत प्रत्येक जण आपल्या सांकेतिक नादमय भाषेत बोलत असतो. मानवाने आपली सांकेतिक भाषा तयार करून त्याची लिपी तयार केली आणि तो आपले भाव व विचार व्यक्तकरू लागला. परंतु मानवाची उत्क्रांती जर सारखीच झाली. तर त्याची भाषा समान का झाली नाही?

माणूस जर भावना व विचार सारखेच व्यक्त करतात तर पाच कोसावर मानवाची भाषा का बदलते. मानवाची भाषा वेगवेगळी का झाली? भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणाचा त्यांच्या भाषेवर परिणाम झाला, असे मानले तर त्याचे भाव व विचार, विश्वास एकसारखे कसे? प्रेम ही भावना सगळीकडे ‘सेम’ का आहे? पण हे तत्त्व इतर प्राणिमात्रांना का लागू होत नाही. त्यांची सांकेतिक भाषा एकच राहिली ती देशानुसार बदलली नाही. म्हणजे अमेरिकेतला कावळा कावकाव करतो आणि भारतातला कावळाही कावकावच करतो.

फक्तभारतातल्या कावळयाला पिंडदान मिळते हाच फरक! या सांकेतिक भाषेला माणूस कविता म्हणू लागला. तसेच मुंग्यांनी बांधलेले वारुळ, पक्ष्याने रचलेलं घरटं, वेळूबनातलं वा-याचं गाणं, रानझ-याचे बोल या त्यांच्या कविताच असतात. एवढेच काय समुद्राच्या पुळणीवरून लाटांनी निर्माण केलेली सुंदर रचना किंवा समुद्राची गाज या कविताच असतात. माणसाला आपला पहिला आनंद व दु:ख या त्यांच्या कविताच होत्या. म्हणजे माणसाने आधी भावना व्यक्त केल्या, मग विचार व्यक्त केले.

माणसाचा मेंदू प्रगल्भ असल्याने इतर प्राण्यांपेक्षा तो अधिक कल्पक असतो व संवेदनशील असतो. म्हणून त्याने आधी कविता लिहिली असावी, मग जे शब्दातूनही जे त्याला व्यक्त करता येत नाही तो ते मग कवितेतून, संगीतातून म्हणजे स्वरातून वा चित्रातून म्हणजे रेषांतून व्यक्त करतो. म्हणजे भावनेचा ‘ओव्हर फ्लो’ झाल्यावर तो जो अनुभव घेतो तो अनुभव तो शांतपणे शब्दांतून व्यक्त करतो. परंतु हा अनुभव जेव्हा शब्दांपलीकडे जातो तेव्हा माणूस कविता लिहितो किंवा कविता करतो.

पण कविता म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर माणूस विचार करायला लागल्यापासून व व्यक्त करू लागल्यापासून आपापल्या परीने हजारो वेळा दिले गेले आहे. परंतु प्रत्येकाची स्थिती ‘हत्ती आणि आंधळे’ यांच्यासारखी झाली आहे. त्या आंधळयांपैकी कुणाला हत्ती खांबासारखा वाटला, तर कुणाला सुपासारखा वाटला, तर कुणाला डोंगरासारखा वाटला.

तसेच कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, कुणाला रचना म्हणजे कविता वाटते तर कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते, कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते. पण या सा-यांच्या पलीकडे कविता असते. निराकार परमेश्वरासाखी (मानला तर) ‘बिटवीन द लाईन्स’ असे इंग्रजीत म्हणतात. म्हणजे मराठीत काव्य शब्दांच्या पलीकडे किंवा अलीकडे असते. म्हणजे नेमके काय हे सामान्य वाचकांना कळत नाही. आत्मा जसा निराकार असतो. तसेच कवितेचा अर्थही निराकार असतो. त्याला पा-यासारखे चिमटीत पकडता येत नाही. इतका तो तरल असतो.

कवितेचा आत्मप्रत्यय आत्म्यासारखाच वाचकाला येतो. कविता शब्दांच्या पलीकडला अनुभव असतो. म्हणून कविता ‘बिटवीन द लाईन्स’ वाचावी लागते. प्रतिभावान कवी आपला अनुभव प्रतिमांतून साकार करतो. कधीकधी कवितेतील संपूर्ण विधानच प्रतिमा बनून येते. येथे काय लिहिले आहे. त्यापेक्षा कसे लिहिले आहे. यात वाद होईल. पण तीच बाब परस्पर पूरक असेल तर ती चांगली कविता होते. तरी कविता म्हणजे नेमके काय हे असतं? शेवटी हा प्रश्न उतरतोच. काहींना वृत्तबद्ध कविता म्हणजेच कविता वाटते. अनेकांनी कवितेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही त्यांना कविता गवसली नाही.

