Home कोलाज कवी भेटतो तेव्हा..

कवी भेटतो तेव्हा..

1

कवितेत ज्याचा जीव अडकतो तो कायमचा गुंततो असं कुणा एकाने म्हटलंय. आयुष्यात कुठल्यातरी वळणावर कवितेनं अवचितपणे आपलं बोट पकडलेलं असतं, अनेक एकटया क्षणांचा ती आधार बनून रहाते, कधी ती उरातली गर्द जखम असते, कधी ती हळव्या आठवांची वही असते, ब-याचदा कवीच्या भरल्या डोळ्यांतील यातनांचा दर्द असते आणि साक्षात कवीच्या तोंडून ती उलगडत असते तेव्हा तर एक सुरेल लकेर असते.
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव
तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव!
.सारं जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी!

– विदर्भातील नामवंत कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या ‘सखे साजणी’ या दीर्घकाव्यातील या ओळी आहेत. ‘प्रहार’च्या कार्यालयात आलेल्या कविराजांनी एकामागोमाग एक ओळी सुरू केल्यावर त्यांना जी दाद मिळत होती ती शब्दांत पकडणे कठीण होते. कवी मूडमध्ये होते आणि मस्त ओळींमागून ओळींच्या लडी उलगडत होते.

तुझ्या टपोर डोळ्यात, सा-या दुनियेचं धन
आत ठेवलेले हिरे, वर पापणी झाकण!
अर्धी मिटली पापणी, रूप मनाला भावलं
पापणीचे केस भासे, जणू कुंपण लावलं!

मुंबईत पाऊस दाखल होण्याआधीचा दिवस होता. पण कवीराजांच्या ‘सखे साजणी’ने कुंद दुपार धुंद करून टाकली होती. कवी गात होते, बोलत होते, कवितेची जन्मकथा सांगत होते आणि मला आणखी एका कवींची आठवण होत होती.

कवी जेव्हा बोलतो प्राणातून, तेव्हा त्याला नसतं हसायचं,
कवी जेव्हा बोलतो, तेव्हा आपण फक्त कवितेसारखं बसायचं
कवी खूप बोलतो, नदीच्या काळजात जसा पूर येतो
कवी जेव्हा बोलतो, फुलांबद्दल फूल होऊन
तेव्हा ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मुल होऊन

सुप्रसिद्ध कवी आणि तितकेच ताकदीचे निवेदक अरुण म्हात्रे अनेकदा मैफिलीची सुरुवात या ओळींनी करतात. नेमका हाच अनुभव वाकुडकर देत होते. ते मनापासून बोलत होते आणि आम्ही मनापासून दाद देत होतो.

कवितेत ज्याचा जीव अडकतो तो कायमचा गुंततो असं कुणा एकाने म्हटलंय. आयुष्यात कुठल्यातरी वळणावर कवितेनं अवचितपणे आपलं बोट पकडलेलं असतं, अनेक एकटया क्षणांचा ती आधार बनून राहते, कधी ती उरातली गर्द जखम असते, कधी ती हळव्या आठवांची वही असते, ब-याचदा कवीच्या भरल्या डोळ्यांतील यातनांचा दर्द असते आणि साक्षात कवीच्या तोंडून ती उलगडत असते तेव्हा तर एक सुरेल लकेर असते. नलेश पाटील, दापोलीचे प्रा. कैलाश गांधी, परळी वैजनाथचे अरुण पवार, वसंत वाहोकर, नारायण कुलकर्णी कवठेकर, डॉ. महेश केळुसकर, नीतीन केळकर, वर्जेश सोळंकी, अशोक नायगावकर यांच्या कविता ऐकताना, त्यांचे सादरीकरण अनुभवताना असे काहीसे नेहमीच होत असते.

कवी मूडमध्ये असला, आपल्या चाहत्यांमध्ये असला की कवितेची जन्मकथा बोलण्याच्या ओघात सांगून जातो. वाकुडकरांच्या ‘सखे साजणी’ची जन्मकथा फार रंजक आहे. तिचा निर्मितीचा क्षण तर फार विलक्षण आहे. कवी सांगत होते – अनेकांनी मला विचारलेय, ही सखे साजणी नेमकी कोण? तुम्हाला कुठे भेटली होती का अशी कुणी? तसं काहीच नाही. अशी कुणी नाही. प्रियतमा, प्रेयसीच्या रूपातील सौंदर्यवतीचं, तिच्या रुपाच्या खाणीचं हे वर्णन आहे. पण ही प्रियतमा काल्पनिक आहे. वाकुडकरांनी आमच्याही मनातल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं.