कविता ही परमात्म्यासारखी निराकार मानली तर तिचे वर्णन परमात्म्यासारखेच ‘नेति नेति’ असे करावे लागते. म्हणजेच कवितेचे वर्णन नकारात्मक करावे लागते. याचाच अर्थ कविता ही नकारात्मक असते. ते प्रत्येक काळात प्रस्थापित व्यवस्थेशी बंडखोरी करते. मात्र सकारात्मक झाल्यावर ती प्रस्थापित होते व त्या अवस्थेचंच एक अंग होते.

मग पुन्हा नवी कविता ‘नेति नेति’ अशी होते. कॉलेजात असताना, आम्हाला मराठी विषयाला प्रा. अनंत काणेकर होते. ते म्हणायचे कविता म्हणजे काय? असे कुणी मला विचारले तर मला काही सांगता येणार नाही. पण कविता म्हणजे काय नाही, असे विचारले तर मला सांगता येईल. म्हणजे कवितेचं नकारात्मक वर्णन करावे लागते.

नकारात्मकतेत बंडखोरी असते तर सकारात्मकतेत नुसतीच स्वप्ने असतात. म्हणजे ताटात अन्नाचा कण नसताना ‘शब्दाचाचि भात शब्दांचिच कढी’ असा प्रकार असतो. सकारात्मकतेचा भ्रमनिरास झाला की मग वाटयाला मृगजळ येते. या उलट नकारात्मकता बंडखोरी करायला शिकवते. व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करायला लावते. पण सच्ची कविता नकारात्मही असत नाही व सकारात्मकही असत नाही, ती त्याच्या पलीकडे असते. अशी सच्ची कविता मला भेटली तर परब्रह्म भेटल्याचा मला आनंद होतो. वाचकाला काय किंवा मला काय ख-या कवितेचा गाव (कवितेचा सध्याचा गाव नव्हे) भेटला की-

कवितेच्या दारी। उभा क्षणभरी।
तेणे मुक्ती चारी। साधियेल्या॥

हा मुक्तीचा आनंद ब्रह्मानंदासारखाच असतो. म्हणून काव्यानंद मला मोक्ष वाटतो. चांगली कविता भेटली की माझे देहभान हरपून माझी ब्रह्मानंदी टाळी लागते. मग आपण कविता म्हणजे काय हे विसरतो. तिचा फॉर्म विसरतो. ती कोणत्या वृत्तछंदात आहे ते विसरतो. काव्यानुभवाचा आत्मप्रत्यय आल्याने आपल्याला काव्यानंद होतो. म्हणून कविता कोणत्या वृत्तात आहे वा कोणत्या वृत्तीची आहे हे महत्त्वाचे नसून ती काव्यानंद देणारी नसेल किंवा ती अस्वस्थ करीत नसेल तरी ती कविता नाही.

2 COMMENTS

  1. कविता म्हणजे काय ते खुप छान लिहीलय सर.कविता म्हणजे काय हे प्रत्येकाला अलग अलग वाटते पण तुम्ही कविता म्हणजे काय हे शेवटी सांगतांना जे सांगीतलं की कविता म्हणजे ती काव्यानंद देणारी नसेल किंवा ती अस्वस्थ करीत नसेल तर ती कविता नाही हे त्याचं अप्रतीम उत्तर आहे. मी बीए भाग मध्ये शिकत असतांना आम्हाला वर्गात आमच्या आदरणीय शिक्षीकेने प्रश्न विचारला होता की,कविता म्हणजे काय? तेव्हा वर्गातील ७-८ मुला मुलींनी उत्तर सांगण्यासाठी हात वर केले त्यात मी पण होतो तेव्हा आमच्या शिक्षीकेने सर्वांना उत्तर विचारले. मुलांनी ज्याला जसं जमेल असं उत्तर सांगीतलं आणि शेवटी मला विचारलं की, तु सांग.तेव्हा मी सांगीतलं की, कविता म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सामावलेल्या काव्य पंक्तीला कविता असे म्हणतात.हे माझं उत्तर ऐकून वर्ग तर अवाक् झाला होताच पण माझ्या आदरणीय शिक्षिकेने शाब्बास……म्हणून जी माझ्या पाठीवर थाप दिली ती माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई होती सर.मला माझे महाविद्यालयीन जीवन धन्य झाल्याची अनुभूती आली होती.शेवटी एकच सांगायचे आहे की,कविता शब्दातच एवढी ताकद आहे तर कवितेची गोष्टच न्यारी.आपण खुप छान समजावून सांगीतली सर कविता.धन्यवाद.

  2. समाजाची दशा दाखवणारे शब्द म्हणजे कविता , समाजाला दिशा देणारे शब्द म्हणजे कविता, माणसाला माणूस म्हणून जगायला लावणारे शब्द म्हणजे कविता,भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणारे शब्द म्हणजे कविता , दुःखी कष्टीतांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करणारे शब्द म्हणजे कविता , कविता म्हणजे शब्दब्रम्ह – शिवाजी वटकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version