कविता फारच उत्तम झालीय, हे ज्यांनी ती वाचलीय वा वाकुडकरांच्या तोंडून ऐकलीय त्यांना माहिती आहेच. आम्ही हाच अनुभव घेत होतो. थेट वाकुडकर स्टाइलमध्ये ओळींवर ओळी आणि कवितेची जन्मकथा. ते म्हणाले – ही संपूर्ण कविता शंभरेक कडव्यांची आहे. पण ती एका दिवसातील वा एका विशिष्ट कालावधीतील नाही. ‘तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव!’ हा मुखडा सुचला तो क्षण तर फारच मजेशीर होता. नागपूरमध्ये घराजवळ एका गल्लीचं अर्धवट वळण आहे. त्या वळणावर माझ्या गाडीचं स्टीअरींग वळवत असताना ही ओळ अवचितपण चाली-लयीसकट मोठया डौलाने मनात उमटली.

माझ्यासोबत कायम एक वही असते. लगेच गाडी बाजूला घेऊन टिपून ठेवली. घरी आलो आणि पुढचं सुचत गेलं चालीसकट. चाल पण लावली. दुस-या दिवशी ऑफिसमध्ये एक-दोघांना वाचून दाखवलं तर म्हणाले, सर छान झालंय हो हे. तेव्हा मला वाटलं, आणखी लिहीता येईल. मला तेव्हा एक दीर्घकविता करायची होतीच. वेगळ्या विषयावर. तो बाजूला पडला आणि हीच करू म्हटलं. पण नंतर चालच डोक्यातून गेली. लफडा. काही सुचेनाच. आठ दिवस तडफड नुसती. मग अचानक पुन्हा सारं आठवलं. तरीही कविता पुढे सरकत नव्हती. अनेक दिवस पुढचं काही लिहून होईना. आळस कवीचा मित्र. मग म्हटलं, भौ हे काही खरं नाही. गेलो न् वसंतराव देशपांडे हॉल बुक केला महिनाभरासाठी. गिरीशभाऊ आणि जांबुवंतराव धोटे यांना आमंत्रण दिलं. म्हटलं, का बुवा असं असं आहे. दीर्घकविता म्हणणार आहे. तुम्ही यायलाच हवं. असं सारं करून स्वत:ला अडकवून घेतलं तरी कविता पुढे होईना. शेवटी एक दिवस माझ्या घराच्या वरच्या खोलीत कोंडून घेतलं मलाच. घरी सांगितलं, फोन नाही न् काही नाही. खाणंपिणं जे काही ते मला वर आणून देजा आणि मारली बैठक. आठ दिवस तसं केलं, शंभर कडवी लिहिली आणि कविता पूर्ण झाली, तीच ही ‘सखे साजणी’.

वाकुडकरांना या कवितेनं सर्वदूर पोहोचवलं. कवी, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक स्तरांवर त्यांचा वावर असतो. आता ते नदीवर एक खंडकाव्य लिहित आहेत. एका चित्रपटाच्या निर्मितीची जुळणी सुरू आहे.

तुझ्या रुपाचा साजणी, आला बहरून मळा
मळा बघायला झाला, जीव डोळ्यामध्ये गोळा!
कसं राहावं ताब्यात, मन व्हावं कसं संत
माझ्या भोवताली फुले, तुझ्या रूपाचा वसंत!

या सगळ्याला रसिकांकडून मिळणारी दाद आणि चाहत्यांचे प्रेम यामुळे त्यांच्यातील कवी आनंदात आहे. एका चांगल्या काव्याची जन्मकथा कवीच्या मुखातून ऐकल्यामुळे मी आनंदात आहे. तुमच्यातही कवितेचे झाड बहरून यावे, ‘सखे साजणी’तील उत्कटता तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी या आणखी काही ओळी –

माझी भोव-यात नाव, वर वादळाची भीती
तुझा हाकेवरी गाव, वाट पाहायाची किती!
वाट पाहता पाहता, जीव झाला पाणी पाणी
माझी हाक अजूनही, नाही गेली तुझ्या कानी!
.मुक्या मनाचं मागणं, तुला कितीदा सांगावं
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव!

1 COMMENT

  1. वाकुडकर लाजवाब आहेतच. पण ज्या मोजक्या शब्दात आणि रसिकतेने तुम्ही सखी साजानीची ओळख करून दिलीत…ती अप्रतिम आहे.
    अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version